जमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय? या पैशाचं नियोजन कसं करायचं?

जमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय? या पैशाचं नियोजन कसं करायचं?

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

काही महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या एका गावातील समृद्धीची बातमी वाचायला मिळाली होती. संपूर्ण गावात घरागणिक किमान एक फॉर्च्युनर, एंडेव्हर किंवा इनोव्हा गाडी आहे. महागड्या गाड्यांचं गाव म्हणून या गावाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पण हा स्वतःचंच दिवाळं काढणारा प्रकार कुठेतरी, कुणीतरी थांबवणे आवश्यक आहे असे वाटले.
आता तर समृद्धी महामार्गात ज्या ज्या गावांच्य ज़मिनी गेल्यात तिथे महागड्या गाड्यांच्या कंपन्यांनी आपले विक्री प्रतिनिधी २४ तास नियुक्त करून ठेवलेले आहेत.

पुण्याजवळ करोडो रुपये घेऊन जमिनी विकलेले गुंठामंत्री कित्येक आहेत. पैसे कमी पडले कि वीक तुकडा, हा इथला नित्यक्रम झालाय. गेल्या २० वर्षात पुण्याच्या परिसरातील हजारो एकर जमिनी बिल्डर्स, कंपन्या यांना लोकांनी विकल्या, आणि आलेला सगळा पैसा राजकारण, मौजमजा यातच घालवला. आता यातले हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच टिकलेत, बाकीचे दिवाळखोर झालेत. एखाद्या कंपनीच्या बाहेर, चौकात, लहानश्या चहाच्या टपरीवर आता यांची गुजराण चालते. मुळाशी पॅटर्न चित्रपटामधे मधे याची झलक पाहायला मिळालीच असेल.

नगरमधील शिर्डी ला विमानतळासाठी ज्यांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले ते काही काळासाठी प्रचंड श्रीमंत म्हणून वावरले, पण पैसे संपल्यावर आता पुन्हा मजुरीच्या कमला लागले आहेत.

महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील हि परिस्थिती सारखीच आहे. जिथे जिथे शहराजवळ विकास होत आहे, MIDC सॅंक्शन होत आहेत, रस्त्यांसाठी अधीग्रहण होत आहे, तिथे तिथे जमीन मालक काही काळासाठी प्रचंड श्रीमंत होताना दिसत आहेत, पण दहा वर्षाच्या कालावधीतच हे चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे. दहा वर्षापूर्वीचे पैशाच्या राशीत खेळणारे आता घरखर्चासाठी उधाऱ्या मागत फिरताना दिसत आहेत.

काय कारण आहे या दिवाळखोरीचे? जमिनी विकून आलेला भरमसाठ पैसा पाच दहा वर्षात कुठे गडप होतोय? याचा कुणी विचार करायचा तरी विचार केलाय का?

याच सर्वात मोठं कारण आहे अर्थसाक्षरतेच अभाव… आर्थिक साक्षरतेचा प्रचंड अभाव आपल्या दिवाळखोरीला कारणीभूत ठरत आहे.

जमीन विकायची नसते, राखायची असते… खरंय ना… कारण जगात काहीही वाढू शकतं, पण जमीन वाढू शकत नाही. पण काही वेळेस जमिनी विकाव्याच लागतात. अशावेळी या जमिनी विकून आलेला पैसा कसा वापरायचा, त्याचे नियोजन कसे करायचे, कुठे गुंतवायचा, किती खर्चायचा, किती वापरायचा याच कोणतंतरी नियोजन आपण केलेलं असतं का? मुळात, असं काही नियोजन असतं का, हाच आपल्याला मोठा प्रश्न पडेल…

वर सांगितलेल्या गावाची बातमी वाचल्यानंतर या विषयावर लिहिण्याच्या विचारात असताना मुळाशी पॅटर्न चित्रपटाचं ट्रेलर पाहिलं. वाटलं, जे सांगायचंय ते या चित्रपटात सांगितलेलं असेल. चित्रपट रिलीज होईपर्यंत आपण थांबूया, पण या विषयावर चित्रपटाने निराशा केली. सरकारने जमिनी विकायला सांगितल्या, पण पैसा कसा वापरायचा हे सांगितलं नाही अशी टाळीछाप टीका करून, फक्त त्यातून निर्माण झालेल्या गुन्हेगारी विश्वाकडे चित्रपट वळाला. समस्येला उत्तर त्याने दिलंच नाही. चित्रपट म्हणून ते योग्य होतं, कारण ते मनोरंजनाचे साधन आहे, शिक्षणाचे नाही. म्हणून माझा थोडा अपेक्षाभंग झाला इतकेच.

आता मुद्द्यावर येऊ… काय चुकतंय ?

आपण दिसणाऱ्या श्रीमंतीला महत्व देतोय, आणि असणाऱ्या श्रीमंतीला विसरतोय हि आपली सर्वात मोठी घोडचूक ठरत आहे.

जमिनी विकून हाती पैसा आला म्हणजे श्रीमंती अली असा एक मोठा भ्रम समाजमनात पसरलेला आहे. जमिनी विकून श्रीमंती येतंच नाही. फक्त आपल्या अचल संपत्तीचे रूपांतर चल संपत्तीत झालेले असते इतकाच बदल होत असतो. जमीन विकण्यापूर्वी तुम्ही जेवढे श्रीमंत असता, तेवढेच तुम्ही जमीन विकल्यानंतर असता. उलट आपल्या चुकांमुळे आपण जमीन विकल्यानंतर श्रीमंती दाखवण्याच्या मागे लागून आपली वाटचाल गरिबीकडे करत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. जमीन विकून आलेल्या पैशाचा वापर करून आणखी पैसा निर्माण केला तरच श्रीमंती येऊ शकते हे आपण कधीच लक्षात घेत नाही.

हा पैसा जातो कुठं याचा थोडा आढावा घेऊ.
खिशात ५०० ची नोट असेल तर तिचे आपण सुट्टे करण्याचे टाळतो. सुट्टे झाले कि पैसे लवकर संपतात. त्यापेक्षा जमेल तेवढा जास्त काळ ती नोट तशीच ठेवण्याकडे आपला कल असतो. हि सवय बहुतेक मध्यमवर्गीय लोकांना आहे. हाच प्रकार इथे थोड्या वेगळ्या मार्गाने होत आहे. जमीन म्हणजे ती ५०० ची नोट आहे तर ती विकून आलेला पैसे म्हणजे सुट्टे पैसे आहेत. आणि इथं तर कहर असा आहे कि अतिशय भुक्कड गोष्टींसाठी हा पैसा अक्षरशः उधळला जातो.

अधिग्रहणामधे जमिनी जाण्याचे प्रमाण मुख्यत्वे ग्रामीण भागातच आहे. जमिनी विकल्या कि करोडो रुपये हातात येतात. जमीन विकण्याआधी आर्थिक परिस्थितीही बेताचीच असते, त्यामुळे सर्वात आधी श्रीमंत झाल्यावर जे काही करायचंय ती सगळी मौज करण्याचे आपले स्वप्न आपण पूर्ण करायला सुरुवात करतो. यात सर्वात आधी घर बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. एखादी दहा वीस लाखाची गाडी घेतली जाते.

गावात हेवेदावे मोठ्या प्रमाणावर असतात. आणि सर्वांकडे थोड्याफार प्रमाणात हा पैसा आलेला असतो. अशावेळी इतरही बंगले बांधतात. महागड्या गाड्या घेण्याचा सपाट लावतात. मोठी गाडी म्हणजे जास्त स्टेटस या आपल्या मानसिकतेचा हा परिणाम आहे. या हेव्या दाव्यात, एखाद्याने आपल्या पेक्षा महागडी गाडी घेतली कि आपण पहिली गाडी विकून लगेच दुसरी त्याच्यापेक्षा महागडी गाडी घेतो. चाळीस लाखाची गाडी घ्यायची, त्यांनतर सहा महिन्यातच ती २५-३० लाखाला विकायची आणि पुन्हा एखादी पन्नास लाखाची गाडी घ्यायची. हा असला कारभार वर्ष दोन वर्ष चालू असतो.

यानंतर राजकारण येतं. राजकारणात लाखो रुपये खर्च केले जातात. तरुणांना युवा नेते होण्याच्या मानसिकतेने इतकं छळलंय कि त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. मग कार्यकर्ते संभाळले जातात. दहा वीस कार्यकर्त्यांना दररोज जेवण, दारू साठी भरमसाठ पैसा खर्च केला जातो. गावात बॅनरबाजी साठी लाखो रुपये खर्च होतो. ग्रामपंचायत निवडणुकीत लाखो करोडो रुपयांचा चुराडा केला जातो. मुळाशी सारख्या तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी २-३ कोटींचा खर्च होणे हि आता सामान्य बाब होऊन बसलेली आहे. दररोज खर्च होणारा काही हजाराचा पैसा हा पाच वर्षात काही कोटींच्या घरात जातो हे आपल्या लक्षातही येत नाही.

कित्येक तरुण व्यसनापायी लाखो रुपयांचा चुराडा करतात. अशा गावात कालांतराने दारूचे प्रचंड व्यसन जडलेले दिसून येते. कारण सगळेच पैशावाले असताना श्रीमंती दाखवण्याच्या स्पर्धेत हळूहळू Frustration यायला लागतं. आता मी मोठा झालोय, माघार घेणार नाही असल्या मानसिकतेतून थोड्या थोड्या कारणावरून प्रकरणं मोठी व्हायला लागतात. याचा परिणाम व्यसनं जडण्यात होतोच. तुमच्याकडे करोडोंनी खेळाता पैसा असल्यावर चमचे लोक तुम्हाला चिकटून बसतात. त्यांच्या नादात अक्षरशः सगळं विकायची वेळ येते. पण याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, कारण तुम्ही संपलात कि ते दुसरं सावज हेरतात.

या सगळ्या गोंधळात गंमत अशी असते कि आपल्याला पैसे संपेपर्यंत ते संपत आहेत हे कधीच लक्षात येत नाही. आणि अकाउंट मध्ये एवढे पैसे जमा असल्यामुळे आणखी पैसे कमावण्याची आपली इच्छा संपून जाते, किंवा आता कशाला कमवायचं अशा मानसिकतेमधे आपण जातो. यामुळे नवीन उत्पन्नाचे स्रोत आपण तयार करत नाही, आणि आहे ते स्रोत दुर्लक्ष झाल्यामुळे बंद होऊन जातात. आता हातात आलाय तेवढाच पैसा शिल्लक असतो, त्यात वाढ होणार नसते.
एखादी जमीन विकल्यामुळे, किंवा अधिग्रहणात सरकारचे चांगला मोबदला दिल्यामुळे समजा पाच कोटी रुपये आलेत. आपण त्यातले पन्नास लाख घर बांधण्यात खर्च करतो. तरीही साडे चार कोटी राहतात. आपण म्हणतो अजून भरपूर आहेत खात्यात, काही टेन्शन नाही. मग एखादी फॉर्च्युनर घेतली जाते. एखादं ट्रॅक्टर घेतलं जात.. यात पन्नास एक लाख संपतात. तरीही तीन कोटी म्हणजे भरपूर पैसे आहेत अजून. मग राजकारणात उडी घेतली जाते. निवडणुकांत लाखो रुपये उधळले जातात. तरीही दोन अडीच शिल्लकच असतात. मग प्रतिस्पर्ध्याने दोन गाड्या घेतल्या म्हणून आपणही पुन्हा ४०-५० लाखाची गाडी घेतो. अजूनही दोन कोटी शिल्लक असतात. हीसुद्धा खूप मोठी रक्कम असते. आता गावात आपण मोठे घराणे म्हणून मिरवायला लागतो. मग अशा मोठ्या घराच्या हौस मौजही तेवढ्याच मोठ्या असल्या पाहिजे. मग इतर मौज मजेचा खर्च वाढत जातो. हातात पैसे असल्यामुळे चमचे लोक चिकटतात. तुम्ही त्यांचे युवा नेते बनता. मग हे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी दररोज दोन पाच हजार खर्च केले जातात. असं करत करत वर्षभरात एखाद कोटी संपून जातात. दोन तीन वर्षानंतर, आता मात्र अकाउंट मधे एकंच कोटी शल्लक आहे हे पाहून आपली अक्कल जरा ताळ्यावर यायला सुरुवात होते. पण करतंय पण वळत नाही अशी आपली अवस्था असते. बडेजाव मिरवण्याची हौस, राजकारणाचा कीडा, खर्च करण्याची लागलेली सवय… या सगळ्या सवयी तुमचा राहिलेला पैसाही संपवायला लागतात. अशात मग आणखी जमीन शिल्लक असेल तर ती विकायला काढली जाते, आणि तो पैसा मग पुढच्या एक दोन वर्षासाठी कमी येतो. पण अशी जमीन शिल्लक नसेल तर मात्र व्याजाने पैसे घे, उधार घे अशा मार्गांनी पैसे उभा केला जातो…. थोडक्यात काय… तर चार वर्षांपूर्वीचा श्रीमंत आता पुन्हा आपल्या मूळ रूपात आलेला असतो. पण आता उपजिवीकेच साधन असणारी जमीनही नसते, आणि ती विकून आलेला पैसाही नसतो…

आपल्याला रोख पैशाचं प्रचंड आकर्षण आहे. पण खऱ्या संपत्तीचं आकर्षण बिलकुल नाही. जमीन आणि ती विकून आलेला पैसे यातली जमीन हि मोठी संपत्ती आहे, रोख पैशाचा मूल्य जमिनीपेक्षा कमी आहे हे आपण लक्षात घेत नाही. पण हा रोख पैसा हातात आला कि आपण अधाशासारखा तो खर्च करत सुटतो. त्यातून नवीन संपत्ती निर्माण करण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. किमान उत्पन्नाचे काही स्रोत निर्माण करावे असा कधी आपण विचार करत नाही. याचाच परिणाम आपण पूर्वीपेक्षाही जास्त बिकट अवस्थेकडे मार्गक्रमण करत जातो.

जरा जास्त सविस्तर झालंय… पण मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी हि पार्श्वभूमी आवश्यक आहे….

काय करावं? जमिनी तर विकाव्याच लागणार आहेत. मग आलेल्या पैशाचं नियोजन कसं करावं?
याची उत्तरं थोडक्यात पाहुयात, हि उत्तरं खूप थोडक्यात आहे.

 • सर्वात महत्वाचे म्हणजे रोख पैसा आला म्हणजे आपण श्रीमंत झालो हा भ्रम दूर करावा. तुम्ही कालच्याएवढेच आज श्रीमंत आहात उलट आता गरीब होण्याची शक्यता जास्त आहे हे लक्षात घ्या.
 • जमीन विकून आलेला पैसा लगेच कुठेतरी गुंतवून ठेवा. अगदी त्यातला रुपया सुद्धा खर्च करायचा नाही हे ठरवून घ्या. खूपच झालं तर जास्तीत जास्त ५% रक्कम काही महत्वाच्या कामांसाठी खर्च करू शकता. माझ्या एका नातेवाईकाला समृद्धी महामार्गाचे सहा सात कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांना स्पष्टपणे सांगून ठेवले आहे कि हा पैसा लहेच कुठेतरी गुंतवा. या पैशातून शहराजवळ शेतजमीन, शहरात फ्लॅट, शॉप, घेऊन ठेवा. अति निकड असेल तरच थोडाफार पैसा खर्च करा. पण तो आलेल्या पैशाच्या ५% पेक्षा किंवा दहा वीस लाखापेक्षा जास्त नसावा.
 • जमीन विकून आलेला पैसा हा तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची सुवर्णसंधी आहे हे लक्षात घ्या. हा पैसा अशा ठिकाणी गुंतवा कि तेथून तुम्हाला कायमस्वरूपी उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. हि गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवत राहा.
 • चांगल्या लोकेशनला एक दोन शॉप किंवा फ्लॅट घ्या, ते भाड्याने द्या.
 • एखादा लहानसा व्यवसाय सुरु करा, सेल्स चा अनुभ नसेल तर शक्यतो रिटेल व्यवसाय सुरु करावेत, वर्षभरानंतर व्यवसायाचा चांगला अनुभव आल्यानंतर त्यात थोडी गुंतवणूक वाढवून व्यवसाय वाढावा, हा वर्ष दोन वर्षाने गुंतवायचा पैसा तोपर्यंत FD करून ठेवा.
 • काही पैशाचे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवा, फक्त या शेअर्स कडे पुढचे दहा वर्षे ढुंकूनही पहायचे नाहीये हे लक्षात ठेवा, याचा डिव्हीडंड तुम्हाला दरवर्षी काही ना काही उत्पन्न देत राहते. काही पैसा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवून ठेवा.
 • काही माहितीतल्या व्यवसायात गुंतवणूक करा, त्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळत राहील.
 • शहराजवळ काही प्लॉट घ्या. त्यांचे भाव वाढत जातील. शक्य झाल्यास शेतजमीन घेण्याचा प्रयत्न करा. शहराजवळ किंवा बागायत असलेली शेतजमीन कधीही चांगली. अचानक गरज पडल्यास चांगला पैसा मिळतो.
 • गावातल्या स्पर्धेपासून अलिप्त राहा. एकमेकांना मागे टाकण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ नका. इतर कुणी घरासाठी, गाड्यासाठी खर्च करत असतील तर त्यांना टक्कर देण्यासाठी तुम्ही खर्च करू नका. त्यांना आत्ता त्यांची श्रीमंती दाखवू द्या, तुम्ही दहा वर्षानंतर आजच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त श्रीमंत होण्याचे नियोजन करत राहा.
 • राजकारणापासून दूर रहा. राजकारण करायचेच असेल तर या पैशातून करू नका. त्यासाठी आधी पैसा मिळण्याचे स्रोत उभे करा आणि त्यातून हवं तर राजकारणासाठी खर्च करा. पण जमीन विकून आलेला पैशातून रुपयाही वायफळ गोष्टींवर खर्च करायचा नाही हे लक्षात ठेवा.
 • हौस मौज हि कायम मिळत राहणाऱ्या पैशातून करायची असते. जमीन विकून आलेल्या पैशातून नाही हे लक्षात ठेवा.
 • इतर जण पैशाच्या राशीत खेळत असताना, तुम्ही तो पैसा कुठेतरी गुंतवण्याचा भानगडीत पडून आपली हौस करण्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही याचे वाईट वाटू शकते, पण थोडा काळ गरिबी दिसल्याने तुम्ही गरीब होत नाही, उलट तुम्ही तात्पुरत्या श्रीमंतीच्या मागे न लागत कायमस्वरूपी श्रीमंतीसाठी साखरपेरणी करत आहात हे लक्षात असू द्या.
 • आणि जर यातलं काहीच शक्य नसेल तर सरळ सगळं पैसा बँकेत फिक्स डिपॉजिट करा. वर्षाला ६-७% व्याज मिळालं तरी तो खूप पैसा होतो. यातूनही तुम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत राहील, अपेक्षित असलेल्या श्रीमंतीकडे तुम्ही गेला नाही तरी यातूनही चांगलं राहणीमान तुम्ही घडवू शकता. साधं उदाहरण घ्या, एखाद् कोटी रुपये जर फिक्स डिपॉजिट केले तर ६% व्याजदराने वर्षाकाठी सहा लाख रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला ५० हजार झाले. चांगले राहणीमान जगण्यासाठी हि रक्कम सुद्धा भरपूर आहे.
 • एक महत्वाचे म्हणजे, तुमच्याकडे इतका पैसा आला कि तुम्हाला तो पैसा कुठे गुंतवायचा याचे सल्ले देणारे भरपूर भेटतील. पण कुणाचेहि सल्ले न ऐकता तुम्ही स्वतःच योग्य अभ्यास करून निर्णय घ्या. कुणाच्याही सांगण्याने निर्णय घेऊ नका. नाहीतर पुन्हा मागचे मागचे पाढे पन्नास….
 • आलेला एक न एक रुपया कुठेतरी गुंतवायचा आहे एवढं एकंच लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार नियोजन करायचं. हि गुंतवणूक वर सांगितलेल्या मार्गांपेक्षा वेगळीही असू शकते. पण हा पैसा कुठेतरी गुणालाच पाहिजे हे मात्र नक्की करायचं.

थोडं थोडं करता करता हा लेख खूप मोठा झालाय, पण जेवढं मनात आहे ते सगळं लिहायला घेतलं तर आणखी दहा पानं भरतील. हे लिहायला उशीर झाला असं मला सतत वाटतं. कदाचित दोन-तीन महिन्यापूर्वी सुद्धा लिहू शकलो असतो.. पण अजूनही तेवढा काही उशीर झालेला नाही याचंही समाधान आहे.

या लेखामुळे काही घरं जरी दिवाळखोरीपासून वाचली तरी खूप साध्य झालं असं मी समजेल. खास करून समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना जर या लेखाचा फायदा झाला तर नक्कीच मिळणारे समाधान जास्त असेल. कारण सध्या महाराष्ट्रात जमीन अधिग्रहणामुळे प्रचंड प्रमाणात खेळता पैसा हाती आलेल्यात सगळ्यात जास्त संख्या यांचीच आहे. पैशाचे योग्य नियोजन केले तर या लोकांसाठी समृद्धी महामार्ग खरंच समृद्धीचा महामार्ग ठरू शकतो.

जमिनी विकून कुणीही श्रीमंत होत नसतं. जमिनी विकून आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला, योग्य नियोजन केले तर हि आपल्यासाठी श्रीमंतीकडे वाटचाल करण्याची एक सुवर्णसंधी आहे. या संधीच सोनं करा. या दिवाळखोरीच्या पॅटर्नपासून वाचायचे असेल तर संपत्तीचे रूपांतर पुन्हा संपत्तीतच झाले पाहिजे हा नियम काटेकोरपणे आपण पाळायला हवा. आपण दिवाळखोरीच्या पॅटर्न सोडून समृद्धीचा पॅटर्न आत्मसात करायला हवा. अर्थसाक्षरता म्हणजे काही जगावेगळं तत्वज्ञान नसून फक्त श्रीमंतीचा फॉर्मुला आहे. संपत्ती हि खरी श्रीमंती आहे, आणि या संपत्तीतून येणारा पैसा हेच फक्त तुमचे खरे उत्पन्न आणि तेच फक्त खर्च करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, संपत्ती विकून येणारा पैसा हा खर्च करण्यासाठी नसून पुन्हा संपत्तीमध्येच रूपांतरित व्हायला हवा, एवढं जरी आपल्याला कळालं तरी आपल्या बऱ्याच आर्थिक समस्या सुटू शकतात.

धन्यवाद

अर्थसाक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Related Post

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!