लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
काही दिवसांपूर्वी एका वाचकाने टूर्स & ट्रॅव्हल व्यवसायाबद्दल काही लिहिण्याची सूचना केली होती…
मी टूर्स & ट्रॅव्हल व्यवसायातील तज्ञ नाही, पण व्यवसायाबद्दलच्या ७०% बाबी या सारख्याच असतात यामुळे काही गोष्टींवर आपण नक्कीच तटस्थपणे विचार करू शकतो.
टूर्स & ट्रॅव्हल व्यवसाय हा आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. पण यात खूप कमी ब्रँड्स मोठे झालेले दिसतात. बाकीचे ग्राउंड लेव्हल वरच आपापल्यात स्पर्धा करताना दिसतात. नवीन व्यवसायिकांना स्वतःच्या ब्रँड ने नाव कमवायला खूप त्रास होत आहे.
या व्यवसायात योग्य नियोजन अतिशय महत्वाचे आहे. ग्राहक हजारो लाखो रुपये खर्च करून तुमच्या भरवश्यावर प्रवासाला गेलेले असतात. अशावेळी त्यांना योग्य, अपेक्षित व कबुल केल्याप्रमाणे सोयीसुविधा मिळाल्या नाहीत तर ते पुन्हा तुमचे तोंडही पाहणार नाही. सध्या या व्यवसायात ग्राहकांची अशा प्रकारची फसवणूक होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. यामुळेच ग्राहकांचा कल शक्यतो नामांकित कंपन्यांचेच पॅकेज घेण्याकडे जास्त आहे. ग्राहकांना योग्य सेवा न देण्यात नवीन व्यवसायिक जास्त आघाडीवर आहेत. यांनी कमी किमतीत पॅकेज दिलेले असते आणि अशावेळी प्रॉफिट मिळविण्यासाठी सगळ्या सोयी देण्यात टाळाटाळ केली जाते. अशा लोकांचा व्यवसाय जास्त काळ चालत नाही. पण यामुळे इतरही चांगल्या सेवा देणाऱ्या परंतु नामांकित ब्रँड नसलेल्या व्यवसायिकांना सुद्धा फटका बसतोय.
ट्रॅव्हल व्यवसायामध्ये ग्राहकांना योग्य सुविधा देणे हे या व्यवसायाचे मुख्य मर्म आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिसच योग्य नसेल तर व्यवसाय बंद करावा लागेल.
या क्षेत्रात तुम्ही एखाद्या कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊ शकता किंवा स्वतःच्या ब्रँड ने व्यवसाय सुरु करू शकता.
फ्रॅंचाईजी घेणार असाल तर कंपनीची निवड करताना कंपनीच्या ब्रँड वर जाऊ नका, कंपनीचे सर्व्हिस रेकॉर्ड कसे आहे याची माहिती घ्या. ग्राहकांचे कंपनीविषयी काय मत आहे याची माहिती घ्या. या इंडस्ट्रीमध्ये ग्राहक किमतीपेक्षा सर्व्हिस कुणाची चांगली आहे हे पाहत असतो. इथे तुमच्यावर फक्त ग्राहक मिळविण्याचे काम असते. ट्रिप अरेंज करणे, ग्राहकांना गाईड करण्यासारखे बाकी काम कंपनी स्वतःच करते. पण फ्रँचाइजी साठी तुम्हाला गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी लागेल.
दुसरा पर्याय आहे स्वतःच्या ब्रँड ने व्यवसायात पदार्पण करण्याचा. स्वतःच्या ब्रँड ने या व्यवसायात प्रवेश करताना शक्यतो मोठ्या ट्रिप वर भर देऊ नका. बाहेर देशातल्या ट्रिप अरेंज केल्यावर तुमचा ब्रँड एकदम मोठा वाटेल आणि ग्राहक दारात रांग लावतील असे नाही. या व्यवसायात यश ग्राहक तुमचा किती प्रचार करतील यावर ठरते. म्हणून उगाच मोठमोठ्या ट्रिप आयोजित करून खेळखंडोबा झाला तर तुमचे पैसे, तुमचा ब्रँड आणि तुमचे नाव सगळेच डब्यात जाईल. सुरुवातीला लहान लहान ट्रिप आयोजित करून या क्षेत्रातील जास्तीत खाच खळगे माहित करून घ्या. देशांतर्गत ट्रिप आयोजित करा. सुरुवातील काही ठराविक ट्रिप वरच भर द्या. चांगली टीम नियुक्त करा. शक्यतो स्वतः प्रवाशांसोबत राहण्याचा प्रयत्न करा. ग्राहकांनी तुमचा व्यवसाय फक्त तुमच्या ब्रँड ने नाही तर तुमच्या नावाने सुद्धा ओळखला पाहिजे.
या क्षेत्रात ग्राहकांशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. तुम्हाला स्थिरस्थावर व्हायला किमान दोन वर्षे लागतील. तोपर्यंत तुम्ही ग्राहकांना किती चांगली सेवा देता यावर तुमचे भवितव्य ठरेल. चांगले हॉटेल निवडणे, चांगली राहण्याची सोय करणे, प्रवाशांच्या सामानाची काळजी घेणे, प्रवाशांना चांगले गाईड पुरवणे, काही आणीबाणीच्या परिस्थितीत पॅकेज मधे नसलेल्या सेवा सुद्धा पुरवणे यासारख्या बाबी ग्राहकांना समाधान देतात. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यामुळे प्रवाशांना तुमच्यासोबत असताना सुरक्षित वाटते, आणि ते भावनिकतेने तुमच्याशी जोडले जातात. महिला प्रवाशांकडे विशेष लक्ष द्यावे. त्यांच्यासाठी प्रशिक्षित महिलांची नेमून करण्याचा प्रयत्न करावा. प्रवाशांसोबत जे गाईड पाठवलेले असतील त्यांची पार्श्वभूमी चांगली माहित करून घ्यावी. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक तात्काळ दूर करावेत. यासारख्या प्रयत्नांनी तुमचा ब्रँड डेव्हलप व्हायला मदत होते.
काही वर्षांपूर्वी माझे काही मित्र नेपाळ दौऱ्यावर गेले होते. पण त्यावेळी नेपाळ मध्ये काही कारणांनी दंगली चालू होत्या. ट्रिप मधेच थांबवावी लागली. प्रवाशांना पुढे काय करायचे याच्या सूचनाही देणारे कुणी नव्हते. ट्रिप आयोजकाने त्यांना पुढची कोणतीही सोय करून दिली नाही. प्रवाशांना आपापल्या पद्धतीने मार्ग काढून पुन्हा माघारी परतावे लागले. आता अशा परिस्थितीत परत ते प्रवाशी संबंधित ट्रिप आयोजकांकडे कधीही ग्राहक म्हणून जाणार नाही. नाही कुणाला त्याची सेवा घयायला सांगतील. अशा प्रकारे धंदा केला तर वर्ष दोन वर्षापेक्षा जास्त काळ तुमचा निभाव लागणे कठीण आहे. लोकांना तुमची सेवा आवडली तर ते नक्कीच इतरांनाही तुमचे नाव सुचवतील.
प्रवासाच्या पारंपरिक गोष्टींसोबतच भटकंतीचे प्रकार सुद्धा आता बदलत आहेत. जी ठिकाणे शक्यतो लोकांच्या नजरेत नसतात अशी ठिकाणे बघण्याकडे कल वाढत आहे. मान्सून ट्रिप, ट्रेकिंग यासारख्या ट्रिप चे प्रमाण वाढत आहे. पावसाळ्यात मी स्वतः माझ्या बाईक वर सह्याद्रीच्या घाटांत भटकंती करत असतो. दरवेळी काहीतरी नवीन ठिकाण पाहणे हा माझा छंद आहे. असंच इतरांचही आहेच. म्हणजेच लोकांना काय हवंय याचा थोडाफार अंदाज आपण आपल्याला काय हवंय यावरूनही घेऊ शकतो. कित्येक फिरस्त्यांचा जास्त गर्दी नसलेली ठिकाणे निवडण्याकडे कल वाढतोय याचाही विचार करावा. पुरातन शिल्पे, मंदिरे यासारख्या ठिकाणांना विशेष टार्गेट करावे.. हे मार्केट अजूनही कुणाच्या नजरेसमोर नाही. काहीतरी Adventurous (साहसी) करण्याची उर्मी प्रत्येकात असते, त्याअनुषंगाने ट्रिप आयोजनाचा विचार करावा. ग्राहकांना कायम काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करा. जे इतरांकडे भेटत नाही ते तुमच्याकडे असेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहा. ग्राहकांना कायम काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करा. जे इतरांकडे भेटत नाही ते तुमच्याकडे असेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहा.
फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा. कॉमन कॅटेगरी पेक्षा स्पेशल कॅटेगरी मध्ये जाण्याचा प्रयत्न करा. तुमचे स्पर्धक कशावर जास्त भर देतात आणि कशाकडे दुर्लक्ष करतात याचा अभ्यास करा. त्यांचे ज्या क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे ते तुमचे प्राथमिक मार्केट आहे. एकदा ब्रँड तयार झाल्यावर मग हळूहळू स्पर्धकांच्या क्षेत्रात सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न करा. तसेच आवश्यकतेनुसार ट्रिप आयोजनाची सेवा द्या. म्हणजे एखाद्याचे बजेट किती आहे, एखाद्याला किती दिवसांची ट्रिप हवी आहे, किंवा कुणाला काही खास ट्रिप ची अरेंजमेंट करायची आहे यावर अभ्यास करून चांगले पॅकेज तयार करा. ग्राहकांना जेवढ्या गोष्टी सोयीच्या होतील तेवढे ते तुमच्याकडे आकर्षित होतील.
आणि सर्वात शेवटी म्हणजे तुमचे प्रेझेन्टेशन चांगले ठेवा. ऑफिस चांगले स्वच्छ ठेवा. ग्राहकांना हॅण्डल करण्यासाठी शक्यतो स्वतः उपलब्ध राहा, किंवा चांगले प्रतिनिधी नियुक्त करा. आणि योग्य मार्केटिंग वर भर द्या.
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील