उद्योजकांच्या समृद्धीकडे पाहताना त्यांचे कष्ट सुद्धा पहा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

समस्येवर तक्रार करणारे हे नेहमीच अपयशी असतात. पण यांतीलच एखादा तक्रार करण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधतो, त्यावर अंमल करतो आणि स्वतःची प्रगती साधतो… आणि त्याचे मोठेपण पाहून हे तक्रारकर्ते त्याचा तिरस्कार करायला लागतात. कारण आपण यशस्वी होऊ शकत नाही हे त्यांना माहित असते आणि दुसरा यशस्वी झालेला त्यांना बघवत नसते. तो आपल्यातूनच उभे गेलाय हे त्यांच्या लक्षातही येत नाही, अशा मोठ्या लोकांचा आदर्श घ्यायला सांगाव तर त्याची प्रगती हे नशिबाचा भाग आहे असे सांगून ते झिडकारतात, त्यांचे उदाहरण द्यायला जावे तर आम्हाला शिकवू नका आम्ही वर्षानुवर्षे हेच केलंय एवढीच कॅसेट वाजवतात, काही नवीन सांगायला जावं तर भाषेची पातळी सोडतात, काही सल्ला द्यावा तर तुमची अक्कल काढतात… आमची समस्या हि दुसऱ्याची देण आहे अशा अविर्भावात जगतात, पण समस्या सोडवण्यासाठी काडीचाही प्रयत्न करत नाहीत. हे तक्रारकर्ते नेहमीच अपयशी ठरतात. आणि आपल्या अपयशासाठी ज्यांनी समस्येवर उपाय शोधून आपली प्रगती साधली आहे अशांना जबाबदार धरतात…

अशा समस्यांना उद्योजकांना नेहमीच सामोरे जावे लागते. हे उद्योजक आपल्यातलेच आहेत, कष्ट करून मोठे झालेत याच्याशी या तक्रारकर्त्यांना काहीही देणे घेणे नसते, उद्योजक आपल्यापेक्षा श्रीमंत होतात हि खंत या लोकांना असते… पण उद्योजक हे स्वतःच्या हिमतीवर मोठे झालेले असतात हे तक्रारकर्ते विसरतात, किंबहुना त्यांना ते पाहायचेच नसते. मग या उद्योजकांची संपत्ती जप्त करून आमच्यात वाटप करा असली हाकाटी पिटतात… पण हि संपत्ती जप्त करण्यापेक्षा तुम्ही स्वतः मैदानात उतरा म्हटलं तर त्याला लगेच ‘गरिबांचा द्वेष’ ठरवून मोकळे होतात. आमच्या अंगावर काहीही आले नाही पाहिजे, आम्ही गरीब आहोत म्हणजे देश आम्हीच चालवतो असा यांचा अविर्भाव असतो… पण उद्योजक आहे म्हणून देशाची तिजोरी भरते हे यांच्या गावीही नसते.

देशांतर्गत असो किंवा देशाबाहेर येणार जाणारा प्रत्येक माल हा उद्योजकाच्या कंपनीतून आलेला असतो. घरातील टाचणीपासून प्रत्येक गोष्ट उद्योजकाची देण असते, देशाला मिळणार सर्वात जास्त कर हा उद्योजकांमुळे मिळत असतो. जगभरात मिळणाऱ्या ९९.९९% गोष्टी या एखाद्या कंपनीतूनच आलेल्या आहेत. जगभरात नोकऱ्या देणारे सर्वात मोठे माध्यम हे कंपन्याच आहेत. कंपन्याच नसतील तर नोकऱ्या निर्माण होणार कशा ?

आपल्याकडे उद्योजकांचा तिरस्कार करण्याची एक नवीच टूम मार्केटमध्ये आलेली आहे. एखादा श्रीमंत दिसला कि त्याच्यावर लगेच भ्रष्टाचाराचा, लुटारूचा शिक्का मारून मोकळे व्हायचे.. वा रे हुश्शार. अशांनी एखादा घरगुती व्यवसाय सुरु करून दाखवावा. आठ दिवसात अक्कल ठिकाण्यावर येईल.

उद्योजक हे काही निवांत ऑफिस मध्ये बसून काम नाही करत. प्रचंड मेहनत करतात. दिवसदिवस खरेदीदार शोधात फिरतात. कस्टमर कडून चांगली ऑर्डर येण्यासाठी त्यांचे चोचले पुरवतात. कधी कधी पहिले तीन चार वर्ष तर उद्योजक त्याचा कामगाराच्या पगाराएवढं सुद्धा कमवत नसतो. गरिबीतून उद्योगविश्व निर्माण केलेल्यांची कथा तर सांगायलाच नको. १०-१२-१५-२० तास उद्योजक आपल्या कंपन्यात काम करतात. इथे लेबर साडे पाच वाजायला लागले कि १० मिनिटे आधीच उठायला सुरुवात करतात, पण कंपनी मालकाला ती सोय नसते, जोपर्यंत सगळे काम संपत नाही तोपर्यंत त्याला सुट्टी घेता येत नाही, कधीकधी स्वतः लेबर बनून काम करावं लागतं. पेमेंट वसूल करण्यासाठी चकरा मारायच्या, कर्जाचे हफ्ते थकू द्यायचे नाही, लेबर चे पेमेंट थांबवू शकत नाही, प्रत्येक महिन्याचे प्रोडक्शन संपलेच पाहिजे, यात अडचणीच्या काळात घराकडे लक्ष देता येत नाही, काही वेळेस पैशाची कमतरता इतकी असते घरच्यांच्या गरजा सुद्धा पुऱ्या करता येत नाही… या सगळ्या दिव्यातून जाऊन जर आमचा उद्योजक श्रीमंत होत असेल तर तो त्याचा हक्क आहे. श्रीमंत होणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि उद्योजकाचा तर आहेच आहे. कुणाला अशा उद्योजकांचा त्यांच्या समृद्धीमुळे तिरस्कार वाटत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे उद्योजकांचा नाही…

अशांनी एकदा उद्योजक व्हायचा प्रयत्न करून पाहाव मग उद्योजकांबद्दल बोलावं. हा वर्ग सगळं सहन करतो. राजकरण्यांचे हफ्ते देतो, सरकारी अधिकाऱ्यांचे हफ्ते देतो, लेबर कॉन्ट्रॅक्टर ची दहशत सहन करतो, लेबर चा माज सहन करतो, घरून साथ नसेल तर ते टेन्शन वेगळेच, वर्गण्या, देणग्या.. कुणाकुणाचे चोचले पुरवावेत?. एवढं सगळं करूनही उद्योजकच गुन्हेगार ? आपल्या घरातली एक न एक गोष्ट उद्योजकांमुळे आहे. आपली प्रत्येक प्रगती उद्योजकांमुळे आहे. इथल्या ९०% नोकऱ्या सुद्धा उद्योजकांमुळेच आहेत…

उद्योजक हा हत्तीसारखा आहे.. तो त्याच्या कामात असतो. आसपास काय चाललंय, कोण काय म्हणतंय याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नसत. तो कुठेही कधीही स्वतःला सामावून घेऊ शकतो… तक्रारकर्ते तक्रार करत राहतील त्यांच्यातीलच काही शहाणे उद्योजक बनत राहतील…

हो.. आम्ही उद्योजक.

उद्योजक व्हा..
समृद्ध व्हा…
__

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “उद्योजकांच्या समृद्धीकडे पाहताना त्यांचे कष्ट सुद्धा पहा

  1. Hiii sir mala plastic bottles scrap baddl mahiti havi hoti sampurn mahiti havi local market pasun te plastic bottles import kashya karychya ith parynt aani te kuth aani kashya vikychya tyanche plant pune kiva jvl kuth aahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!