मोबाईल टॉवर उभारण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मोकळ्या जागेवर, छतावर मोबाईल टाॅवर बसवा, लाख रुपये महीना भाडे, ९० लाख अॅडव्हांस, नोकरी, नोटरी अॅग्रीमेंट…

अशा जाहिरातींना भुलुन हजारो लोक आजपर्यंत लाखो रुपयांना लुबाडले गेले आहेत. घरबसल्या आणी विनाकष्ट लाखो रुपये कमावण्याच्या आपल्या विचीत्र मानसिकतेचा या लोकांकडून पुरेपुर वापर केला जातोय. फसलेले लोक सुद्धा अपमानाच्या भीतीने कुणाला सांगत नाहीत. यामुळेही या टॉवर वाल्यांच फावतंय.

मोबाईल टॉवर कसे उभे राहतात, त्याची जागा कशी निश्चित केली जाते हे आधी माहित करून घ्या

 कोणतीही मोबाईल कंपनी स्वतःचे टॉवर उभारत नाही
 खूपच गरज असेल तर कंपनी स्वतःचे टॉवर उभारते. पण याचे प्रमाण ५% पेक्षा जास्त नाही.
 टॉवर उभारणाऱ्या, सांभाळणाऱ्या वेगळ्या कंपन्या आहेत. या कंपन्या फक्त टॉवर उभारतात, आणि मेंटेन करतात. मोबाईल कंपन्या भाडे देऊन या टॉवर वर आपले सर्व्हर बसवतात. देशातील एकूण मोबाईल टॉवर पैकी जास्तीत जास्त ५% टॉवर या कंपन्यांच्या थेट मालकीचे असतील. म्हणजेच एखाद्या ठराविक कंपनीला टॉवर उभारण्यासाठी मोकळी जागा हवी आहे हा मुद्दाच निकाली निघतो.
 फक्त तुमची स्वतःची जागा आहे म्हणून कोणतीही कंपनी तुमच्या जागेवर टॉवर बसवत नसते.
 एखाद्या ठिकाणी कंपनीला स्वतंत्र सर्व्हर बसवायचे असतील तर आधी कंपनीची नेटवर्क टीम सर्व्हे करते, त्यातून एक सेंटर पॉईंट निवडतात, त्याठिकाणी एखादा टॉवर आहे का पहिले जाते. जर टॉवर असेल तर तिथेच स्वतःच्या मशिनरी बसवते, जर टॉवर नसेल तर जी जागा सेंटर पॉईंट म्हणून निवडलेली आहे तेथील रहिवाश्यांना संपर्क करून जागा भाड्याने देण्याची मागणी करते. यासाठी डिपॉजिट हे नसतेच किंवा खूप कमी असते. भाडे १५-२५ हजाराच्या दरम्यान असते.

हि आहे मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारण्याची थोडक्यात हकीकत….

आता तुम्ही कसे फसवले जातात हे पहा.

 हे लोक वर्तमानपत्रात जाहिराती देतात. सरकारमान्य कंपनी, घराच्या छतावर, मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर बसावा, ९५ हजार भाडे, ९० लाख डिपोषित…
 या जाहिराती पाहून तुम्ही या टॉवर वाल्यांना संपर्क केला कि त्यांची एक टीम तुमच्याकडे सर्व्हेसाठी येते
 सर्व्हे करून झाला कि तुम्हाला एखाद्या मोबाईल कंपनीच्या लेटरहेड वर शिक्का मारून संमतीपत्र (approval letter) देते.
 त्यांची देहबोली, शब्दरचना, प्रेझेन्टेशन पाहून हे लोक खरंच कंपनीकडून आलेत याची तुम्हाला खात्री पटते.
 कंपनीच्या लेटरहेड वर शिक्का मारून संमतीपत्र असल्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास बसलेला असतो.
 यानंतर काही दिवसांनी तुम्हाला तुमचे व तुमच्या जागेचे सर्व कागदपत्र मागितले जातात.
 तुम्ही कागदपत्र पाठवल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला त्यांच्या कडून एक कागदपत्रांचा गठ्ठा येतो.
 त्यात एक नोटरी करायचे अग्रीमेंट, नियम व अटींची लिस्ट, कंपनीचे प्रमाणपत्र, तुम्हाला मिळणाऱ्या ९० लाख रुपयाच्या चेक ची झेरॉक्स, कंपनीची पूर्ण माहिती देणारे ब्रोशर इत्यादी कागदपत्रे असतात.
 याचबरोबर हे नोटरी अग्रीमेंट करताना त्यामधे तुम्ही त्यांना ३५-४५-५५ हजार रुपये भरणार असल्याची एक ओळ असते. हे पैसे तुमची रजिस्ट्रेशन फी असल्याचे सांगितले जाते. लाखो रुपये मिळणार म्हटल्यावर तुम्ही हजारो रुपये नकळत देऊन बसता.
 यानंतर पुन्हा एकदा काहीतरी कारण सांगून तुम्हाला २५-३० हजार रुपयांची मागणी केली जाते. ते तुम्ही भरले कि ते लोक तुम्हाला पुन्हा संपर्क करत नाहीत.
तुम्ही कितीही पाठपुरवठा केला तरी ते तुम्हाला काही प्रतीसाद देत नाहीत. यांचे ऑफिस असते नोएडा मध्ये, तुम्ही ज्या अकाउंट मध्ये पैसे भरलेले असतात ती बँक असते कोलकात्याची… अशावेळी तुम्ही पोलीस तक्रार केली तरी काही फायदा होत नाही. कारण या लोकांचे कोणतेही धागेदोरे शोधणे अशक्य असते.

हि झाली तुमच्या फसवणुकीची हकीकत….

हे प्रकार मला इतक्या खोलवर माहित असण्याचे कारण म्हणजे माझ्याकडे तीन चार वर्षे MTS या टेलिकॉम कंपाईची फ्रँचाइजी व डिस्ट्रिब्युशन होते. त्यावेळी आमच्याकडे MTS टॉवर च्या नावाखाली फसवले गेलेले किमान ४-५ लोक येऊन गेलेले आहेत. याचबरोबर माझा कायदेशीर बाबीतला अभ्यास असल्यामुळे आणि व्यवसाय क्षेत्रात असल्यामुळे बरेच जण या नोटरी अग्रीमेंट चे पेपर घेऊन माझ्याकडे आलेले आहेत. त्यांना मी वेळीच थांबवले म्हणून त्यांचे हजारो लाखोंचे होणारे नुकसान वाचले.

पण ५-७ जणांना वाचवून नक्कीच या एकूण फसवणुकीवर परिणाम होणार नाहीये. आजही शेकडो लोक यांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांनाही सावध करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून हा लेख.

घरबसल्या पैशाच्या नादाला लागून आजपर्यंत हजारो जण या लोकांच्या जाळ्यात अडकले आहेत. असल्या फसवणुकीचे प्रकार वारंवार समोर येत असूनही कित्येकांना यावर अजुनही विश्वास बसत नाही. आपण सर्वांनी याबद्दलची सत्यता आपल्या जास्तीत जास्त मित्र परिवारांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. प्रत्येकाकडून एकाचे प्रबोधन झाले तरी आपण काही हजार लोकांना या जाळ्यात अडकण्यापासून वाचवू शकतो.
आणि घर बसल्या पैशाचे आमिष सोडले तर आपण कोणत्याही फसवणुकीपासून आपले संरक्षण करू शकतो.


_______________________

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!