श्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात ?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

श्रीमंती…

श्रीमंती म्हणजे काय ?
श्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात ?
श्रीमंत होण्यात आपण कुठे कमी पडतोय ?

आपल्या मध्यमवर्गीय वर्गाला ला श्रीमंत लोकांचे खूप आकर्षण असते, तरुणपणात तर प्रत्येकाला आपल्याकडे पैशांच्या राशी असाव्यात असे वाटते. श्रीमंतीची स्वप्ने रंगवण्यात तर आपला हात कुणीच धरू शकणार नाही. पण वयाच्या पस्तिस चाळीशी नंतर आपल्यापैकी ९०% जणांच्या लक्षात येते कि आपल्याला अपेक्षित असलेली श्रीमंती आपल्या आवाक्यात नव्हती, ते फक्त एक स्वप्न होते आणि पुढचे आयुष्य आता आपल्याला मध्यमवर्गीय म्हणूनच जगावे लागणार आहे.
या ट्रॅजेडी चे कारण खूप काही मोठे नसते. फक्त, आपण श्रीमंती म्हणजे काय हे कधी माहीतच करून घेतलेले नसते इतकेच. आपल्या दृष्टीने श्रीमंती म्हणजे पैसा. दररोज हाती येणारा पैसा. मग आपण पैसे कमवायचा मागे लागतो. पण कितीही कमावला तरी तो पुरतंच नाही. तुम्ही पैसा कमवत राहता आणि तो खर्च होत राहतो. दहा वीस वर्षे भरमसाठ काम करूनही ज्यावेळी आपल्यासमोर तेच आयुष्य उभे ठाकलेले असते त्यावेळी आपण काय चुकलं याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

श्रीमंत व्हायचे असेल तर आधी श्रीमंती म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. श्रीमंत लोक श्रीमंत का होतात याचा अभ्यास केला पाहिजे. पैसा आणि श्रीमंती यातला फरक ओळखता आला पाहिजे. नुसता पैसा असणे याला आपण सधन म्हणतो श्रीमंत नाही.

शंभर रुपयांची नोट तशीच संभाळुन ठेवली तर दहा वर्षानीसुद्धा ती शंभर रुपयांचीच असेल, आणि मुल्य ५०% नी घटलेलं असेल…. म्हणजेच आजच्या ५० रुपयांएवढं तीच मुल्य असेल… किंवा त्यापेक्षाही कमी असेल. म्हणजे तुम्ही आत्ता १०० रुपयांएवढे श्रीमंत असाल तर दहा वर्षांनी ५० रुपयांएवढेच श्रीमंत असाल.

पण याच शंभर रुपयांची संपत्ती विकत घेतली तर दहा वर्षानी ती दीड दोन हजार रुपयांची असेल… सोबत दरवर्षी तुम्हाला काहीतरी उत्पन्न देत राहील… म्हणजे आज तुमची श्रीमंती शंभर रुपयांची असेल तर ती पुढच्या दहा वर्षात दोन हजार रुपयांची झालेली असेल.

हाती रोख पैसा असणं म्हणजे श्रीमंती नाही… संपत्ती म्हणजे श्रीमंती… संपत्ती निर्माण करणारे श्रीमंत होत असतात…

जमीन विकुन हाती पैसा आला म्हणजे तुम्ही श्रीमंत झालात असे नाही, उलट जमीन हि तुमची संपत्ती होती, तुम्ही त्या संपत्तीचे फक्त पैशात रुपांतर केले… आता हा पैसा पुन्हा कुठेतरी गुंतवुन वाढवला तर ठीक नाहीतर मोठं घर बांधायचं, गाडी घ्यायची, चौकाचौकात बॅनर बाजी करायची, उगाच मौजमजा करत खर्च करत राहीलात तर काही काळाने तो पैसा संपुनही जाईल… तेच जर तुम्ही त्या जमीनीवर काही व्यवसाय सुरु केला किंवी ती भाड्याने दिली, किंवा ती विकून आलेल्या पैशातून आणखी काही प्रॉपर्टी खरेदी केल्या आणि त्या भाड्याने दिल्या तर ती संपत्ती तुम्हाला कायमस्वरूपी परतावाही देईल, सोबत तीचे मुल्य वाढत असल्यामुळे तुमची दिसणारी पण खरी श्रीमंतीसुद्धा वाढत जाईल…

यापेक्षाही सोपं उदाहरण पाहू… जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेझाॅस, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग किंवा भारतातील मुकेश अंबानी… हे लोक श्रीमंत आहेत म्हणजे काय?? तर यांची गुंतवणूक ज्या कंपन्यांत आहे त्या कंपन्यांचे शेअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणुन यांची श्रीमंती वाढत आहे… सोबत ही गुंतवणुक त्यांना डिव्हीडंट च्या रुपात वर्षाला करोडो रुपये सुद्धा देते… म्हणजे ही संपत्ती स्वतः वाढतेच सोबत दरवर्षी काहीतरी अतिरीक्त परतावाही देते… श्रीमंत लोक श्रीमंत आहेत म्हणजे त्यांना दररोज करोडो रुपये हातात येतात असे नाही, तर त्यांची जी संपत्ती आहे ती दररोज कणाकणाने वाढत आहे आणि त्यांना दररोज अधिकाधिक श्रीमंत बनवत आहे.

जगातील १३ क्रमांकाचे श्रीमंत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची श्रीमंती दररोज वाढत आहे, याचा अर्थ असा होत नाही कि ते दररोज कुठूनतरी पैसा गोळा करत आहेत. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच धीरूभाई अंबानी यांनी तीस चाळीस वर्षांपूर्वी ज्या कंपन्यात आपली काही हजार व लाखांची वा कोटींची गुंतवणूक केली होती त गुंतवणूक आज काही लाख कोटींच्या घरात गेली आहे. सोबत हि गुंतवणूक डिव्हीडंड च्या रूपात अंबांनी दरवर्षी काही करोडोंचा परतावा देते ते वेगळेच. आलेल्या परताव्यातून अंबानी आणखी काही कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक करतात आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून आपली संपत्ती वाढवत राहतात. जगातील प्रत्येक श्रीमंत व्यक्ती हाच नियम वापरातो. पण प्रत्यकाचेच उदाहरण द्यायचे तर आपल्याला दिवसही कमी पडेल…. म्हणून तूर्तास अंबानी हे आशियातील सर्वश्रीमंत व्यक्तीचे उदाहरण सुद्धा पुरेसे आहे.

मारवाडी, गुजराती लोक काय करतात?? जमीनी, घरे, फ्लॅट घेणे हे यांचे आवडते काम… लहानातील लहान व्यवसायीक किमान काही शे कोटींच्या संपत्तीचा मालक असतो… कारण?? कारण तो आलेला पैसा लगेत जमीनीमधे गुंतवत जातो, किंवा घर फ्लॅट अशा शहरी भागातील प्राॅपर्टी मधे गुंतवुन ठेवतो…. काही जण शेअर्स मध्ये गुंतवणूक करून ठेवतात. ते त्यांची संपत्ती वाढवतात. श्रीमंत व्हायचं असेल तर या लोकांना गुरुस्थानी ठेउन त्यांचे गुण अवगत करा…

माझ्या अकाउंट मध्ये आज एक लाख रुपये असणे आणि माझी एक लाखाची एखादी जमीन असणे यात मी जमीन हाती असताना जास्त श्रीमंत असतो, रोख रक्कम हाती असताना नाही. इतरांच्या (खास करून उद्योजकांच्या, गुंतवणूकदारांच्या) श्रीमंतच्या द्वेष करण्यापेक्षा आपण ते श्रीमंत कसे होतात याचा अभ्यास करायला हवा.

पैसा हाती आला कि त्यापैकी जास्तीत जास्त लगेच कुठेतरी गुंतवून टाकावा हा श्रीमंतीच्या मार्गावर चालण्याचा पहिला नियम आहे. ज्या ज्या मार्गाने तुम्हाला उत्पन्न मिळू शकते अशा प्रत्येक मार्गावर आपली गुंतवणूक करत जावी. हि गुंतवणूक पैसा निर्माण करणारी असावी खर्च वाढवणारी नाही याची मात्र काळजी घ्या. प्लॉट घेतला तर त्याचे मूल्य या वाढतच जाणार आहे, फ्लॅट घेतला असेल किंवा एखादे शॉप घेतले असेल तर ते लगेच भाड्याने द्यावे जेणेकरून ते तुम्हाला कायमस्वरूपी उत्पन्न देत राहीन, आणि स्वतःच्या किमतीतही वाढ करत राहील. शेअर्स घेतले तर ते किमान दहा वीस वर्ष तसेच ठेवण्याच्या उद्देशाने घ्यावेत. कुणाच्या व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर तीच्याकडे फक्त कायम उत्पन्न देणारी गुंतवणूक म्हणूनच पाहावे व फक्त उत्पन्न घेत राहावे… अशा विविध मार्गांनी तुम्ही स्वतःची गुंतवणूक वाढवू शकता, त्यातून उत्पन्न घेत राहू शकता आणि त्या संपत्तीचे कायम वाढणाऱ्या मूल्यामुळे तुम्ही सतत सुद्धा श्रीमंतीचे नवनवे टप्पे पार करू शकता.

याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्ही जो पैसा कमावताय त्याचा पुरेपूर उपभोग घेता आला तरच तुम्हाला स्वतःला श्रीमंत म्हणवून घ्यायचा अधिकार असतो. तुम्ही काम करत नसतानाही तुमच्या अकाउंट मध्ये पैसा जमा होत असेल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत होण्याच्या मार्गावर असतात. तुम्ही उद्यापासून काम करणे बंद केले तर पैसा येणेही बंद होईल अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे लक्षात घ्या. फक्त हाती पैसा असणे म्हणजे सधनता… आणि त्या पैशाचा पुरेपूर उपभोग घेता येणे म्हणजे श्रीमंती. हि श्रीमंती गुंतवणुकीतून येते. गुंतवणूक तुम्हाला तुम्ही काहीही करत नसतानाही पैसा देत राहते. याचा आणखी एक फायदा म्हणजे वेळ. कायम उत्पन्न देणारी गुंतवणूक तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायला आणि नवनवीन प्रकल्पांवर काम करायला पुरेसा वेळ उप[लुब्ध करून देते. अर्थातच तुमची संपत्ती वाढवायला मदत करते.

श्रीमंत व्हायचे असेल तर संपत्तीला महत्व द्या… पैशाला नाही…
पैसा निर्माण करणारी संपत्ती निर्माण करा…
संपत्ती जमवली, वाढवली की पैसा आपोआप वाढतो…

(या विषयावर रॉबर्ट कियोसाकी यांचे ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. आपल्या अर्थविषयक संकल्पना मुळापासून धक्का देऊन हादरवून टाकणारे त्यांचे श्रीमंतीचे नियम आपल्याला नवी दिशा नक्कीच देतात. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी https://amzn.to/2I7bDDQ या लिंक वर क्लिक करू शकता)

अर्थसाक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

5 thoughts on “श्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!