लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
थोडं मार्केटिंग व ब्रॅण्डिंग बद्दल बोलूया
पण आजचा विषय कोणत्याही मोठ्या कंपनीबद्दल नसेल, किंवा कोणत्याही मोठ्या स्ट्रॅटेजी बद्दल नसेल. आज मार्केटिंग व ब्रॅण्डिंग बद्दल बोलण्यासाठी मी अतिशय दुर्लक्षित आणि लहान व्यवसाय निवडले आहेत. ते व्यवसाय आहेत
१. उसाच्या रसाची हातगाडी
२. बुढ्ढी के बाल (खायचे बरका)
३. खारे शेंगदाण्याची सायकल
काह दिवसांपूर्वी असंच शहरात चाललो असताना एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीमध्ये एक उसाच्या रसाची गाडी लावलेली दिसली. गाडीशेजारी येत २७-२८ वर्षाचा मुलगा मांडी घालून बसलेला होता आणि मोबाईलवर काहीतरी करत होता. तो त्या गाडीचा मालक आहे यात शंकाच नव्हती. एक दीड तासाने पुन्हा शहरातून घरी येताना त्याच रस्त्याने आलो, तर तो मुलगा त्यावेळीसुद्धा त्याच जागेवर तसाच मांडी घालून बसलेला, हातात मोबाईल, आणि गाडी शेजारी लावलेली. त्याला धंद्यापेक्षा मोबाईल वर टाईमपास जास्त हवाहवासा वाटत होता, किंवा त्याला कदाचित तो व्यवसाय बळजबरीने करावा लागत असेल, पण त्याच्याकडे ग्राहक नसल्यामुळे तो बसून होता हे निश्चित …..
असो, माझा मुद्दा आहे तो इतक्या वेळानंतरही त्याच्याकडे गिऱ्हाईक का नसतील आले ? किंवा उसाची गाडी हि उन्हाळ्यात गिऱ्हाईकांनी ओसंडून वाहायला हवी, पण इथे तर कुणीच दिसत नव्हते. कारण काय असावे ? काही उसाच्या गाडीचा व्यवसाय करणारे आजही दिवसाला किमान हजार रुपये निव्वळ कमावतात, पण हा तर नुसताच बसून गिऱ्हाईकांची वाट बघत होता याचे कारण काय? याचे कारण आहे या व्यवसायासाठी सुद्धा मार्केटिंग जाहिरात आवश्यक आहे याचा पडलेला विसर.
छोटा व्यवसाय आहे म्हणून त्याला मार्केटिंग जाहिरात स्ट्रॅटेजी नसते हा घोर गैरसमज आहे.
आता वर सांगितलेल्या तीनही व्यवसायांकडे वळू.
उसाची गाडीची एक खास ओळख आठवतेय कुणाला ? ती ओळख आहे घुंगरू. घुंगराचा एका लयीत येणारा आवाज. आजही ग्रामीण भागात, जत्रेत उसाच्या गाडीला घुंगरू जोडलेले असतात. त्या घुंगराचा आवाज ऐकला कि आपण नकळतपणे त्या गाडीकडे वळतो. हे घुंगरू आपण लहानपणापासून ऐकत आलोय. आजही तशा पद्धतीचा घुंगराचा आवाज एखाद्या गाडीवर ऐकला कि आपण नकळतपणे रस प्यायला त्याच्याकडे वळतो. कारण घुंगराचा आवाज आणि उसाचा रस हे समीकरण आपल्या डोक्यात आणि मनात लहानपणापासून घट्ट बसलेले आहे. अगदी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्यासारखे. म्हणूनच गाडीवरचा घुंगराचा आवाज ऐकला कि आपल्याला मनातून रस प्यायची इच्छा होते. हीच असते मार्केटिंग स्ट्रॅटेजी. जी गोष्ट लोकांना तुमच्या उत्पादनाकडे आकर्षित करते तिलाच मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणतात.
आता याच प्रकारे बुढ्ढी के बाल आणि खरे शेंगदाणे यांची ओळख आठवा…. ती आहे बुढ्ढी के बाल विकणार्याच्या हातात सारखी वाजवणारी घंटी, आणि शेंगदाण्याच्या सायकल वर वाजणारा हॉर्न वजा छोटा भोंगा. हे दोनीही आवाज ऐकले कि आपण नकळतपणे त्याकडे ओढले जातो. वयोमानानुसार बुढ्ढी के बाल च आकर्षण कमी होत असेल पण शेंगदाण्याच्या बाबतीत नक्कीच आजही आपण तितकेच हौशी असल्यासारखे शेंगदाणे खात असतो. सायकलवरचा भोंगा ऐकल्यावर आपल्याला भूक लागलेली आहे म्हणून आपण शेंगदाणे विकत घेत नाही तर आपलं मन आपल्याला त्यासाठी प्रवृत्त करत असत, कारण तो आवाज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला असतो. शेंगदाणे विकणारा सायकलवरून शेजारून शांतपणे गेला तरी आपल्याला शेंगदाण्याची इच्छा होणार नाही, पण त्याच्या सायकलच्या भोंग्याचा आवाज ऐकला तर आपण लगेच खिशात सुट्टे पैसे आहेत का याची चाचपणी सुरु करतो. घुंगरू, घंटी, भोंगा हे तीनही आवाज हे त्या त्या व्यवसायाची ओळख आहे, वर्षानुवर्षे यशस्वी होणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. तिलाच सोडलं तर गाडी उभी करून निवांत बसून मोबाईल वर टाईमपास करण्याशिवाय पर्यायच राहणार नाही.
मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखताना तुमच्या व्यवसायाची एखादी स्वतंत्र ओळख बनवणे आवश्यक असते. व्यवसाय लहान असो व मोठा प्रत्येकासाठी मार्केटिंग चा नियम समान असतो, आणि योग्य मार्केटिंग केली तर प्रत्येक व्यवसाय यशस्वी ठरतो.
आमच्या परिसरात एक ७० वर्षाच्या आसपास वय असणारे बाबा आहेत. ते आजही त्यांच्या पत्नीसोबत रसाची गाडी घेऊन दररोज परिसरात चकरा मारतात. पण फिरताना आणि ओरडताना त्यांची एक लय आहे, आणि एक ठरलेला डायलॉग आहे. तो म्हणजे “घ्या रे गोडे”….. मागच्या १५-२० वर्षांपासून म्हणजे अगदी लहान असल्यापासून मी त्यांना पाहतोय. वयोमानानुसार त्यांचा आवाज फक्त थोडा क्षीण झालाय, पण “घ्या रे गोडे” म्हणणार म्हणजे म्हणारच…. आणि “घ्या रे गोडे” ऐकलं कि आम्ही घराच्या बाहेर जाऊन त्यांच्याकडून एक दोन ग्लास रस घेणारच हा नियम झालाय. दुसऱ्या कितीही गाड्या समोरून जाऊ द्या, पण “घ्या रे गोडे” हा शब्द ऐकला तर आम्ही कधीच दुसऱ्या गाडीवरचा रस घेत नाही. आजही एखाद् दिवस त्यांचा आवाज ऐकला नाही कि आम्हालाच चुकल्यासारखं होत…. हीच मार्केटिंग आहे, जाहिरात आहे.
स्वतःची ओळख तयार करा. तुमचा व्यवसाय कशासाठी ओळखायला हवा हे ठरवा आणि त्यानुसार त्याला मार्केटिंग ऍडव्हर्टिसिन्ग स्ट्रॅटेजीची जोड द्या. स्वतःची वेगळी ओळख तयार करा.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
खुप छान…!!
It’s Very Nice
Its true