निरव मोदीचा घोटाळा लपविण्यासाठी आणखी एक कारनामा उघड 


तब्बल १३ हजार कोटींचा बँकींग घोटाळा करणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीने घोटाळा लपविण्यासाठी आणखी एक कारनामा केल्याचे उघड झाले आहे. नीरवविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर घोटाळा लपविण्यासाठी त्याने त्याच्या डमी संचालकांसह ६ कंपन्या हाँगकाँगमधून काहिराला शिफ्ट केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हाँगकाँगमधील त्याच्या अनुरागन या डमी कंपनीचा संचालक दिव्येश गांधी याने तसा दावा केला असून या सहाही बनावट कंपन्यांच्या खात्याची जबाबदारी आपल्याकडे होती, असंही गांधी यांनी म्हटलं आहे.

घोटाळा उघडकीस आल्यानंतर अमेरिकेत राहणारा नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल मोदीने सर्व डमी संचालकांचे मोबाइल फोन तोडून टाकले. त्यानंतर त्यांना हाँगकाँगवरून काहिराला शिफ्ट केले, असं दिव्येश यांनी सांगितले. मोदीच्या या घोटाळ्यात दिव्येश आरोपी नाहीत. तपास यंत्रणेने त्यांना या घोटाळ्यात साक्षीदार केले आहे.

‘नीरवने शेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेल सर्व्हिसद्वारे संशायस्पदरित्या व्यवहार करण्याचे निर्देश दिले होते. हे ईमेल ठराविक काळाने आपोआप डिलिट होतात. त्यामुळे मागे काही पुरावे राहत नाहीत,’ असं दिव्येश यांनी सांगितलं. या शेल कंपनी आणि नीरवचे काका मेहुल चौकसीच्या डमी कंपनींमध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे हाँगकाँगच्या या सहा कंपन्यांचे पत्ते वेगवेगळे होते. मात्र सेल पर्चेस आणि आयात-निर्यातशी संबंधित दस्ताऐवज एकाच ठिकाणी बनवले जात असल्याचं दिव्येश यांनी स्पष्ट केलं.

काही डमी संचालकांच्या नावाचा वापर करण्यासाठी त्यांना दर महिन्याला ८ हजार रुपये किरकोळ रक्कम दिली जात होती. क्रेडिट रिलीज झाल्यानंतर नीरव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हिरे व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावर पुढची क्रेडिट आणि पैशाच्या फ्लोला मॅनेज केल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, विशेष पीएमएलए कोर्टाने मंगळवारी ईडीच्या चार्जशीटची दखल घेऊन नीरव, त्याचा भाऊ, त्याचे वडील, बहीण आणि मेव्हुण्याच्याविरोधात वॉरंट जारी केलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!