अमेरिकेच्या व्यापार दादागिरीला भारताचे जशास तसे उत्तर


ट्रम्प यांच्या अट्टाहासापायी अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर जादा कर लादल्यानंतर भारतानेही आता अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपासून अमेरिकेने चीन आणि भारता बरोबर व्यापार युद्ध सुरु केले असून चीन व भारतानेही अमेरिकेला या दादागिरीला जशास तसे उत्तर दिले आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लादल्यानंतर भारतानेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या ३० वस्तूंवरील सीमाशुल्क वाढवले असून त्यासंबंधीची सुधारीत यादी जागतिक व्यापार संघटनेला पाठवली आहे. यासोबतच चीननेही अमेरिकेच्या काही वस्तूंवर आयात शुल्कात वाढ केलेली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंच्या आयातीवर ५० अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त कर लादला आहे. त्यामुळे बडया अर्थव्यवस्था असलेल्या या दोन देशांतील व्यापार युद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ट्रम्प यांनी व्यापारमंत्री विल्बर रॉस व अर्थमंत्री स्टीव्हन नुशिन तसेच व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायटीझर यांच्याशी नव्वद मिनिटे चर्चा केल्यानंतर आयात शुल्कात जबर वाढ करण्याचा निर्णय घेतला. चीनने लगेचच याचा सूड घेत अमेरिकी वस्तूंवर कर लादण्याचे सूचित केले आहे.

भारतातून आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर कर लादून अमेरिकेला त्यातून २४१ मिलियन डॉलरचा फायदा होणार आहे. तर या प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेतून आयात होणऱ्या महागडया मोटार सायकल, काही लोखंडी-स्टीलच्या वस्तू, बोरिक अॅसिड आणि डाळींवर भारताकडून ५० टक्क्यापर्यंत सीमा शुल्क वाढवण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या करवाढीमुळे जितका भारतीय व्यापारावर परिणाम होणार आहे. भारतानेही तितकीच करवाढ केली आहे. ३० अमेरिकन उत्पादनांना देण्यात येणारी सवलत बंद करत आहोत असे भारताने जागतिक व्यापार संघटनेला कळवले आहे. मे महिन्यात भारताने बदाम, सफरचंद आणि मोटारसायकलसह २० उत्पादनांवर १०० टक्के करवाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता.

भारताच्या या भूमकेनंतर अमेरिकेनेही व्यापार मतभेद मिटवण्यास आपण तयार असल्याचे सूचित केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी जूनच्या अखेरीस दोन्ही देशांत अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक होणार आहे. यात दोन्ही देशांतील व्यापारी मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल.

सध्याची अमेरिकेविरोधात होत असलेली जागतिक व्यापार युती पाहता डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांसोबतचा हा व्यापारी युद्धाचा अट्टाहास चांगलाच महाग पडल्याचे दिसत आहे, व लवकरच अमेरिकेला या निर्णयापासून माघार घ्यावी लागेल असेच चिन्ह आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!