व्यवसायिक आयुष्याचा प्रवास कधीही थांबवू नका


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

हा लेख खास करून नवीन उद्योजकांसाठी आहे…

तुम्ही एखाद्या प्रवासाची सुरुवात करतात तेव्हा ती धीम्या गतीनेच होत असते ना ? शून्यावर असणारा वेग १-२-३-४ करत करत १०-२०-३०-४० पर्यंत जातो… गाडी मुख्य रस्त्याला लागली कि तोच वेग ८०-९० वर जातो. गाडी सुसाट निघते. पण गाडी वेगाने निघाली म्हणजे संपूर्ण प्रवास त्याच वेगाने करते का? नक्कीच नाही. रस्त्यात खड्डे येतात, स्पीड ब्रेकर्स येतात, कधी गाव लागते, कुठे गर्दी लागते. कधी खड्यात गाडी आदळते, कधी स्पीड ब्रेकर वर फूटभर उंच उडते, कधी गाव-गर्दी मुळे वेग कमी करावा लागतो. ब्रेक दाबावे लागतात. कधी गाडीचं चाक पंक्चर होतं, त्यात तासभर जातो. कधी कुठे ट्राफिक जॅम झालेली असते तर कधी कुठे टोल नाक्याच्या गर्दीमुळे उशीर होतो. या सगळ्यात चांगला रास्ता भेटला कि पुन्हा गाडी सुसाट निघते…

पण असे अडथळे आले म्हणून तुम्ही प्रवासच थांबवता का ? नाही ना? हे अडथळे तुम्ही प्रवासाचा भाग समजूनच चालत असता. या गोष्टींना सामोरे जावेच लागणार आहे हे तुम्ही गृहीतच धरून चाललेले असते. म्हणून एखाद्या खड्ड्यात गाडी आदळल्यावर तुम्ही गाडी चालवण्याचा विचार रहित करत नाही. किंवा ट्राफिक जॅम झाल्यामुळे तुम्ही प्रवास सोडून पुन्हा माघारी फिरत नाही. ट्राफिक मध्ये अडकून पडलात तरी ट्राफिक हळूहळू पुढे सरकतच असते, काही वेळात नकळतपणे तुम्ही काही अंतर पुढे आलेलाच असता… थोडक्यात या सगळ्या बाबींना तुम्ही सामोरे जाऊन त्यांना पार करून आपला प्रवास चालू ठेवता. म्हणजेच तुम्ही पुढे जात राहता…

आपले व्यवसायिक आयुष्य अगदी असेच असते. सुरुवात धीम्या गतीनेच होत असते. मुख्य मार्गावर येईपर्यंत थोडा वेळ जातो. हळूहळू जम बसतो आणि मग तुमचा व्यवसाय वेगाने पुढे जातो. अशातच तुम्हाला काही अडचणी येतात, अडथळे येतात, काही कारणाने व्यवसायाला ब्रेक लागतो… पण हे तुमच्या व्यवसायाचेच भाग आहेत. ते तुम्हाला पार करावेच लागतात. कारण जशा वर सांगितलेल्या अडचणी प्रवासाचा भाग असतात, तशाच या अडचणी व्यवसायाचा भाग असतात. या अडचणी पार करत करतच तुम्हाला पुढे जावे लागते. आणि हळूहळू का होईना तुम्ही पुढे जात राहता. जसं तुम्ही एखादा खड्डा आला, किंवा ट्राफिक जॅम असली म्हणून प्रवास थांबवत नाही तसे तुम्ही तुमचे व्यवसायिक करिअर सुद्धा थांबवायचे नसते.

मी इथे व्यवसायिक आयुष्य हा शब्द मुद्दामहूनच वापरतो आहे. व्यवसायिक आयुष्य म्हणजे एखादा ठरावीक व्यवसाय नाही, तर तुमच एकूणच आयुष्य. यात तुमचे वेगवेगळे प्रयोग आले, वेगवेगळे व्यवसाय आले, यश अपयश आले, गरिबी श्रीमंती अली… सर्व काही. तुमच्या व्यवसायिक आयुष्यात एखादा व्यवसाय चांगला चालू शकतो, एखादा बंद पडू शकतो. एखादा रडत-खडत चालत असेल तर एखादा आहे तिथेच असेल, एखादा प्रयत्न यशस्वी ठरत असेल तर एकदा प्रयोग अपयशी ठरत असेल…. हा सगळा तुमच्या व्यवसायिक आयुष्याचा भाग आहे.

तुमचा एखादा व्यवसाय कमी चालतोय किंवा बंद पडलाय म्हणून तुम्ही लगेच व्यवसायापासून दूर जायचे नसते, तो तुमच्या व्यवसायिक आयुष्यातला अडथळा आहे हे लक्षात घेऊन त्याला पार करायचे असते. नवनवीन प्रयत्न करत राहणे हे व्यावसायिकाचे कामच आहे. हे अडथळे पार करण्याचे प्रयत्न करा, प्रयोगशील राहा, एखाद्या प्रयोगात अपयशी ठरला तर दुसरा प्रयत्न करा… पण कोणत्याही परिस्थितीत हा व्यवसायिक करिअरचा प्रवास थांबता काम नये हे लक्षात घ्या. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांचा वापर करून जास्तीत जास्त चांगले काहीतरी करत राहण्याचा प्रयत्न सतत करत राहा.

मी स्वतः या परिस्थितीतून गेलेलो आहे म्हणून ठामपणे तुम्हाला हे सांगू शकतो. अनुभव आणि मार्गदर्शक नसल्यामुळे सुरुवातीला बसलेले काही झटके हे मला व्यवसायिक आयुष्यातून माघार घ्यायला भाग पाडण्यासाठी पुरेसे होते.. काही मोठे ब्रेक बसले, एक दोन वर्षे मागे गेलो, पण सतत काहीतरी प्रयत्न करत राहिलो. काही प्रयत्न यशस्वी ठरले, काही साफ अपयशी ठरले… पण म्हणून माझा व्यवसायिक आयुष्याचा प्रवास संपला नाही, तो चालूच आहे आणि चालूच राहील. कधीकधी वाटत कि आज मला जेवढं ज्ञान आहे तेवढं काही वर्षांपूर्वी असतं तर आजची माझी प्रगती काही पटींनी जास्त असती. पण हे विचार तेवढ्यापुरतेच असतात. आपला प्रवास असाच चालू राहील यासाठी आपण प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.

हा लेख खास करून नवीन उद्योजकांसाठी आहे हे मी सुरुवातीलाच सांगितले आहे. कारण एखाद्या लहानशा अपयशाने सुद्धा खचून जाण्याची शक्यता नवउद्योजकांमध्ये जास्त असते. जे सेटल आहेत, अनुभवी आहे त्यांना या अडचणींचा सामना कसा करायचा आणि आपला व्यवसायिक आयुष्याचा प्रवास कसा पुढे न्यायाचा याचे चांगले भान असते.

असो… सारांश इतकाच कि तुमचा व्यवसायिक आयुष्याचा प्रवास हा एखाद्या सामान्य प्रवासासारखाच असतो. त्यात अडचणी असतात, खाच खळगे असतात, अडथळे असतात.. पण या सगळ्यांना पार करून तुम्हला तुमचा प्रवास चालूच ठेवावा लागतो.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “व्यवसायिक आयुष्याचा प्रवास कधीही थांबवू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!