TATA NANO प्रोजेक्ट अपयशी का ठरला ?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि जगभरातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय ठरलेली टाटा मोटर्स च्या नॅनो कार चे उत्पादन कंपनी काही काळासाठी बंद करत असल्याचे वाचनात आले. कदाचित प्रोडक्शन जास्त आणि मागणी कमी असल्याने हा निर्णय घेतला गेला असेल. कालांतराने प्रोजेक्ट पुन्हा सुरळीत सुरु होईल. हा प्रोजेक्ट सुरु करण्यामागे रतन टाटांचा खूप चांगला उद्देश होता. मध्यमवर्गीयांना खिशाला परवडेल अशी कार निर्माण करणे…

रतन टाटांनी एक लाखात कार देण्याचे स्वप्न बाळगले होते. परंतु कार लाँच करताना ती दीड लाखापर्यंत गेली. पण तरीही ती त्यावेळच्या सर्वात स्वस्त मारुती ८०० कार पेक्षा ५०% ने स्वस्त होती. परंतु तरीही हा प्रोजेक्ट फेल गेला. नॅनो ची अपेक्षेप्रमाणे विक्री कधीच झाली नाही. अगदी लॉन्चिंग पासून नॅनो ला ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद अतिशय थंड होता. पहिल्या वर्षभरातच नॅनो चा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे यशस्वी होणार नाही याचा सर्वांनाच अंदाज आला. आणि चार दिवसांपूर्वी कार चे प्रोडक्शन काही काळासाठी बंद करण्यात येणार असल्याचे वाचनात आले.

का अपयशी ठरला असावा हा महत्वाकांक्षी प्रकल्प ? टाटा सारखी जगविख्यात कंपनी कुठे चुकली ? रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट असा अडगळीत पडल्यासारखी अवस्था का झाली ? सगळं काही स्वस्त हव्या असलेल्या समाजात इतकी स्वस्त गाडी मिळत असूनही लोकांमधे तिचे आकर्षण का निर्माण झाले नाही? बरेच प्रश्न आहेत… पण या सर्वांचे उत्तर एकंच आहे… कंपनी भारतीय ग्राहकांची मानसिकता लक्षात घेण्यात कमी पडली. भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेचे चुकीचे आकलन टाटा ला महागात पडले सोबत भारतीय मीडियाने सुद्धा याला हातभार लावला.

कंपनीची गाडीच्या लॉन्चिंग च्या आधीपासूनच सुरु असलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी या प्रोजेक्ट ची धूळधाण उडवण्यासाठी कारणीभूत ठरली होती

ज्या देशात भिकाऱ्याला सुद्धा स्वतःला गरीब म्हणवून घेण्यात लाज वाटते त्या देशात गरिबांची गाडी अशी मार्केटिंग केल्यास ती कधीच खपणार नाही हे कंपनीच्या स्ट्रॅटेजी मेकर्सच्या स्पष्ट लक्षात यायला हवे होते. रतन टाटांनी ज्यावेळी नॅनो संबंधी सर्वप्रथम जनतेला माहिती दिली होती त्यावेळपासूनच देशभरात टाटा आता गरिबांना परवडेल अशी गाडी काढणार अशाच प्रकारच्या बातम्या सुरु झाल्या होत्या. मीडियाने याला प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी दिली. अगदी ऑटो एक्स्पो मध्ये जेव्हा कार पहिल्यांदा दाखवली गेली तेव्हाही तिची चर्चा जगातील सर्वात स्वस्त कार आणि गरिबांची कार एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवली गेली. कोणतीही कार असो ती जेव्हा एखादा व्यक्ती लाखभरात विकत घेतो तेव्हा तो गरीब कधीच नसतो. पण जवळजवळ वर्षभर देशात नॅनो ची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिरात गरिबांची कार अशीच होत होती. थोडक्यात या कार ची अशी प्रतिमा निर्माण झाली कि नॅनो घेणारा गरीब असतो, फक्त फिरायला गाडी हवी पण ऐपत नाही म्हणून नॅनो विकत घेतो. अशी प्रतिमा निर्माण झाल्यावर नॅनो ची विक्री अपेक्षेप्रमाणे होणे शक्यच नव्हते. आणि तेच झाले. नॅनो प्रोजेक्ट पूर्णपणे फेल गेला.

लोकांना स्वतःला गरीब म्हणवून घ्यायला आवडत नाही. त्यात एक अशी गाडी, जिची ओळख गरिबांची कार अशी आहे, साहजिकच कुणीही ती विकत घेणार नाही. दोन लाखाची नॅनो घेण्यापेक्षा लाखभराची स्पोर्ट्स बाईक घेऊन लोकांना श्रीमंती दाखवता येते हे ग्राहकाला नक्कीच माहित असते. यासोबतच गाडीच्या मागे इंजिन बसवल्यामुळे गाडीचे फायरिंग रिक्षासारखे येत असे. यामुळेही गाडीची इमेज खराब झाली. या गाडीचा आवाज रिक्षा सारखा येतो अशा चर्चेमुळे तिची गरीब कार हि प्रतिमा जास्त ठळक होत गेली.

नॅनो चा ब्रँड इतका खराब झाला कि तुम्ही नॅनो घेऊन एखाद्या कार्यक्रमात गेलात आणि तुमच्याच बरोबरीने एखादा दुचाकीवर आला तरी तुम्हाला कमी दर्जाचे समजले जाऊ लागले. त्यातच टाटानेही नॅनो ची हि प्रतिमा जाहीरातीच्या माध्यमातुन आणखीनच ठळक करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांना स्वस्तातल्या वस्तू आवडतात हे जरी खरे असले तरी ज्या गोष्टी स्टेटस दाखवण्यासाठी वापरल्या जातात त्या श्रीमंत दिसणेच आवश्यक असते, आणि कार हि आपल्याकडे मोठेपण मिरविण्यासाठी घेतली जाते हि भारतीय लोकांची मानसिकता टाटा मोटर्स ने लक्षात घेतली नाही.

आपल्याकडे श्रीमंत लोक सामान्यपणे वापरात असलेल्या गोष्टी मध्यमवर्गीय मुद्दामहून वापरतात. अशा वस्तू वापरल्यामुळे आपणही श्रीमंतांच्या रांगेत जाऊन बसू अशी अपेक्षा असते. एखाद्या हॉटेल वा कॅफे बाहेर फक्त मर्सिडीज BMW गाड्यांची रांग लागत असेल तर त्याच हॉटेलमध्ये / कॅफेमधे जाऊन आपणही उच्च वर्गातील आहोत हे दाखवून देण्याचा किंवा काहीवेळा स्वतःच्याच मनाला सांगण्याचा प्रयत्न आपला मध्यमवर्गीय समाज नेहमीच करतो. पन्नास साठ हजाराचा मोबाईल हा आपल्याकडे श्रीमंती दाखवण्यासाठीच घेतला जातो. ठराविक ब्रँड चे कपडे अति महाग आहेत म्हणून पोटाला खार लावून ते कपडे घेणारे आपल्याकडे कमी नाहीत. अशावेळी कोणतेही ग्लॅमर नसलेली नॅनो कशाला कोण दारात उभी करेल ? म्हणूनच मारुती ८०० (नंतर अल्टो) च्या निम्म्या किमतीत मिळत असूनही लोकांनी नॅनो च्या ऐवजी ८०० ला पसंती दिली. आत्ताही स्वस्त आणि चांगली कार म्हणून अल्टो चीच निवड केली जाते. कारण अल्टो वापरण्याने तुम्ही गरीब आहात हे कुठेही जाणवत नाही. आपण वापरात असली एखादी वस्तू खास गरिबांसाठी आहे हे लक्षात आल्यावर आपण तिचा वापर उघडपणे करू का? नक्कीच नाही. नॅनो चेही हेच झाले.

मागील पाच सात वर्षांपासून नॅनोच्या प्रतिमेमधे कोणताही बदल झालेला नाही. आता ते शक्यही राहिलेले नाही. मध्यंतरी नॅनो ने तरुणांना आकर्षित करण्यासाठी जाहिराती केली होत्या पण तिथेही तीच चूक झाली. तरुणांना कॉलेजमध्ये आपल्याला कुणी गरीब म्हणून नये असेच वाटते. हातात महागडा मोबाईल हवा, एक मस्त दीड दोनशे CC वाली सुपरबाइक हवी, महागडा गॉगल हवा हि सर्वच तरुणांची मानसिकता आहे. अशावेळी गरिबांची कार म्हणून हिणवली गेलेली कार कुणी कॉलेज मध्ये जाण्यासाठी वापरेल हि अपेक्षा करणे व्यर्थच. म्हणजेच इथेही टाटा मोटर्स युवकांची मानसिकता हेरण्यात कमी पडले.

टाटा ने काय करायला हवे होते ?
खरे तर टाटा ने नॅनो ची पहिली ओळख आदर्श सिटी कार म्हणून करणे जास्त योग्य ठरले असते. सोबत जाहिरात करताना मध्यमवर्गाला समोर न ठेवता श्रीमंत वर्गालाच नजरेसमोर ठेऊन जाहिरात करणे आवश्यक होते. एखादा मोठा हिरो वा हिरोईन घेऊन त्यांना जाहिरातीमध्ये दाखवणे आवश्यक होते. नॅनो हा श्रीमंतांसाठी सिटी कार म्हणून वापरण्याचा पर्याय आहे असे दिसल्यानंतर मध्यमवर्गीयांनीही ती कार विनासंकोच घेतली असती. कारण अशावेळी तिची प्रतिमा गरिबांची कार म्हणून राहिलीच नसती. तर सिटी मध्ये वापरण्यासाठी आदर्श कार अशी झाली असती. आणि अशावेळी मध्यमवर्गीयांनी ती आपल्या दैनंदिन गरजेसाठी वापरली असती. सुरुवातच इतकी चुकली कि टाटा ला सावरण्याची थोडीसुद्धा संधी मिळाली नाही. आज त्याचे परिणाम समोर आहेत. एक मोठं अपयश कित्येक लहान लहान चुकांचा परिपाक असतो याचे टाटा नॅनो हे उत्तम उदाहरण.

नॅनो साठी आता काय संधी आहे ?
टाटा नॅनो हा ब्रँड आता पूर्णपणे खराब झालेला आहे. या ब्रँड ला आता कितीही सुवर्णझळाली दिली तरी ते फाटक्या कपड्यावरचे ठिगळंच वाटतील. टाटा साठी सर्वात चांगले राहील त्यांनी हा ब्रँड पूर्णपणे बंद करावा. आणि हीच कार थोडेफार फेरबदल करून पुन्हा नव्या नावाने लाँच करावी. कमी किमतीपेक्षा तिच्या ब्रँड इमेज तयार करण्यावर भर द्यावा. जाहिरात करताना गरिबांना टार्गेट न करता मध्यमवर्ग आणि उच्च माध्यम वर्गाला टार्गेट करावे. हि कार चांगली आहे पण तिची प्रतिमा इतकी खराब झालेली आहे कि तिच्याकडे ढुंकूनही बघण्याची कुणाची हिम्मत होत नाही. नवीन ब्रँड ने हि प्रतिमा पूर्णपणे विरून जाईल. लोकांना एक नवा ब्रँड नव्या प्रतिमेसह आणि नव्या जाहिरात स्ट्रॅटेजीसह दिसला तर ते नक्कीच या कार कडे आकर्षित होतील.

टाटा नॅनो हा खरे तर देशाचा सर्वोत्तम प्रकल्प व्हायला पाहिजे होता. जशी मारुती सुझुकी कंपनीवर देशवासीयांची प्रेम आहे तसेच टाटा वर आहे. पण नॅनो प्रकल्पात याच देशवासियांना काय हवे आहे हे शोधण्यात टाटा कमी पडली. हि चूक आता सुधारू शकते कि नाही ते कंपनीच्या अंतर्गत वरिष्ठांनाच माहित, पण सुधारल्यास नॅनो प्रकल्प नव्या नावाने पुन्हा उभा राहू शकतो हेही तितकेच खरे. टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट अशा खस्ता खाताना पाहणे प्रत्येक भारतीयासाठी क्लेशकारक आहे. जग्वार, लँड रोव्हर सारखे जगप्रसिद्ध ब्रँड समर्थपणे हाताळणारी टाटा नॅनो मध्ये अपयशी ठरली यावर विचारमंथन व्हायलाच हवे. आणि अशा अपयशाचा अभ्यास करून नवउद्योजकांनी होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्याचा प्रयत्न करायला हवा हेही तितकेच महत्वाचे.

ऑटोमोबाईल इंडस्ट्री हि जगातील सर्वात मोठया इंडस्ट्रीपैकी एक आहे. यामुळेच या इंडस्टीमध्ये अभ्यासण्यासारखे सुद्धा खूप काही आहे. या कंपन्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ब्रँड डेव्हलपमेंट, क्रिएटिव्हिटी, काही चुकलेले काही अतिशय यशस्वी ठरलेले निर्णय अशा कितीतरी बाबी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये अभ्यासण्या सारख्या आहेत. यामुळेच येत्या काळात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर आधारित आणखीही काही लेख तुम्हाला ‘उद्योजक मित्र’ च्या माध्यमातून वाचायला मिळतील. आणि ते तुम्हाला व्यवसायात भरून उपयोगी ठरतील याचाही मला विश्वास आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!