प्रोजेक्ट कन्सल्टिंग – एक उभरता व्यवसाय


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

कोणताही नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी आजकाल प्रत्येकाला कन्सल्टंट ची गरज भासत असते. नवीन प्रोजेक्ट सुरु करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून जवळजवळ सर्व नवउद्योजक कन्सल्टंट ची मदत घेतात. आज मार्केट मधे चांगल्या कन्सल्टंट ची कमतरता आहे. जे आहेत ते फक्त मोठमोठ्या प्रोजेक्ट वर भर देतात, किंवा कर्ज आणि सबसिडी एवढ्यापुरतेच काम करताना दिसतात, पण या सेवा आहेत कन्सल्टिंग नव्हे. कन्सल्टंट म्हणजे सल्लागार, व्यवसायासंबंधी योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती; फक्त सबसिडी आणि कर्ज पुरवणारा सेवापुरवठादार नव्हे. व्यवसाय सुरु करू देण्यापासून तो पूर्णपणे सेटअप करेपर्यंत व्यवसायासंबंधी मार्गदर्शन करण्याचे काम प्रोजेक्ट कन्सल्टंट चे असते. प्रोजेक्ट कन्सल्टंट आणि बिझनेस कन्सल्टंट यातही खूप फरक आहे हे लक्षात घ्या.

प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणजे एखादा प्रोजेक्ट उभा करून देणारा, आणि त्यासंबंधी पूर्ण माहिती देणारा; बिझनेस कन्सल्टन्ट म्हणजे कोणताही व्यवसाय असो तो कसा करावा, त्याचे नियोजन कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन करणारा. बिझनेस कन्सल्टन्ट हि मोठी संकल्पना आहे आणि फक्त अनुभवानेच शक्य आहे. प्रोजेक्ट कन्सल्टंट होण्यासाठी अनुभवापेक्षा व्यवसायाची संपूर्ण माहिती आवश्यक आहे.

लहान व्यवसायांमधे फी कमी मिळते म्हणून अशा उद्योजकांना चांगले कन्सल्टंट स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाहीयेत. मोठी शहरे सोडली तर चांगले कन्सल्टंट अभावानेच सापडतात. म्हणूनच प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून करिअर करण्याची चांगली संधी आहे. या व्यवसायात उत्पन्नही चांगले आहे आणि संधीही भरपूर आहेत.

व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था महाराष्ट्र भरपूर आहेत. पण हे सर्व काही ठराविक व्यवसायांपुरतेच मर्यादित आहेत. तसेच यातील ८०% संस्थांचा उद्देश फक्त फी उकळण्याचाच असतो, यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन पुन्हा एखादा कन्सल्टन्ट शोधण्याची वेळ आलेले बरेच जण मी पाहिलेत. म्हणूनच महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमधे मिळून आजघडीला किमान शंभर कन्सल्टंट ची आवश्यकता आहे असे म्हटल्यास त्यात काहीही वावगे ठरणार नाही. व्यवसायांची संख्या आणि उपलब्ध चांगले कन्सल्टंट याचा विचार करता मार्केटमध्ये या व्यवसायासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत.

पण यासाठी तुमचा दृष्टिकोन व्यवसायाच्या दृष्टीने योग्य असला पाहिजे. उत्पन्न किती मिळेल? ग्राहक कसा मिळेल? व्यवसाय नाही चालला तर काय? नुकसान झाले तर काय? व्यवसायाची गॅरंटी काय? ग्राहक पण मलाच शोधावा लागेल का? असले प्रश्न तुम्हाला पडत असतील तुम्ही प्रोजेक्ट कंसल्टंटच्या दृष्टीने योग्य व्यक्ती नाही हे लक्षात घ्या. हे प्रश्न व्यवसायाबद्दलच्या अज्ञानाचे द्योतक आहेत आणि तुम्हीच जर व्यवसायाबद्दल अनभिज्ञ असाल तर इतरांना काय व्यवसायाचे मार्गदशन कराल… म्हणून तुमचा दृष्टिकोन व्यवसायाविषयी योग्य आहे का हे पाहूनच प्रोजेक्ट कन्सल्टंट व्हायचे कि नाही ते ठरवा.

या क्षेत्रात उत्पन्न सुद्धा खूप मिळते. कोणताही लहानातील लहान प्रोजेक्ट ५-१० लाखांपेक्षा कमी नसतो आणि यात एखादी मोठी ऑर्डर आली तर तुम्हाला मिळणारे उत्पन्न कितीतरी पटींनी वाढते. तसेच हा व्यवसाय संपर्कावर आधारित असतो, म्हणजे तुमच्या ऑर्डर जसजशा वाढत जातील तसतसा तुमचा व्यवसाय तोंडी प्रचाराने आणखी वाढत जाणार असतो

कशी करू शकता सुरुवात

१. कन्सल्टंट होण्यासाठी तुम्हाला तुम्ही निवडलेल्या क्षेत्राचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. प्रजेक्ट च्या उभारणीपासून संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
२. म्हणून आधी तुम्ही निवडलेल्या क्षेत्राची पूर्ण माहिती घेणे गरजेची आहे. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात कोणकोणते व्यवसाय येतात, व्यवसाय कसा चालतो. त्याचे मार्केटमधील नियमन कसे आहे, मशिनरी कच्चा माल कुठे मिळतो, प्रोजेक्ट उभारताना कोणकोणत्या बाबींकडे ध्यान द्यावे लागते, कर्जाची सोया कशी आहे, सबसिडी किती मिळते व त्याची पूर्तता कशी करावी लागते, ब्रँड डेव्हलपमेंट काय आहे, मार्केटसंबंधी काम कसे करावे लागते अशा विविध बाबींची सखोल माहिती घ्यावी. लक्षात घ्या… आपण रोजेक्ट उभा करून द्यायचा असतो आणि विक्रीचे प्राथमिक मार्गदर्शन करायचे असते. माळ विकण्याची जबाबदारी हि उद्योजकांचीच असते.
३. एका ठराविकच क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यास प्राधान्य द्यावे. थोडक्यात प्लास्टिक इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, लघुद्योग गृहउद्योग ई. उदाहरणादाखल तुम्ही लघुद्योग क्षेत्र निवडले असेल तर किमान १०-१५ लघुद्योगांची माहिती घेऊन ठेवावी किंवा प्लास्टिक इंडस्ट्री निवडली असेल तर त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रोजेक्ट ची माहिती घेऊन ठेवावी.
४. प्रोजेक्ट उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व स्त्रोतांची उपलब्धता करावी. व्यवसाय नोंदणी पासून लायसन्स, प्रोजेक्ट रिपोर्ट, कर्ज, सबसिडी, मशिनरी, कच्चा माल, ब्रँड डेव्हपलपमेंट, कर्मचारी नियुक्ती, इत्यादी प्रकारची सर्व माहिती घ्यावी.
५. प्रोजेक्ट साठी कर्ज, सबसिडी वा इतरही सेवांची गरज भासते, यासाठी चांगल्या संस्थांना जोडून घ्यावे. चांगले व्यवसायिक बॅकग्राउंड असलेल्या संस्थांनाच जोडून घ्यावे. या व्यवहारात आर्थिक बाबतीत अडकण्याची शक्यता राहू देऊ नका.
६. एकदा या सर्व गोष्टींची माहिती झाल्यानंतर आपल्या मार्केटिंग ला सुरुवात करावी. मुख्य शहरात एका चांगल्या ठिकाणी ऑफिस असावे ज्यामध्ये तुम्ही क्लायंट्स ला योग्य प्रकारे माहिती देऊ शकता. सुरुवातीला सोशल मीडियाचा आधार घेणे योग्य. कमी खर्च चांगली मार्केटिंग करता येते. हळूहळू तुमच्या क्लायंट्सच्या मार्फतच तुम्हाला आणखी क्लायंट्स मिळणार असतात. माऊथ पब्लिसिटी या व्यवसायासाठी आवश्यक असते.

प्रोजेक्ट कन्सल्टिंग मधे फक्त व्यवसाय उभारून देणे हि मुख्य जबाबदारी असते त्यामुळे हा व्यवसाय करणे अवघड नसते. फक्त यातील बारकावे शिकून घ्यावे लागतात. यामध्ये मार्केटिंग किंवा इतर कोणत्या क्षेत्राविषयी तुमच्या क्लायंट ला मार्गदर्शन करण्याची गरज नसते. ते एक वेगळे क्षेत्र आहे. प्रोजेक्ट कन्सल्टिंग शिकण्यासाठी किमान सहा महिने ते एक वर्ष अभ्यास तसेच किमान एक दोन प्रोजेक्ट्स ची यशस्वी उभारणी आवश्यक असते. सुरुवातीला क्लायंट्स मिळायला खूप उशीर होतो, परंतु एकदा सुरुवात झाल्यावर व्यवसाय वाढण्यास वेळ लागत नाही. शक्यतो सुरुवातीचे प्रोजेक्ट मधे फी किती मिळते यापेक्षा अनुभव घ्याल प्राधान्य द्यावे.

प्रोजेक्ट कन्सल्टंट बनण्यासाठी मार्गदर्शन….
प्रोजेक्ट कन्सल्टिंग हा ज्ञानावर आधारित व्यवसाय आहे यामुळे याकरिता कुणीही मार्गदर्शन करताना अढळत नाही. तसेच स्पर्धक नको म्हणूनही कुणी यामध्ये मार्गदर्शन करत नाही.
तुम्हाला शक्यतो तुमच्या ज्ञानावरच या क्षेत्रात यावे लागते. तसेच तुम्हाला तुमच्या परीनेच यामधील बारकावे ओळखून स्व- शिक्षण घ्यावे लागते. प्रोजेक्ट कन्सल्टिंग हा एका दिवसात किंवा आठवड्यात किंवा महिन्याभरात शिकण्यासारखं व्यवसाय नाही. हे पूर्णपणे प्रॅक्टिकल वर आधारित शिकण्याचे क्षेत्र आहे. यामुळे आधीचे वर्षभर तुमचा जास्त वेळ या व्यवसायातील बारीसारीक माहिती समजून घेण्यातच जातो. यात एखादी छोटी मोठी पण चांगली प्रोजेक्ट कन्सल्टिंग साठी ऑफर आली तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत होते. सोबतच एखाद्या इंडस्ट्रीमध्ये स्वतः काम केल्यास काम शिकण्यासाठी चांगला फायदा होतो.

सुरुवात करताना फक्त मोठ्या प्रोजेक्ट च्या मागे लागू नका. सुरुवातीचे ४-५ प्रोजेक्ट्स हे लहान असावेत. तसेच सुरुवातीला एखादी प्रोजेक्ट सेटअप करून देणारी कंपनी असेल तर काही प्रोजेक्ट त्यांच्या मार्फतच पूर्ण करून घ्यावेत. आपण फक्त त्यावर लक्ष ठेऊन असावे. यामुळे कामही चांगले होते आणि तुम्हाला शिकायला सुद्धा मिळते.

या व्यवसायात तुम्हाला स्वतःची चांगली टीम बनवणे सुद्धा आवश्यक असते. प्रत्येक कामासाठी चांगले लोक जोडणे आवश्यक असते. सगळी कामे स्वतः करण्यापेक्षा आउटसोर्स करण्याला प्राधान्य द्या.

या व्यवसायातील समस्या…

ग्रामीण व कमी विकसित शहरात अजूनही प्रोजेक्ट कन्सल्टंट ला कन्सल्टिंग फी देण्यासाठी टाळाटाळ होताना दिसते, याचवेळी कन्सल्टंट चे महत्व ओळखून असलेल्या पुणे मुंबई सारख्या भागातील क्लायंट्स मागेल तेवढी फी द्यायला तयार असतात. यामुळेच या मोठ्या शहराबाहेर कन्सल्टिंग व्यवसायाचा जास्त प्रसार आढळून येत नाही.
पेंटर ला कामावर ३०%, सुताराला एकूण खर्चावर ३०%, गवंड्याला बांधकाम खर्चावर ३०% देणारे कन्सल्टंट ला प्रोजेक्ट कॉस्ट वर ५-१०% शुल्क द्यायला नकार देतात. पण खरं तर प्रोजेक्ट कन्सल्टंट प्रोजेक्ट उभारणीचे काम जेवढे सोपे करतो त्यामुळे कितीतरी खर्च आणि त्रास वाचत असतो हे अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही.
कन्सल्टंट चे महत्व माहित नसणे हा या व्यवसायासाठी नकारात्मक भाग असला तरी त्याने विशेष फरक पडत नाही, कन्सल्टंट चे महत्व ज्या भागाला माहित आहे त्याच भागात व्यवसाय सुरु करावा. महानगरांमधे या व्यवसायाला जास्त स्कोप आहे. मी स्वतः मुंबई पुण्या बाहेरच्या दुर्लक्षित उद्योजकांना योग्य मार्गदर्शन देण्याच्या विचाराने बिझनेस कन्सल्टिंग सुरु केले होते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या दुर्लक्षित विभागांकडे जास्त लक्ष दिले होते, परंतु या भागातील कन्सल्टिंग फी देण्याच्या उदासीनतेमुळे पुन्हा आपले मुख्य क्षेत्र म्हणजेच पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे या भागातील क्लायंटस कडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. व्यवसायात याला पर्याय नाही. व्यवसाय हा सोशल वर्क करण्यासाठी करत नसतात… त्यामुळे एक कन्सल्टंट म्हणून तुम्ही सुद्धा तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य परतावा देणाऱ्याचाच विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील इतर भागात हळूहळू कन्सल्टंट चे महत्व जाणवायला लागणारच आहे, त्यामुळे आत्तापासून सुरुवात असेल तर भविष्यात याला महानगरांबाहेरही चांगला स्कोप राहणार आहे.

प्रोजेक्ट कन्सल्टिंग हे स्पर्धा नसलेले एक चांगले क्षेत्र आहे. उद्योगासंबंधी वाढत असलेला दृष्टिकोन भविष्यात प्रोजेक्ट कन्सल्टिंग क्षेत्रासाठी चांगल्या संधी देणार आहे. या क्षेत्राला मर्यादा नाहीत. या मार्केटमधील काही नामांकित कन्सल्टंट वर्षातून फक्त २-३ प्रोजेक्ट घेतात पण तरीच त्यांचे उत्पन्न एखाद्या मोठ्या कंपनीला लाजवेल इतके असते. काम करत राहणे हे एकाच या व्यवसायाचा नियम आहे, प्रत्येक कन्सल्टंट ला एक तरी मोठी संधी नक्कीच मिळते, आणि हीच मोठी संधी नशीब बदलण्यासाठी कारणीभूत ठरत असते. बघा तुम्हाला जमतंय का…

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “प्रोजेक्ट कन्सल्टिंग – एक उभरता व्यवसाय

  1. नमस्ते साहेब आपण जी माहिती दररोज पुरवत आहात ही आमच्यासारख्हया अनेक उद्योजक मित्रांचे बंद झालेले दरवाजे उघडण्यास मदत करत आहे याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!