सिझनल बिझनेस :: वर्षभर चालणारा व्यवसाय


सिझनल बिझनेस

सिझनल व्यवसाय बरेच जण करतात… पण या व्यवसायाला मुख्य व्यवसाय बनवता आलं तर ? कधी विचार केलाय ?

सिझनल व्यवसाय करणारे बरेच जण आपली नोकरी वा इतर काम सांभाळून सिझनल व्यवसाय करतात. उन्हाळ्याच्या दिवसात आंबे विकणे, संक्रांतीला पतंग विकणे, रक्षाबंधनावेळी राख्या विकणे, गणेशोत्सवावेळी गणपती मुर्त्या व इतर साहित्य विकणे असे सिझनल व्यवसाय करतात. यातून यांना चांगले उत्पन्नही मिळते. परंतु व्यवसायाला दुय्यम महत्व दिल्यामुळे यांना जास्त प्रगती करता येत नाही. नोकरी महत्वाची आणि अतिरिक्त उत्पन्नासाठी सिझनल व्यवसाय अशी मानसिकता असते.

पण ठरवलं तर हा सिझनल व्यवसाय मुख्य व्यवसाय सुद्धा होऊ शकतो याचा अजूनतरी कुणी विचार केलेला दिसत नाही. म्हणूनच हि संकल्पना तुमच्या समोर मांडतोय. तुम्ही सिझनल व्यवसाय हाच मुख्य व्यवसाय निवडू शकता. या व्यवसायाची सर्वात मुख्य खासियत म्हणजे याला कोणत्याही मोठ्या किंवा भव्य सेटअप ची गरज पडत नाही. एक चांगले शॉप असले तरी पुरे. फक्त प्रत्येक सण, उत्सव वेळी त्याच्याशी संबंधित वस्तू विकायला ठेवणे. भरपूर उत्पन्न मिळेल आणि इतर कामासाठी पुरेसा वेळही उपलब्ध होईल.

वर्षातून तुम्हाला किती प्रकारच्या व्यवसायाच्या संधी आहेत यावर नजर टाकल्यास हा व्यवसाय किती मोठा आहे याचा अंदाज येईल. उन्हाळ्याच्या दिवसात आंबे विकणे, याच सिझन मध्ये उन्हापासून बचाव करणाऱ्या (टोपी, छत्री ई) वस्तू विकणे, संक्रांतीला पतंग विकणे, रक्षाबंधनावेळी राख्या विकणे, पावसाळ्यामध्ये रेनकोट छत्र्या विकणे, गणेशोत्सवावेळी गणपती मुर्त्या व इतर साहित्य विकणे, दिवाळीला दिवाळीसंबंधित वस्तू विकणे, हिवाळ्यात थंडीपासून बचाव करणाऱ्या वस्तू विकणे, याचबरोबर फळांचे सिझन पाहून त्यानुसार विक्रीचे नियोजन करणे…

वर्षभरात जवळजवळ १५-२० वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी या सिझनल व्यवसायामुळे मिळू शकतात. चांगले व्होलसेलर्स / सप्लायर्स मिळाल्यावर आणि चांगला अनुभव आल्यावर यातून एक दोन व्यवसाय तुम्ही आणखी मोठ्या स्तरावर नेऊ शकता. लोकांना तुम्ही सिझनल व्यवसाय करता हे माहित झाले कि ते प्रत्येक सिझन नुसार तुमच्याकडे येणारच, सोबत येत्या सिझन मध्ये तुम्ही काय विकायला ठेवताय याचीही उत्सुकता लागलेली असणार. म्हणजेच तुम्ही एक व्यवसायिक म्हणूनच स्थापित होताल. याचा आणखी एक फायदा म्हणजे कोणत्याही एका व्यवसायावर अवलंबित्व नसल्यामुळे व्यवसायात अपयशाची शक्यता कमी होते. एखाद्या सिझन मध्ये एखादी वस्तू नाही चालली तर पुढच्या सिझन मध्ये तुम्हाला दुसरी संधी उपलब्ध असते. म्हणजेच एका ठराविक किमान उत्पन्नाची आपण अपेक्षा करू शकतो. सोबतच व्यवसाय सिझनल असल्यामुळे वर्षातील ५०% दिवस तुम्हाला इतर कामासाठी उपलब्ध होऊ शकतात. यात तुम्ही आणखी काही वेगवेगळे प्रयोग करू शकता.

या व्यवसायाची एक मुख्य खासियत म्हणजे कमी गुंतवणूक. एक चांगले शॉप सोडले तर या व्यवसायाला येणारा खर्च फक्त मालाचा असतो. ग्राहकही तुमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर स्टॉक व व्हरायटी ची अपेक्षा करत नाही. सिझनल व्यवसाय आहे म्हणजे थोडक्यातच असणार असेच त्यानेही गृहीत धरलेले असते. यामुळे तुम्हाला स्टॉक साठी जास्त गुंतवणुकीची गरज पडत नाही. शॉप सुद्धा विशेष सेटअप करण्याची गरज नाही, फक्त रंगरंगोटी आणि एक डेस्क एवढा खर्च पुरेसा आहे. म्हणजे पाच पन्नास हजारात व्यवसाय सुरु करता येतो. सिझनल व्यवसाय करणारे या कमी गुंतवणुकीमुळेच व्यवसाय करतात.

बघा… विचार करा. काहीतरी वेगळे करण्याचे नियोजनात असेल तर हा प्रयोग करू शकता. यशस्वी झाला तर भरपूर संधी भविष्यात सापडतील, आणि अपयशी झाला तरी जास्त गुंतवणूक अडकणार नाही. पण अपयशाची शक्यता नगण्य आहे, कारण प्रत्येक सिझन एका नवीन व्यवसायाची सुरुवात असणार आहे.

समजा उद्यापासूनच सुरुवात करायची असेल तर कशी कराल? एक छोटे का असेना पण चांगल्या लोकेशन ला शॉप घ्या. पावसाळ्याचा सिझन आहे. रेनकोट, छत्री यासारख्या पावसापासून बचाव करणाऱ्या वस्तूंच्या विक्रीची सुरुवात करा. मुंबई मार्केट मध्ये तुम्हाला या वस्तू भरपूर स्वस्तात मिळतात. यात तुम्हालाही आणखी काही नवनवीन संकल्पना सुचतील त्यावरही अंमल करा. हा व्यवयाच असा आहे कि इथे नवनवीन कल्पना अमलात आणणेही अवघड नाही.

करा सुरुवात… अतिशय थोडक्यात तुमचा चांगला व्यवसाय उभा राहू शकतो.

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड


One thought on “सिझनल बिझनेस :: वर्षभर चालणारा व्यवसाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!