लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
सामान्यपणे यशस्वी, मोठ्या उद्योजकांची ओळख एका ठरविक व्यवसायाशी जोडलेली असते. पण असे उद्योजक कधीही एका व्यवसायावर थांबलेले नसतात.
अशा यशस्वी उद्योजकांचे सरासरी किमान ७ ते ८ विविध व्यवसाय असतात. यातील एका व्यवसायात ते स्वतः पुर्णपणे गुंतलेले असतात, तर इतर व्यवसायांवर चांगले प्रशासक नियुक्त करून त्यांचेवर योग्य नियंत्रण ठेवतात.
अशा यशस्वी उद्योजकांचा एक आवडता व्यवसाय असतो तो म्हणजे गुंतवणुकीचा. शेअर्स, प्रॉपर्टी, स्टार्टअप फंडिंग, रिअल इस्टेट अशा विविध मार्गांनी हे उद्योजक आपला पैसे गुंतवून ठेवतात. हि गुंतवणूक त्यांना कायमस्वरूपी पैसा देत राहते आणि स्वतः सुद्धा वाढत राहते.
म्हणजे एक मुख्य व्यवसाय, एक गुंतवणुकीचा व्यवसाय आणि इतर ६-७ (Supportive) व्यवसाय जे भविष्यात स्वतः सुद्धा मोठे होणार असतात, किंवा मोठे झालेले असतात; असा पोर्टफोलिओ सामान्यपणे सर्वच यशस्वी उद्योजकांचा पाहायला मिळतो.
पण हे इतर सहा सात व्यवसाय उभे राहण्यासाठी या उद्योजकांनी किमान १५-२० वेगवेगळे प्रयत्न केलेले असतात हेही लक्षात घ्यायला हवे. ३०-४०% सक्सेस रेशो पाहता एवढ्यामधून चांगले ६-७ व्यवसाय शिल्लक राहतात आणि तेच पुढे वाढतात. यशाच्या पायऱ्या चढताना प्रत्येक उद्योजकाने या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
कोणत्याही एका व्यवसायावर अवलंबित्व नसावे, गुंतवणुकीवर भर द्यावा, प्रत्येक व्यवसाय यशस्वी होईलच असे नाही, व्यवसाय सांभाळू शकतील असे चांगले प्रशासक सोबतीला असावेत, अशा काही महत्वाच्या नियमामांवर अंमल केल्यास नक्कीच आपणही यशस्वी उद्योजकांच्या पंक्तीत बसू यात शंका नाही.
या नियमाला मार्क झुकेरबर्ग सारखे काही अपवाद आहेत, पण अपवाद नियम नसतात. बिल गेट्स, जेफ बेझोस असो किंवा आपले टाटा अंबानी सर्वांनी किमान २०-३० वेगवेगळ्या कंपन्यात गुंतवणूक केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. याहीपेक्षा स्थानिक उदाहरणे पाहायचे ठरवले तर मोठमोठे कारखानदार, व्यापारी यांच्या कितीतरी व्यवसायात गुंतवणूक असल्याचे आपल्याला लक्षात येईल.
यासाठी वेळ लागतो. १०-२० वर्षे जाऊ शकतात. पण प्रत्येक पायरीवर पुढच्या प्रवासासाठी भक्कम पाया तयार होतो. म्हणून आज मी कुठे आहे यापेक्षा पुढच्या १०-२० वर्षात मी कुठे असेल यावर लक्ष देणे आणि त्यानुसार नियोजन करणे अवश्यक असते. थोडक्यात… तुमचा पोर्टफोलिओ आजपासूनच बनवायला सुरुवात करा
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील