भारतीय युवकांना काय हवंय ?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

भारतीय युवकांना काय हवंय ?
बेझोस, बिल गेट्स, झुकेरबर्ग, अंबानी, टाटा
कि कट्ट्यावरच्या राजकारणाच्या गप्पा आणि राजकीय नेत्यांची गुलामी ?

प्रचारकी मीडियाच्या आहारी जाऊन आपले आयुष्य वाया घालवू नका… स्वतःचे भविष्य पहा, स्वतःसाठी वेळ द्या.
तरुणपणात आपल्या आयुष्याला दिलेली दिशा आपले भविष्य ठरवते…

चार पाच दिवसांपूर्वी भारतामध्ये अमेझॉन चे संस्थापक, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस आले होते. हि बातमी मलाही कळली नसती, पण परवा लोकमतमध्ये त्यांच्या वेरूळ दौऱ्याविषयी वाचायला मिळाले म्हणून कळले. भलेही बेझोस यांचा दौरा गुप्त असेल, वैयक्तिक असेल पण लोकमत ला कळले म्हणजे इतर मीडियाला सुद्धा कळलेच असेल ना ? पण तरीही कोणत्याही वर्तमानपत्रात, न्यूज चॅनेल वर यासंबंधी एक ओळीची सुद्धा बातमी नव्हती. याच वेळी देशात कोणता राजकारणी काय करतोय, कोण काय वादग्रस्त वक्तव्य करतोय, कुणी कुणाचा पाठिंबा काढला, कुणी कुणाला काय म्हटले, कोणत्या धर्माने काय केले, कोणत्या जातीच्या गटाने काय केले यासारख्या बातम्या मात्र दिवसभर चालूच होत्या, आजही चालू आहेत आणि भविष्यातही या बातम्यात यत्किंचितही बदल होण्याची शक्यता नाही.

आपली देशातील तरुण वर्ग या मीडियाच्या एवढा आहारी गेलाय को तोही दिवसभर याच बातम्यात गुंतून पडलेला असतो. गावाच्या पारावर राजकारणाचीच चर्चा, गल्ली बोळात तीच चर्चा, ऑफिस असो वा घर फक्त राजकारणावर गप्पा. राजकारणाशिवाय आपल्या आयुष्यात दुसरा काही उद्देशच नसावा अशी परिस्थिती झाली आहे. दिवसभर राजकारणाच्या गप्पा मारायच्या आणि मोकळ्या वेळात राजकीय लोकांच्या मागे पुढे फिरायचे हाच तरुण वर्गाचा दिनक्रम झाल्याची परिस्थिती आहे. .

१५ ते २५ वयाचा तरुण वर्ग या मीडियाच्या आणि राजकारण्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहारी गेला आहे. हे वयही असंच असतं. भडक, सतत काहीतरी विध्वंसक करण्याच्या मानसिकतेमध्ये असणारे. अरे ला कारे उत्तर देणारे. तात्काळ प्रतिक्रिया देणारे. यांचं ब्रेन वॉश करणे सोपे असते. हेच काम सध्या आपल्या देशातील मीडिया आणि राजकीय पक्ष करत आहेत. आणि हे तरुण आपली डोकी यांच्यापुढे गहाण टाकत आहेत. यांचे गुलाम बनण्यात समाधान मानत आहेत.

चार दिवसांपूर्वी उद्योजकांना आदर्श असणारा एक व्यक्ती देशात येऊन गेलाय हे कुणाच्या ध्यानी मनीही नाही. मीडियाला यावर चर्चा करावीशी वाटत नाही. कुणाला त्यांचा जीवनप्रवास सांगावासा वाटत नाही. बेझोस यांच्या भारत भेटीची संधी साधून देशातील नवउद्योजकांच्या भविष्यावर चर्चा व्हावी, काही नवीन मुद्दे चर्चेत यावेत, देशातील प्रतिष्ठित उद्योजकांनी अमली मते मांडावीत असे कोणत्याही चॅनेल ला, वर्तमानपत्रांना वाटले नाही. अशा मोठमोठ्या उद्योजकांचा जीवनप्रवास तरुणांना नेहमीच आदर्शवत असतो. या आदर्शांना समोर ठेऊनच नवउद्योजक आपला प्रवास करत असतो. बिल गेट्स, टाटा, अंबानी, झुकेरबर्ग असे कितीतरी उद्योजक नवउद्योजकांना प्रेरणा देतात.

आपल्या महाराष्ट्रातील हणमंतराव गायकवाड हे कितीतरी उद्योजकांसाठी आदर्श आहेत. पण यांची ओळख समाजाला करून देण्याचे कष्ट किती मीडियावाले घेतात ? किती राजकारणी घेतात? न्यूज चॅनेल वाले तर कधीतरी तोंडी लावण्यासाठी चटणी घ्यावी अशी क्वचित एखादी उद्योजकीय बातमी दाखवतात. नाहीतर सदा सर्वकाळ यांचा राजकारणाचाच आखाडा चालू असतो. यात आपण इतके गुंतून पडतो कि सदासर्वकाळ आपण सुद्धा फक्त राजकारण, जात धर्म, वाद विवाद यांचाच विचार करत राहतो. एक दिवस राजकारणावर नाही व्यक्त झालो तर काय कुणाला घंटा फरक पडणार नाही, पण एक दिवस जरी आपला मेंदू असल्या फालतू गोष्टींचा विचार करत असेल तर खूप मोठा फरक पडतो.

काय आदर्श ठेवतो आहोत आपण या पंचविशीतल्या मुलांसमोर ? राजकरणाव्यतिरिक्त जगात इतरही प्रश्न आहेत हे कुणी लक्षात घेणार आहे कि नाही ? या तरुणांनी सुद्धा आपली बुद्धी या लोकांकडे गहाण का टाकावी? वयाच्या तिशीच्या आत आपण आपल्या आयुष्याला काय दिशा देतोय यावर आपले भवितव्य ठरत असते. आपण पुढील वीस वर्षात कुठे असणार आहोत हे आपण पंचवीस तीस वयात काय करत आहोत यावर ठरते. मीसुद्धा काय सिनियर सिटीझन नाही, पण या सर्वांपासून मी वेळीच लांब गेलो याचं मला समाधान वाटत. मला राजकारणाचाही तिटकारा नाही किंवा मीडियाचाही द्वेष नाही. उलट राजकरण हे माझे आवडते क्षेत्र आहे. देशाला मोठं करण्याची क्षमता फक्त राजकीय व्यक्तीमधेच असते आणि देशाला शिस्त लावण्याची क्षमता फक्त मीडियामधेच असते. पण सध्या दोघेही आपले कर्तव्य विसरले आहेत, पिसाळलेल्या बैलासारखे उधळले आहेत आणि याचा परिणाम देशातील तरुण पिढी वाया जाण्यात होत आहे. बरं… यामुळे यांना फरकही पडत नाही. कारण दिवसाला करोडो जण जन्माला येत आहेत. यांचे चाहते कधीच कमी होणार नाही याची यांना खात्री आहे.

यांना यावर घालणे शक्य नाही. पण या नुकत्याच वयात आलेल्या पिढीने स्वतःला सावरणे गरजेचे झाले आहे. तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार करायचाय, ना कि कोणत्या राजकीय नेत्याचा व पक्षाचा. एखादा पक्ष वा राजकीय नेता सत्तेत आला म्हणजे खूप मोठा बदल घडतो हा एक प्रचंड मोठा भ्रम आहे. देश कधीच थांबत नसतो. देश पुढे जाताच राहतो. पण यांच्या नदी लागून तुमचा आयुष्य पार थांबून गेलेले आहे. देशातील ८०% युवकांना सध्या आपण काय करतोय हे कळत नाहीये, आणि कळाले तरी तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. वयाच्या पस्तीस चाळिशीनंतर पश्चाताप करूनही काही गेलेली वेळ आणि संधी परत येत नाही.

देशात उद्योजकतेविषयी जराशीही जनजागृती नाही. नवउद्योजकांना कशाचेही मार्गदर्शन नाही. तरुणांना योग्य दिशा देईल असा कोणताही कार्यक्रम नाही. उद्योजकता हा चर्चेचा विषय असू शकतो हेही कुणाला पटत नाही. देशात मागच्या महिन्यात एक मोठी डील झाली. फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्यामधे. या डील चा देशातील अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, यामुळे मार्केटमध्ये काय बदल होतील याचा किती जणांनी किमान विचार केला असेल हा प्रश्नच आहे. यावर चर्चा तर दूरचीच बात आहे. अगदी या उद्योजक मित्र पेज वर ऍक्टिव्ह असणाऱ्या सदस्यांपैकी जास्तीत जास्त २५% लोकांनीच या विषयावर थोडीफार चर्चा केली असेल याची मला खात्री आहे. याचे कारण उद्योजकता हा गांभीर्याने घेण्याचा विषय नाही अशी असलेली आपली मानसिकता. आपण मानाने कधीही उद्योजकतेमधे गुंतत नाही. उद्योजकता म्हणजे काय, मोठे उद्योजक मोठे कसे होतात, पैसा आणि यश यातील फरक, श्रीमंती आणि साधनात यातला फरक अशा कोणत्याही महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करावीशी वाटत नाही. पण राजकारणात कुठे काही घडू द्या.. आपण दिवस दिवस त्यावर चर्चा करत राहू. कुणाला धर्मावर बोलायचंय, तर कुणाला जातीवर. कुणाला एखाद्या पक्षावर बोलायचंय तर कुणाला एखाद्या वादावर… यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. पण याचवेळी या सगळ्यांना फक्त दहा मिनिट किर्लोस्करांवर, JRD वर बोला म्हटलं तर सगळे गायब होतील. आपण आज काय करतोय यावर आपला भविष्यकाळ ठरणार आहे.

भारतीय युवकांनी ठाम निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे…
आपल्याला बेझोस, बिल गेट्स, झुकेरबर्ग, अंबानी, टाटा हवे आहेत
कि कट्ट्यावरच्या राजकारणाच्या गप्पा आणि राजकीय नेत्यांची गुलामी ?

उशीर होण्याआधी हुशार व्हा…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!