मार्केटमधे काहीही विकलं जाऊ शकतं, मार्केटची गरज शोधा किंवा गरज निर्माण करा.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मार्केटमधे काहीही विकलं जाऊ शकतं, मार्केटची गरज शोधा किंवा गरज निर्माण करा.
स्कील, वस्तु, ज्ञान, माहिती, अभ्यास, सेवा…. काहीही विकु शकता

लोकांना प्रत्येक गोष्टीची गरज आहे, नसेल तर गरज निर्माण करायची असते. पण विक्री कोणत्याही परिस्थितीत करायचीच एवढाच निश्चय हवा.
अगदी दगड माती सुद्धा विकु शकता, फक्त लोकांना ते आपल्यासाठी महत्वाचं अाहे याची जाणीव व्हायला हवी…. दुरून कुठूनतरी आणलेले दुर्मीळ आकाराचे दगड घरात ठेवणे शुभ असते म्हणा, लोकं दगडं घरात ठेवतील. एखादी माती स्पेशल आहे आणि तिचं घरात ठेवणं महत्वाचं आहे म्हणा, लोकं किलो किलो ने माती घेतील….

जमाना ईनडायरेक्ट मार्केटिंग चा आहे…. लोकांना एखाद्या वस्तूची गरज निर्माण करून मग त्यांना आपलं उत्पादन घेण्यासाठी तयार करणे हा प्रकार मार्केटला नवीन नाही. पण यामधे फक्त वरच्या पातळीवरच अभ्यास चालतो. सामान्य उद्योजक अशा मार्केटिंग पासून दूर आहेत. जे खपतंय ते विका हा मार्केटिंग चा स्टॅंडर्ड पॅटर्न आहे, पण जे खपत नाही त्याची गरज निर्माण करून मग विका हा प्रकार तुम्हाला उद्योग जगताच्या वरच्या पातळीवर नेऊन स्थानापन्न करतो. लोकांना आधी गरज निर्माण करा मग ती गरज पूर्ण करणाऱ्या वस्तू सेवा विका…

सोपं उदाहरण घ्या. चार वर्षांपूर्वी आपल्याला महिन्याला १ जीबी इंटरनेट सुद्धा पुरायचं… आता ? दिवसाला १ जीबी कमी पडत आहे. कारण ? आपण ज्या साईटचा सर्वात जास्त वापर करतोय त्यावर व्हिडीओ, फोटो, जाहिराती वाढवून आपला युसेज नकळतपणे वाढवलेला आहे. तुम्ही जास्तीत जास्त इंटरनेटचे पॅक घ्यावे हि आता कंपन्यांची गरज राहिलेली नाही, तर जास्तीत जास्त इंटरनेट वापरायला मिळावं हि आपलीच गरज झाली आहे. कंपन्यांनी उद्या महिन्याचा युसेज कमी केला तर आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. आपल्याला इंटरनेट चा वापर वाढवायला इनडायरेक्ट मार्केटिंग चा वापर केलेला आहे. आणि हे चूक बिलकुल नाही. हा व्यवसायाचा भाग आहे. आधी गरज निर्माण करा आणि मग आपले उत्पादन मार्केट मधे मोठ्या प्रमाणात आणा… हि मार्केटिंग स्थानिक पातळीपासून अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने केली जाते.

चिनी वास्तुशात्र फेंग शुई ची आपल्याला काय गरज होती? काहीच नाही. तरीही ते खूप चांगले असते असे म्हणून आपल्या माथी मारलेच कि. पिरॅमिड आपल्या घरात कधीपासून यायला लागले ? त्याआधी आपल्याकडे समृद्धी नव्हती का ? होतीच, भरपूर समृद्धी होती. पण तरीही या वस्तूंची गरज तयार केली गेली. ती गरज मानसिकतेमध्ये तयार केली गेली. आपल्याला फेंग शुई, पिरॅमिड आपल्यासाठी महत्वाचे आहे असा विचार करायला भाग पडले गेले आणि या वस्तू खपवला गेल्या.

तीन – चार वर्षांपूर्वी १२ जून नंतर पुढचे दीड वर्ष विवाहाचा मुहूर्त नाही अशी अफवा सुटली होती. प्रत्यक्षात त्याच वर्षी दिवाळीत सुद्धा भरपूर मुहूर्त होते, पण या मुहूर्ताच्या चर्चेपेक्षा मुहूर्त नसल्याची अफवा वरचढ ठरली. या अफवेमुळे त्यावर्षी विवाहांचे सगळे रेकॉर्ड तोडले गेले होते. अगदी दहा दिवसात विवाह निश्चित करून मार्गी लावले गेले होते. काय कारण असेल या अफवेमागे ? त्यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात धोंड्याचा महिना येत होता. धोंड्याचा महिना म्हटलं कि जावयाची भरपूर सेवा केली जाते. कपडे, दागिने भेटवस्तू अशा कितीतरी वस्तू खरेदी केल्या जातात. हा एक मोठ्या उलाढालीचा महिना असतो. जून महिन्यांनंतर दीड वर्ष मुहूर्त नाही अशा अफवेमुळे लग्नाची संख्या दुपटी तिप्पट वाढली आणि पर्यायाने या नवीन जावयाची सरबराई करण्यासाठी मार्केटची उलाढाल सुद्धा कित्येक पटींनी वाढली. हेच जर अफवा नसती तर कित्येक लग्न दिवाळीत झाले असते, आणि या उलाढालीवर परिणाम झाला असता. मार्केटिंग चे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणून या घटनेकडे मी पाहतो.

हेल्थ इंडस्ट्रीचे उदाहरण घ्या. आपल्या लहानपणी फिल्टर पाणी होत का? नाही. तरीही आपल्याला कधी पाण्याचा त्रास झाला नाही? मग आज शुद्ध पाण्याची का गरज पडावी ? डेटॉल, लाईफबॉय सारख्या साबणाची किटाणू (याला मराठीमध्ये विषाणू म्हणतात) घालवण्यासाठी गरज कधीपासून पडायला लागली. या साबणी नव्हत्या त्यावेळी आपण काय २४ तास आजारीच असायचो का? बोर्नव्हिटा नव्हते म्हणून आपली वाढ कमी झाली का ? या कोणत्याही वस्तूची प्रत्यक्षात आपल्याला काहीच गरज नव्हती, तरीही आपण आवश्यक म्हणून वापरतोय. कारण आपल्या डोक्यामध्ये या गोष्टी गरजेच्या आहेत असे ठासून भरलेले आहे. हि आहे इनडायरेक्ट मार्केटिंग. किटाणू हा शब्द आपल्या डोक्यात घट्ट बसवलेला आहे. देशातील कोणत्याही भाषेत जाहिरात असली तर किटाणू शब्द बदलला जात नाही. किटाणू शब्दाची भीती निर्माण करून आपल्याला शुद्धतेच्या नावाखाली या वस्तू घ्यायला भाग पडले जाते. आपल्याला अप्रत्यक्षपणे गरज निर्माण केली जाते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, आजूबाजूला शोध घेतला तर लगेच सापडतील.

प्रत्येक क्षेत्रात या प्रकारचे मार्केटिंग फंडे वापरले जात आहेत. आपल्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे गरज निर्माण केली जात आहे. हि गरज तयार करणे हे यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक आहे.

तुम्ही एखादे सोडा शॉप सुरु केले. पण परिसरात सोडा पिण्याची सवय नसल्यामुळे कुणी ग्राहकच मिळत नाहीये. मग अशावेळी तुमच्याकडे काय पर्याय राहतो? एक तर शॉप बंद करा, किंवा सोडा ची गरज निर्माण करा. आता हि गरज कशी निर्माण कराल ? त्यासाठी वेगवेगळे मार्ग असू शकतात. आठवडाभर प्रत्येकाला एक एक ग्लास सोडा फुकट वाटा, किंवा तुमच्या काही मित्रांना दररोज संध्याकाळी तुमच्या सोडा शॉप वर ग्राहक म्हणून जमा व्हायला सांगा. गर्दी दिसली कि आपोआपच बाकीचे लोक सुद्धा एखादा ग्लास सोडा टेस्ट करून बघू असा विचार करतील. हळूहळू त्यांना जेवणानंतर सोडा पिण्याची सवय लागेल, आणि काही काळाने त्याशिवाय करमणार नाही. त्यात दररोज संध्याकाळी सोडा पिणे आरोग्यासाठी किती आवश्यक असते हे लोकांना दररोज सांगत चला. वर्षभरात तुमचे ग्राहक हौस म्हणून नाही तर आरोग्यासाठी आवश्यक म्हणून सोडा प्यायला येतील.

कित्येक वेळा लोकांना काही गोष्टींची गरज असते, पण त्याची जाणिव नसते. अशा गोष्टींचा नेहमी शोध घेत राहावा. गरज हि शोधाची जननी असते, आणि शोध हा व्यवसायाची पाया असतो. हि गरज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते. फक्त यासाठी तुमही नजर शोधक असायला हवी. कुठे काय लागतंय, कशाची कमतरता आहे याचा नेहमी शोध घेत राहा.

नवीन मार्गांचा वापर करा… विक्रीचा स्वतःचा अभ्यास तयार करुन त्यानुसार काम करा. विक्री कौशल्य डेव्हलप करा, मार्केटिंग च्या नवनव्या संकल्पनांचा अभ्यास करा, स्वतःचे मार्केटिंग चे अभिनव मार्ग तयार करा, मार्केटची गरज शोधा किंवा गरज निर्माण करा, मार्केटमधे काहीही विकलं जाऊ शकतं, फक्त विकण्याची तयारी हवी… व्यवसाय नक्कीच अवघड नाही

नवनवीन संकल्पना राबवणारे उद्योजक नेहमीच यशस्वी होतात.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

2 thoughts on “मार्केटमधे काहीही विकलं जाऊ शकतं, मार्केटची गरज शोधा किंवा गरज निर्माण करा.

  1. Really great thought. I am working on the project of DMIT i.e particular in counseling, guidance. Actually this product is going out of market. I just wanted to know, how can I create more market out of it?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!