मर्सिडीझ बेंझ, मारुती सुझुकी आणि मायक्रोसॉफ्ट…. यांच्यातील साम्य जे यांना सर्वोत्तम बनवतं…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

मायक्रोसॉफ्ट, मारुती सुझुकी आणि मर्सिडीझ बेंझ हे तीनही नावं तसे एकमेकांशी सुसंगत नाहीत. एक कंपनी सॉफ्टवेअर बनवते, एक मध्यमवर्गीयांसाठी वाहने बनवते आणि एक फक्त उच्चभ्रू लोकांसाठीच वाहने उत्पादन करते. पण या तीनही कंपन्यांमधे एक समान धागा आहे ज्यामुळे या कंपन्या नेहमीच त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम वाटतात आणि सर्वोत्तम असतात सुद्धा.

मारुती सुझुकी कंपनी देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. देशातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या टॉप १० गाड्यांमधे ८ मारुतीच्या असतात. देशातील कार मार्केट मध्ये आजही मारुतीचा हिस्सा ५० ते ६०% आहे. या कंपनीवर देशवासीयांची अतोनात प्रेम आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मायक्रोसॉफ्ट कंपनी सॉफ्टवेअर बनवते. विंडोज् हि त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम मागील कित्येक वर्षांपासून जगभरात आपला दबदबा राखून आहे. आपल्या क्षेत्रातील ८५% हिस्सा आजही मायक्रोसॉफ्ट चा आहे. आणि कंपनीचे संस्थापक बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंतांच्या रांगेत पहिल्या तीन मध्ये आहेत.

मर्सिडीझ बेंझ… प्रत्येक कार प्रेमीला आपल्याकडे एक तरी मर्सिडीझ असावी असे नेहमीच वाटते. फक्त गर्भश्रीमंत ग्राहकवर्गाला टार्गेट करणारी हि कंपनी आहे. आणि आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम आहे. मर्सिडीझ च्या तोडीस तोड आपल्याकडे BMW, Audi अय कंपन्यांनी चांगला जम बसवला आहे, पण मर्सिडीझ ब्रँड आजही यांच्यापेक्षा कणभर सरसच वाटतो.

या तीनही कंपन्या आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम आहेत. पण यांच्यातील समान धागा काय आहे माहित आहे? या तीनही कंपन्यांत दोन समान बाबी आढळतात

पहिली म्हणजे या कंपन्या कधीच आपल्या स्पर्धकांशी स्पर्धा करत नाही किंवा तसे दर्शवत नाही. या हत्तीसारखा आपल्या धुंदीत चालतात आणि इतर स्पर्धक त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात. या तीनही कंपन्यांची स्पर्धा स्वतःशीच असते, इतरांशी नाही.
आणि दुसरी म्हणजे या कंपन्या आपल्या विरोधकांचे सगळे निर्णय जाहीर होईपर्यंत शांत राहतात आणि मग आपली वाटचाल सुरु करतात.

या कंपन्या कधीच आपल्या स्पर्धकांशी स्पर्धा करत नाही किंवा तसे दर्शवत नाही…. काही उदाहरणे पाहू..

तुम्ही कधी ऐकलंय का कि मारुतीने नवीन स्विफ्ट लाँच केली आणि ती ह्युंदाईच्या i20 ला स्पर्धा देईल असं म्हटलंय. किंवा फोर्ड च्या फिगो ला स्पर्धा करेल असं म्हटलंय ?… कधीच नाही. मारुतीकडून असं तुम्हाला कधीही ऐकायला येणार नाही.

किंवा मायक्रोसॉफ्ट ने विंडोज ८ लाँच केल्यावर आमची OS लिनक्स वा इतर कोणत्या OS स्पर्धा करेल असं कधी म्हटलेलं नाही.

किंवा मर्सिडीझ ने आपल्या E-Class चे एखादे नवीन मॉडेल लाँच केले आहे आणि आमचे हे नवीन मॉडेल BMW च्या 5 Series किंवा Audi च्या A5 शी स्पर्धा करेल असं कधी म्हटलेलं नाही.

या तीनही कंपन्या आपलं प्रोडक्ट लाँच करतात पण त्यांची कुणाशी स्पर्धा आहे असे कधीही म्हणत नाही. कारण आपण ज्यांच्याशी स्पर्धा करतो त्याला आपण नकळतपणे आपल्यापेक्षा वरचा दर्जा दिलेला असतो.

पण याचवेळी जेव्हा ह्युंदाई, फोर्ड, टाटा किंवा इतर एखादी कंपनी स्विफ्ट च्या स्पर्धेमध्ये एखादी गाडी लाँच करते तेव्हा आवर्जून आमची गाडी स्विफ्ट ला स्पर्धा देईल असे म्हणते,
किंवा एखादी कंपनी जेव्हा एखादी OS किंवा इतर कोणते सॉफ्टवेअर लाँच करते तेव्हा ते मायक्रोसॉफ्ट च्या अमुक तमुक सॉफ्टवेअर शी स्पर्धा करेल असे आवर्जून सांगते.
किंवा BMW वा Audi जेव्हा एखादी कार लाँच करतात तेव्हा आवर्जून आमची गाडी मर्सिडीझ च्या कोणत्या मॉडेल शी स्पर्धा करेल हे सांगतात.

पण या तीनही कंपन्या कधीही आपली कुणाशी स्पर्धा असल्याचे सांगत नाही, स्वतःला इतरांपेक्षा कधीही कमी समजत नाहीत. एखाद्या हत्तीप्रमाणे त्या चालत राहतात, आपले निर्णय घेऊन मोकळ्या होतात आणि त्यांचे स्पर्धक त्यांना हरवण्यासाठी त्यांना फॉलो करतात…

या सगळ्याचा मार्केटवर एक वेगळा परिणाम होत असतो. आपण ज्यांच्याशी स्पर्धा करतो हे ओरडून सांगतो त्यांना आपण नकळतपणे आपल्यापेक्षा वरचा दर्जा देऊन टाकलेला असतो. म्हणजेच ग्राहकांनासुद्धा हेच जाणवते कि ते प्रोडक्ट यांच्याएक्षा वरचढ आहे, साहजिकच ग्राहकांचाही ओढा तिकडेच जातो. सोबतच आपण स्वतःलाच कमी लेखल्यामुळे आपण कधीही मानसिकतेने सर्वोत्तम होऊ शकत नाही. सतत आपण कुठेतरी कमी असल्याची जाणीव होत राहते, आणि तिचा नकारात्मक परिणाम आपल्यावर आणि पर्यायाने आपल्या कर्मचाऱ्यांवर होत असतो. आपली नकारात्मक ऊर्जा आपल्या ग्राहकांपर्यंत पोचते आणि तेही आपल्यापासून दूर जातात.
स्वतःला कुणाच्याही पंक्तीत न बसवता सर्वांपेक्षा वरच्या मजल्यावर विराजमान करणे हे एक महत्वाचे कारण आहे जे या कंपन्यांना त्यांच्या क्षेत्रात वर्चस्व प्रदान करते.
_

या कंपन्यांमधील दुसरा सामान धागा आहे तो म्हणजे सगळ्यांचे निर्णय होऊ देणे आणि मग आपला निर्णय जाहीर करणे…

या तीनही कंपन्या आपल्या स्पर्धकांना आधी त्यांची खेळी खेळायला भाग पडतात आणि नंतर आपले पत्ते उघडतात.

इतर स्पर्ध कंपन्यांनी आपली वाहने लाँच केल्यावरच मारुती आपले एखादे नवीन वा अपग्रेडेड वाहन बाजारात उतरवते.. मर्सिडीझ ची सुद्धा अशीच स्ट्रॅटेजी नेहमी पाहायला मिळते. यामुळे यांच्या स्पर्धा कंपन्या एका मर्यादेपुढे कधीच जाऊ शकत नाही. स्पर्धकांनी सगळी तयारी करून आपली वाहने लाँच केलेली असतात, आणि मारुती किंवा मर्सिडीझ, या कंपन्यांच्या नवीन मॉडेल ला स्पर्धा देतील अशा प्रकारे तयार करून आपली वाहने मार्केटमध्ये उतरवतात. यामुळे अर्थातच ग्राहकांचा ओढा पुन्हा यांच्याकडेच वळतो.

मायक्रोसॉफ्ट चा, याहीपेक्षा बिल गेट्स चा, अशा खेळींचा इतिहास तर प्रत्येकाने पाहावा असा आहे. कॉम्प्युटर च्या सुरुवातीच्या काळात माउस संदर्भात निर्णय घेणे असेल, किंवा इंटरनेट एक्सप्लोरर असेल मायक्रोसॉफ्ट ने नेहमीच आपल्या स्पर्धकांना त्यांचे प्रोडक्ट आधी मार्केट मध्ये उतरवायला भाग पडले आहे. आणि नंतर आपले प्रोडक्ट अगदी मोफत उपलब्ध करून यातल्या कित्येक स्पर्धकांना कायमचे मार्केटमधून बाहेर फेकलेले आहे.

यशस्वी होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पुढे राहिलेच पाहिजे असे काही नसते, काही वेळेस तुम्हाला इतरांना पुढे जाऊन द्यावे लागते आणि मग आपले प्यादे पुढे सरकवावे लागते.

थोडक्यात, तुमची मानसिकता तुमच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम करते.
स्वतःला कोठेही कमी न समजने, इतरांशी स्पर्धा न करता ( किंवा तसे न दर्शवत) आपल्याशीच स्पर्धा करणे आणि स्पर्धकांना आपले निर्णय आधी घेऊन देऊन मग आपली खाली खेळणे हे दोन गुण या तीन कंपन्यांना आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बनवतात. यासोबतच सेवा, गुणवत्ता, नेटवर्क या गोष्टी आहेतच. पण सर्वोत्तम होण्यासाठी मानसिकता सर्वोत्तमतेची असावी लागते जिथे या कंपन्या विजयी होतात.

या कंपन्यांच्या खास करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील कंपन्यांच्या, बाबतीत अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे. मागे टाटा नॅनो च्या अपयशाबद्दल लेख लिहिताना या इंडस्ट्री बद्दल आणखीही काही माहिती शेअर करण्याबाबत मी म्हणालोच होतो. सध्या तरी या कंपन्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करा, लवकरच यांच्या इतर बाबींचाही आपण अभ्यास करू.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!