लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
अनुभव…
व्यसायासाठी अनुभव नसणे हि बऱ्याच जणांना अडचणीची बाब वाटते. पण मला तरी अनुभव नसणे हि आपली जमेची बाजू वाटते. अननुभवी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकण्याची आपल्याला संधी असते. आणि याचसोबत होणाऱ्या चुका दुरुस्त करण्याची सुद्धा संधी उपलब्ध असते. बऱ्याच प्रस्थापित उद्योजकांमध्ये शिकण्याची मानसिकता संपून एक वेगळ्याच प्रकारचा इगो (गर्व) तयार झालेला असतो. मी एवढं सगळं साध्य केलेलं असताना आता मला कुणी शिकवायची गरज नाही अशी मानसिकता बऱ्याच यशस्वी लोकांमधे दिसते. याचा परिणाम एककल्ली कारभारावर होतो, आणि नकळतपणे व्यवसाय अधोगतीकडे वाटचाल करतो. याचवेळी प्रत्येक क्षणी शिकण्याची मानसिकता असेल तर अगदी जगातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाचा मालक सुद्धा एखाद्या नवख्या उद्योजकांकडून किंवा त्रयस्थाकडून एखाद्या विषयावर सल्ला घेऊ शकतो.
अनुभव नसणे हि आपल्यासाठी पर्वणी असते. दररोज काहीतरी नवनवीन शिकण्याची संधी असते. व्यवसायात जेवढं जास्त शिकता येईल तेवढं शिकत राहणे आवश्यक आहे. अननुभवी असल्यामुळे इतरांकडूनही आपल्याला वेळोवेळी चांगले – वाईट सल्ले मिळत राहतात, फक्त ते मोकळ्या मनाने स्वीकारण्याची तयारी असायला हवी. जे मला पटलंय ते अंतिम सत्य आहे असं कधीही वाटू देऊ नये. आपल्या विचारावर कधीही प्रेम करू नये. हे ध्यानात घेतलं कि बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सापडतात.
जेवढं अज्ञान दाखवताल तेवढं जास्त शिकायला मिळतं. तुम्ही नवखे आहात हे समजलं कि समोरचा तुम्हाला जास्तीत जास्त शिकविण्याचा प्रयत्न करतो. ते सगळं तुमच्या काही कामाचं नसतं, पण त्यातलं २०% नक्कीच तुम्हाला व्यवसाय करताना कामी येणार असते.
अनुभव नसण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे चुका दुरुस्त करण्याची संधी इतरांपेक्षा जास्त असते. अनुभवी लोकांना आपल्या चुका मान्य करण्यात नेहमीच अडचण असते. लोक काय म्हणतील हि भीत असते. समाजाकडून चेष्टा होण्याचा धोका असतो. व्यवसायातील पत कायमची संपू शकते. पण नवख्यांना हि भीती नसते, आणि यामुळे चुकलो तरी ती चूक दुरुस्त करता येईल हा आत्मविश्वास असतो.
मी खरं सांगतो… माझा पहिला व्यवसाय एका टेलिकॉम फ्रॅंचाईजी चा होता आणि व्यवसाय सुरु होईपर्यंत मला विक्रीचे कणभरही ज्ञान नव्हते. आणि फ्रॅंचाईजी म्हणजे काय याचा अर्थ व्यवसाय सुरु होईपर्यंतही मला कळलेला नव्हता. माझा कोणताही व्यवसायिक कोर्स झालेला नाही, मी MBA सुद्धा शिकलेलो नाही, ना मी कोणत्या कंपनीत काम केलेले आहे… आठ वर्षांपूर्वी मला व्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता.
मी आठ वर्षांपूर्वी पूर्णपणे अज्ञानी होतो. अननुभवी होतो. मला व्यवसायाने आणि माझ्या सहकाऱ्यांनीच शिकवलेले आहे. मिळेल तेवढे ज्ञान घेत राहणे हे एकमात्र काम होते या काळात मला. यासोबतच चेष्टा करणाऱ्यांचा माझ्या व्यवसायिक शिक्षणात मोठा वाट आहे. मी स्वतः वकील आहे आणि माझे संपूर्ण कुटुंब वकीली क्षेत्रात आहे. माझे कुटुंब वकिली क्षेत्रात महाराष्ट्रातील नामांकित कुटुंबांपैकी एक आहे. त्यामुळे सगळं सेटल असलेले प्रोफेशन सोडून व्यवसायात येणे हा माझ्या जवळच्या लोकांसाठी चेष्टेचाच विषय होता. पण एकदा व्यवसाय करायचं ठरवल्यावर अनुभव नसणे, लोक काय म्हणतील, यश मिळेल का ?, व्यवसाय नाही चालला तर काय? असले प्रश्न कधी मनाला शिवले नाही. कारण निर्णय माझा होता, माझ्या मनाप्रमाणे होता, आणि अर्थातच त्यात अनुभव नाही हा अडचणीचा प्रश्न ठरू शकत नव्हता…
अनुभव नसणे हि आपलं कमजोरी बिलकुल नाही. उलट त्याचा फायदा कसा करून घेता येईल याकडे लक्ष द्यावे.
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील