‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
स्त्रियांसाठी व्यवसाय म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर ठरलेले पापड, लोणचे, मसाले बनवण्याचे व्यवसाय उभे राहतात. मग या महिला कसं हलाखीतलं जीवन जगत आहेत, त्यांना गरिबीत या व्यवसायांची कशी आवश्यकता आहे हे मनोभावे सांगणारी मीडिया डोळ्यासमोर येते.
मुळात, गरिबी आहे म्हणून व्यवसाय करत असतात असलं लॉजिक मानसिकता कुणी शोधून काढलं हेच कळत नाही. मागील काही वर्षात अशा बोकाळलेल्या मीडियाकर्मींमुळे स्त्रियांनी व्यवसायात येण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मध्यमवर्गीय महिला तर व्यवसायापासून कोसो दूर आहेत. खरं तर महिलांनी आता सक्रियपणे व्यवसायात उतरण्याची तयारी केली पाहिजे. यात तरुणींचा सहभाग जास्त आवश्यक आहे.
चुकीच्या नियोजनामुळे, आणि चुकीच्या प्रचारामुळे व्यवसाय करणाऱ्या महिलांमधे आता मुख्यत्वे तीन वर्ग तयार झाले आहेत
पहिला वर्ग म्हणजे गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिला ज्यांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कुणीतरी एखादा गृहउद्योग सुरु करून देतात आणि मग त्यांच्याकडून खरेदी करतात, या वर्गाला उद्योजक म्हणताच येत नाही. या महिला रोजंदारीच करत असतात फक्त घरी बसून. यांना तेवढेच उत्पन्न मिळते जेवढे एखाद्या ठिकाणी रोजाने काम केल्यावर मिळेल.
दुसरा वर्ग म्हणजे आर्थिक हलाखीतुन वर आलेल्या उद्योजिका. स्वतः व्यवसाय सुरु करणाऱ्या आणि स्वतः मार्केटमध्ये विक्री करणाऱ्या. या खरंच उद्योजिका आहेत. पण यांची माहिती सांगताना गरिबी जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मग ते सांगताना सहानुभूती निर्माण करण्याच्या दृष्टीने एक सुंदर पण भवानीक स्टोरी तयार करून सांगितली जाते. यामुळे महिलांनी व्यवसाय करणे म्हणजे घराची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे मान्य करणे अशी मानसिकता तयार झाली आहे. एक प्रकारे परिस्थिती चांगली असती तर नोकरी केली असती पण परिस्थिती खूपच खराब म्हणून व्यवसायात आल्यात अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न असतो. या चुकीच्या प्रचारात या उद्योजिका महिला सुद्धा हिरीरीने सहभागी होतात. म्हणजे व्यवसाय कमी दर्जाचा आहे पण उदरनिर्वाहाला काहीतरी हवं म्हणून आम्ही व्यवसायात आलोय असं या महिला म्हणत असतात. थोडक्यात या महिला कामाने उद्योजिका असल्या तरी मानसिकतेने अजूनही नोकरदारच असतात. मी तर असे म्हणेल कि यांची मानसिकता उद्योजिकांची होऊ नये यांनी आयुष्यभर न्यूनगंड बाळगूनच राहावं यासाठीच हा सर्व खटाटोप चाललेला असतो.
आणि तिसरा वर्ग म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या, मध्यमवर्गाच्या वर असणाऱ्या मुली व महिला. यांचा समाजाशी, सामान्य वर्गाशी जास्त संबंध नसतो. या महिला आपला व्यवसाय समर्थपणे सांभाळत असतात, नवनवीन संकल्पनांचा शोध घेत असतात. स्वतःचे अस्तित्व तयार करत असतात. अशा महिला यशस्वी उद्योजिका होतात. पण इथेही आपली प्रचारकी यंत्रणा आडवी येते. या महिला करत असलेला व्यवसाय सामान्य वर्गाच्या कसा आवाक्याबाहेर आहे हे दाखवण्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते.
अशा चुकीच्या मार्केटिंगमुळे मध्यमवर्गीय महिलांमधे व्यवसायाविषयी फोबिया तयार झालेला आहे. आणि यामुळेच मध्यमवर्गीय स्त्रिया, तरुणी व्यवसायात येण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. मुख्यत्वे तरुणींकडून व्यवसाला मिळणारा प्रतिसाद अगदीच कमी आहे.
हि मानसिकता बदलणे आता आवश्यक झाले आहे. स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या हिमतीवर उभा करून उद्योजिका होण्याचे स्वप्न तरुणींनी बघायला हवे. व्यवसायात यशाची खात्री काय? हि एक वाटणारी भीती, पण योग्य नियोजन आणि प्रभावी जाहिरातींची साथ असेल तर व्यवसाय अपयश येत नाही. खरं तर व्यवसायात अपयश कधीच येत नाही. एका व्यवसायाला चिटकून राहणारे अपयशी होऊ शकतात पण लवचिक भूमिका ठेवणारे अपयशी कधीच होत नाहीत. ते पर्याय निर्माण करत असतात, आणि व्यवसाय वाढवत असतात.
यासाठी
व्यवसायाविषयी मानसिकता आधी बदला,
व्यवसाय म्हणजे काहीतरी बनवायचं आणि विकण्यासाठी दारोदार भटकायचं, असं नाही. व्यवसाय हि संकल्पना खूप मोठी आहे तिचा योग्य अभ्यास करणे आवश्यक आहे.
उत्पादन, रिटेल शॉप, ट्रेडिंग, फ्रॅंचाईजी असे अनेक प्रकार आहेत व्यवसायाचे. आपल्यासाठी काय योग्य आहे हे पाहून सुरुवात करायची असते. महिलांसाठी मुख्यत्वे रिटेलर्स शॉप्स, फ्रॅंचाईजी बिजनेस किंवा सर्व्हिस इंडस्ट्री योग्य राहते. मोठा ग्रुप असेल, मार्केटिंग साठी मार्ग तयार असतील तर हरकत नाही, पण सध्याच्या यशस्वी उद्योजिकांच्या बिझनेस स्ट्रॅटेजी पहिल्या तर जवळजवळ सर्वजणी या रिटेल किंवा सर्व्हिस व्यवसायातून पुढे आलेल्या आहेत हे लक्षात येईल.
देशात आणि जगभरात मागील पंधरा वीस वर्षात कित्येक तरुणी नवउद्योजिका म्हणून पुढे आलेल्या आहेत. यातील जवळजवळ ९५% या रिटेल किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीशी निगडित आहेत. बुटीक, ब्युटी पार्लर, गारमेंट शॉप, क्राफ्ट्स, IT इंडस्ट्री, Designing इंडस्ट्री अशा काही मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील क्षेत्रांकडे तरुणींचा कल जास्त आहे. पण यासोबतच नवनवीन संकल्पना राबवण्याकडे सुद्धा कल दिसून येत आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून विक्री करण्यात महिलांची संख्या जास्त आहे.
मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा रिटेल आणि सर्व्हिस इंडस्ट्री सुटसुटीत आणि सोपे क्षेत्र आहे. या क्षेत्रांत करण्यासारखे कितीतरी चांगले व्यवसायांचे पर्याय आहेत. मार्केटमध्ये थोड्या शोधक नजरेने पाहिलं तर शेकडो व्यवसायाच्या संधी सापडतील.
सुरुवात कशी करावी ?
१. आधी योग्य व्यवसाय निवाडा. तुमच्या भागातील परिस्थिती, गुंतवणूक क्षमता, तुमचा अनुभव, वैयक्तिक संपर्क, मार्केट स्थिती, परिसरातील ग्राहकांची मानसिकता यासारख्या विविध बाबींवर व्यवसाय निवड ठरते.
२. त्यासाठी आवश्यक जागेकरिता योग्य जागी जागा विकत किंवा भाड्याने मिळवा.
३. रिटेल व्यवसाय निवडला असेल तर निवडलेल्या व्यवसायासाचा माल, वस्तू कुठे मिळतो याची माहिती काढा. उदा. कपड्यांचे शॉप ठरवले असेल तर ठोक भावात कपडे कुठे मिळतात याची माहिती काढावी. हे मार्केट देशभरात कुठेही असू शकते. हे एक तर व्होलसेल मार्केट असतं किंवा ब्रँडेड प्रोडक्ट साठी डिस्ट्रिब्युटर्स. इतर व्यवसाय असतील तर कच्चा माल कसा उपलब्ध होईल यांची माहिती घ्या.
४. मिळालेल्या माहितीनुसार त्या त्या मार्केट मध्ये जाऊन एक दोन दिवस निरीक्षण करावं. त्यानंतर काही सप्लायर्सशी चर्चा करून रेट, क्वालिटी ची माहिती घ्यावी. आणि मग मुखय खरेदीला सुरुवात करावी. सगळी खरेदी लगेच करू नये. टप्प्याटप्प्याने हि खरेदी करावी.
५. रिटेल व्यवसाय असेल तर शॉप डिझाईन करून सेटअप करावे. गुंतवणुकीची क्षमता असेल तर चांगल्या डिझायनर कडून शॉप डिझाईन करून घ्या. सर्व्हिस इंडस्ट्री किंवा फ्रॅंचाईजी असेल तर ऑफिस किंवा शॉप सेटअप करून घ्यावे. उत्पादन क्षेत्र असेल तर जागा निश्चित करून घ्यावी.
६. रिटेल शॉप ची रचना आकर्षक करा. लोकांकडून मते जाणून घ्या. त्यानुसार सेटअप करा
७. शॉप पूर्णपणे सेटअप झाल्यानंतर ओपनिंग ची तयारी करावी. यापूर्वी परिसरात चांगल्या प्रकारे जाहिरात करून वातावरण निर्मिती करावी.
८. कामगार, कर्मचारी भरती करून घ्यावी. त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षण म्हणजे खूप मोठं काही नाही, फक्त ग्राहकांशी कसे वागावे, ग्राहक कसे हाताळावेत, विक्रीची कला, बोलण्याची पद्धत यासंबंधी महती द्यावी.
९. ओपनिंग करताना शक्य होईल तेवढे भव्य करावे. प्रेझेंटेशन कोणत्याही व्यवसायासाठी खूप महत्वाचे असते.
१०. उत्पादन क्षेत्रात सुरुवात करणार असाल तर मार्केटची माहिती करून घ्या. आपल्या संभावित ग्राहकांशी संपर्क वाढावा. प्रमोशन सुरु करा. आपले प्रोडक्ट आपल्या संभावित ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या.
११. उत्पादन क्षेत्रात मार्केटिंग महत्वाची ठरते. त्यावर भर द्या. मार्केटमधे काम केलेले, विक्री क्षेत्राचा अनुभव असलेले काही कर्मचारी जोडून घ्या.
१२. सुरुवात झाल्यानंतर मार्केटमधे आपले प्रोडक्ट प्रभावीपणे पोहोचेल, विक्री योग्य प्रकारे होईल यावर लक्ष केंद्रित करा.
१३. हि झाली व्यवसायाची सुरुवात. आता तो कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे सुरु राहण्यासाठी तुम्ही स्वतःला त्याप्रमाने तयार करणे आवश्यक आहे. ज्यासाठी मार्गदर्शनापेक्षा तुमच्या स्वयंशिक्षणाची आवश्यकता आहे.
व्यवसाय सुरु केल्यानंतर तुम्ही आपोआपच व्यवसायाचे गुण शिकत असता. त्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते. फक्त एक नियम ध्यानात ठेवा; व्यवसाय सुरु केल्यानंतर उगाच नफ्या तोट्याचे हिशोब मांडत बसू नका. कोणत्याही व्यवसायासाठी पहिली तीन वर्षे खूप महत्वाची असतात. या काळात पहिल्या दोन वर्षात नफ्या तोट्याचा हिशोब मांडत बसण्यापेक्षा ग्राहक वाढवण्याकडे लक्ष द्यायचे असते. तुम्ही ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा नफा आपोआपच होणार असतो.
व्यवसाय अवघड आहे, कठीण क्षेत्र आहे असं काहीच नाही. व्यवसाय गरज नाही, आवड आहे. व्यवसाय करणारी व्यक्ती कितीही अडचणीत असली तरी कधीही नोकरी करताना तुम्हाला दिसणार नाही, ते फक्त व्यवसायाचेच नियोजन करत असतात, कारण व्यवसायातली ताकद त्यांना माहित असते.
व्यवसाय कधीही गरज म्हणून केला जात नाही. व्यवसाय हे पॅशन आहे, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची हि संधी देणारे हे क्षेत्र आहे. स्वतःच अस्तित्व तयार करण्याची संधी देणारे हे क्षेत्र आहे. तुम्हाला स्वयंपूर्ण करणारे हे क्षेत्र आहे. आपल्या कल्पनांना मूर्त रूप देणारे हे क्षेत्र आहे. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी मेहनत करण्याचे समाधान देणारे हे क्षेत्र आहे. हे क्षेत्रच वेगळे आहे. इथे तुम्हाला फक्त पैसाच नाही तर समाधान सुद्धा मिळत असतं. तुम्हीही या क्षेत्रात या, स्वतःच भविष्य घडावा.
तरुणींनो,
व्यवसायाचा फोबिया दूर करा….
तयारी करा, नियोजन करा, सुरुवात करा
उद्योजिका व्हा…
समृद्ध व्हा…
______
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
नमस्कार, मला पण खूप वाटते. माझे रेडीनववारी चा बिझिनेस खूप वाढावा. त्यासाठीचे नियोजन, प्लानींग शीकावेशे वाटते.
Its better to Call Mr. Shrikant Avhad @ 7744034490
Message is not sufficient
This is really inspiring and guiding article. Thanks for sharing with us. We are also running nauvari saree store that has started with very low budget and now it is expanding in all India.