ब्रँड नेम, लोगो आणि ट्रेड मार्क चे महत्व


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

ब्रँड नेम आणि लोगो तुमच्या व्यवसायाची ओळख असतात, तर ट्रेड मार्क हे तुमच्या ब्रँड चे संरक्षण कवच. तुमचा व्यवसाय हा तुमच्या ब्रँड नेम आणि लोगोवरून ओळखला जातो आणि ट्रेड मार्क तुमच्या ब्रँड चा इतर कुणाला त्याचा बेकायदेशीर वापर करण्यापासून रोखतो.

म्हणूनच व्यवसायात या तीन गोष्टींचे अनन्यसाधारण महत्व आहे. ब्रँड नेम शिवाय तुमचा व्यवसाय शून्य आहे, लोगोशिवाय तुमचा व्यवसाय अपूर्ण आहे, आणि ट्रेड मार्क शिवाय तुमचा व्यवसाय असुरक्षित आहे.

मार्केटमध्ये कोणतेही उत्पादन हे त्याच्या ब्रँडनेम नेच ओळखले जाते, ज्याला आपण ब्रँड म्हणतो. आणि ब्रँड हा त्याच्या लोगो ने ओळखला जातो. परंतु आजही व्यवसाय सुरु करताना या तीनही बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते.

काही जण ब्रँड नेम निवडतात लोगो बनवतात तरीही यानंतर सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे त्याचा ट्रेड मार्कनोंदवत नाहीत. हि चूक ८०% व्यवसायिकांकडून केली जाते. ट्रेड मार्क नसेल तर तुमच्या ब्रँड ला काहीच अर्थ उरत नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे कितीही प्रमोशन केले आणि उद्या दुसऱ्याच कुणीतरी तोच ब्रँड, ट्रेड मार्क म्हणून नोंदवून घेतला तर तुमचा व्यवसाय शून्य होतो. तुमचाच ब्रँड तुम्ही वापरू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. किंवा बऱ्याचदा पूर्ण माहिती न घेता ब्रँड नेम निवडला जातो, व्यवसायाचे प्रमोशन सुरु होते आणि कालांतराने तुम्हाला कळते कि तुम्ही वापरात असलेला ब्रँड आधीच कुणीतरी ट्रेड मार्क करून घेतलेला आहे. थोडक्यात तुम्हाला तुमच्या व्यवसाय पूर्णपणे परत शून्यापासून दुसऱ्या नावाने सुरु करावा लागतो. यामुळे तुमचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असते.

ब्रँड नेम, लोगो आणि ट्रेड मार्क या तीनही गोष्टी एकमेकांसाठी आवश्यक आहेत, आणि तुमच्या व्यवसायासाठीही.

म्हणूनच आपण ब्रँड नेम, लोगो आणि ट्रेड मार्क संबंधी काही महत्वाच्या बाबी पाहुयात

ब्रँड नेम :: BRAND NAME

१. ब्रँड नेम निवडताना अतिशय काळजीपूर्वकी निवडावा. जर तुमचा व्यवसाय तुमच्या परिसरापुरता मर्यादित न ठेवता भविष्यात मोठ्या स्तरावर नेण्याचे नियोजन असेल तर ब्रँड नेम निवडतानाच त्याचा ट्रेड मार्क उपलब्ध आहे कि नाही हे पाहून घ्यावे. तुमच्या व्यवसायाचे नाव आणि तुमचे ब्रँड नेम हे दोनीही वेगळे असू शकतात. तुमचे उत्पादन मार्केटमध्ये कोणत्या नावाने जाते त्याला ब्रँड नेम म्हणतात. त्यामुळे एकाच व्यवसायाचे शेकडो ब्रँड असू शकतात.

२. बरेच जण ट्रेड मार्क ची उपलब्धता वेबसाईट साठी डोमेन उपलब्ध आहे कि नाही हे पाहून ठरवतात. पण वेबसाईट साठी डोमेन मिळतंय म्हणजे ट्रेड मार्क सुद्धा उपलब्ध असेलच असे नाही. देशभरात लाखो व्यवसायिकांनी त्यांचे ब्रँड नेम हे ट्रेड मार्क करून ठेवलेले असतात. त्यांनी त्या ट्रेड मार्क ची वेबसाईट केलेलीच असेल असे नाही. त्यामुळे आधी ट्रेड मार्क उपलब्ध आहे कि नाही हे पाहूनच आपला ब्रँड निवडावा. ब्रँड नेम निवडणे हि मोठी आणि महत्वाची प्रोसेस आहे. यासाठी कित्येक संस्था हजारो लाखो रुपये शुल्क घेतात.

३. ब्रँड नेम निवडताना तुमचा व्यवसाय, व्यवसायाचे क्षेत्र, परिसरातील ग्राहकांची मानसिकता, भविष्यातील योजना, मार्केट ट्रेंड, यासारख्या विविध बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. तसेच निवडलेले नाव इतर कोणत्याही ब्रँड नेम शी साधर्म्य दर्शवणारे नसावे. तुमचे स्वतंत्र अस्तित्व तुमच्या ब्रँड मधून दिसले पाहिजे.

४. ट्रेड मार्क नोंदवण्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि आपण निवडलेले ९९% ब्रँड नेम हे आधीच ट्रेड मार्क म्हणून नोंदवलेले असतात. त्यामुळे सुचणाऱ्या जास्तीत जास्त नावांची यादी बनवावी, यासाठी एक छोटी डायरी आणि पेन नेहमी सोबत असावा. तुम्हाला दिवसभरात जेवढी नावे सुचतील तेवढी या डायरीत नोंदवून घ्यावीत. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांकडून नावे सुचवून घ्यावीत. या सर्व नावातून ट्रेड मार्क नोंदणीसाठी उपलब्ध असलेली नावे बाजूला काढत जावे. किमान १०-२० खात्रीशीर नावे समोर आल्यानंतर त्यातून एक चांगला ब्रँड नेम निवडावा.

५. ट्रेड मार्क उपलब्ध आहे कि नाही हे शोधण्याची प्रक्रिया ट्रेड मार्क वेबसाईट वर पब्लिक सर्च या नावाने ओळखली जाते. निवडलेले ब्रॅंडनेम, ट्रेड मार्क करण्यासाठी उपलब्ध आहे कि नाही हे शोधण्यासाठी www.ipindia.nic.in या वेबसाईटवर जावे. यातील ट्रेड मार्क ऑप्शन वर जाऊन पब्लिक सर्च ऑप्शन उघडावे. तुमच्या व्यवसायाच्या प्रकारानुसार ट्रेड मार्क चे क्लासेस बनविलेले आहेत. आपला व्यवसाय कोणत्या क्लास मध्ये आहे ते बघावे. त्यानुसार या पब्लिक सर्च मध्ये आपले ब्रँड नेम व क्लास टाकून सर्च करावे. यानंतर तुम्हाला एक यादी दिसेल ज्यामध्ये त्या नावाचे किती ब्रँड नोंदवले गेलेले आहेत ते कळेल. जर अशी यादी आली तर तो ब्रँड उपलब्ध नाही असे समजावे, आणि जर सर्च वर क्लिक करूनही कोणतीही यादी अली नाही (no record found असे आले) तर ब्रँड नेम उपलब्ध आहे म्हणजेच अजून ट्रेड मार्क म्हणून नोंदवलेला नाही असे समजावे. हि शोधपद्धत ९०% काम करते. ब्रँड नेम शोधनात स्पेल्लिंग मध्ये थोडे फार फेरफार करून सुद्धा शोध घ्यावा. काही वेळेस स्थानिक भाषेत आणि इंग्रजी मध्ये स्पेलिंग चा घोळ असतो.

६. ब्रँड नेम निवडताना शक्यतो आधुनिक निवडावा. बरेच जण आपल्या मुला मुलींची नावे, देवी देवतांची नावे देतात, पण यामुळे तुमच्या ब्रँड ला लोकल स्वरूप प्राप्त होऊ शकते. त्यामुळे अशी नावे शक्यतो टाळावीत. व्यवसायाच्या प्रकारानुसार ब्रँड नेम निवडावा लागतो. काही जण इंग्लिश नाव म्हणजे भारी ब्रॅण्ड असं समजतात, हाही एक भ्रम आहे. ब्रँड नेम हे व्यवसायासाठी योग्य असले पाहिजे. त्याचा भाषेशी संबंध नसतो.

७. ब्रँड नेम लगेच लोकांच्या लक्षात राहील असे असावे, किंवा त्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी लोक ते नाव लक्षात ठेवतील असे असावे. इतरांपेक्षा हटके, कधीही न ऐकलेले, अगदी विचित्र सुद्धा, किंवा काही शब्दांचे जोडून एक शब्द बनविलेले असे ब्रँड नेम लोकांचे लक्ष वेधून घेतात.
माझ्या ‘रॉजलीन बिझनेस सोल्युशन्स’ (Roslin Business Solutions) या बिझनेस कन्सल्टिंग फर्म मधील “Roslin” या शब्दाचा अर्थ आजपर्यंत ९५% क्लायंट नी विचारलेला आहे. ब्रँड ची अशी ओळख नेहमीच फायदेशीर असते.

८. ब्रँड नेम निवडताना जास्तीत जास्त लोकांचे सल्ले घ्यावेत. यातून तुम्हाला लोकांना आकर्षक वाटणारी नावे निवडायला सोपे जाते. बहुमत हे नेहमीच फायदेशीर असते.

९. ब्रँड नेम निवडल्यानंतर पुढची पायरी असते ती म्हणजे लोगो डिझाईन. याबद्दल पुढे सविस्तर पाहुयात.

_______________

लोगो डिझाईन :: LOGO DESIGN

१. तुमच्या व्यवसायाची सर्वात प्रथम ओळख. लोगो हा तुमच्या व्यवसायाचा सर्वात महत्वाचा भाग असतो. म्हणूनच लोगो डिझाईन करताना योग्य प्रकारे डिझाईन करणे आवश्यक असते.

२. लोगो डिझाईन करताना प्रोफेशनल लोगो डिझाइनर कडून डिझाईन करून घ्यावा. बऱ्याचदा घराच्या घरी पॉवर पॉईंट वर लोगो बनवला जातो, किंवा एखाद्या बॅनर,पत्रिका बनविणाऱ्या डिझाइनर कडून लोगो बनवून घेतला जातो. असे लोगो कधीच चांगले बनत नाहीत. लोगो बनविणे हि एक कला आहे. यासाठी त्यात मुरलेलेच डिझाइनर आवश्यक असतात. प्रोफेशनल डिझाइनर ला लोगो बनवण्यातील कौशल्य चांगली आत्मसात असतात. असे डिझायनर तुमचा लोगो उत्तमरीत्या डिझाईन करून देतात. काही जण फ्री लोगो बनवणाऱ्या वेबसाईट वरून लोगो घेतात. पण यात ट्रेड मार्क चा भंग होण्याची शक्यता असते, आणि अगदी तसाच लोगो इतरांकडूनही वापरला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्री लोगो वेबसाईट वरून लोगो घेऊ नका. या वेबसाईट चा वापर कन्सेप्ट मिळविण्यासाठी करू शकता.

३. लोगो डिझाईन करताना त्यात तुमच्या व्यवसायाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे, किंवा त्यात काहीतरी चांगला अर्थ असला पाहिजे याची काळजी घ्या. तुमच्या ब्रँडच्याच नावाने तुमचा लोगो असावा असे काहीच नाही. मर्सिडीझ कंपनीचा लोगो आणि ब्रँड याचा काहीही संबंध नाहीये, पण त्या लोगो मध्ये सुप्त अर्थ दडलेला आहे. त्या लोगोतील अर्थ महत्वाचा.

४. लोगो बनविताना व्यवसायाचा, उत्पादनाचा, स्थानिक परिस्थितीचा, रंगसंगतीचा, भविष्यातील व्यवसायिक नियोजनाचा विचार केलेला असावा.

५. लोगो बनविण्यात सोपा नसावा. तो फक्त डिझाईन सॉफ्टवेअर (कोरल ड्रॉ ई.) वरच बनवता येईल अशा प्रकारचा असावा. काही लोगो हे पवार पॉईंट वर सुद्धा बनवता येतील असे असतात, यामुळे लोगोची कॉपी करण्याचे प्रकार होतात.

६. लोगो शक्यतो कोणत्याही इतर लोगोची कॉपी नसावा. पूर्णपणे नवीन बनविलेला लोगो असावा. यासाठी डिझायनर ला डिझाईन चे पूर्ण स्वातंत्र्य असावे, त्याच्या कामात आपले डोके खुपसून ढवळाढवळ करू नका.

७. लोगो मधील रंगसंगती प्रसन्न असावी. मरगळ आणणारे रंग टाळावेत. तसेच लोगो जास्त भडक नसावा. शांत सौम्य लोगो जास्त आकर्षक वाटतो.

८. लोगो डिझाईन साठी प्रोफेशनल डिझायनर्स पाच सहा हजारांपासून काही लाखांपर्यंत शुल्क घेतात. ते शुल्क त्यांच्या कौशल्याचे असते. त्यामुळे लोगो डिझाईन साठी खर्च बचत करण्याच्या मागे लागू नका, चांगला लोगो तुमच्या व्यवसायाला उच्च स्तरावर नेऊन ठेऊ शकतो.

९. लोगो डिझाईन झाल्यानंतर पुढची पायरी म्हणजे ट्रेड मार्क नोंदणी.

_______________

ट्रेड मार्क नोंदणी :: TRADE-MARK REG.

१. लोगो डिझाईन करून झाल्यावर महत्वाची पायरी म्हणजे ब्रँड नेम व लोगो, ट्रेड मार्क करून घेणे. ट्रेड मार्क नोंदणीचे अप्रूव्हल येण्यासाठी किमान सहा महिने लागतात. पूर्वी दोन वर्षे जात परंतु आता वेळ खूप कमी झाला आहे.

२. ट्रेड मार्क नोंदणीकरिता व्यवसायाच्या प्रकारानुसार शासकीय शुल्क आहे. हे शुल्क रु. ४५००/- पासून सुरु होते.

३. परंतु ट्रेड मार्क नोंदणीसाठी शक्यतो एखादी अधिकृत एजन्सी निवडावी. यासाठी काही शुल्क द्यावे लागते पण तुमचा ट्रेड मार्क योग्य प्रकारे नोंदणीच्या मार्गे जातो.

४. ट्रेड मार्क नोंदणीसाठी घेतले जाणारे शुल्क हे वेगवेगळ्या भागात विभागले जाते. ट्रेड मार्क नोंदणीसाठी कुठेही शोध घेतला तरी प्रत्येकाकडून नेहमीच ६-७ हजार रुपये शुल्क सांगितले जाते. परंतु हे शुल्क फक्त ट्रेड मार्क अप्लिकेशन च्या फाईलींग साठीचे असते. यात ट्रेड मार्क ची पूर्ण प्रक्रिया येत नाही. यात ऑब्जेक्शन सारख्या महत्वाच्या प्रोसेस आहेत. हि प्रक्रिया करण्यासाठी नंतर वेगळे शुल्क सांगितले जाते. हे शुल्क रु. १० हजारापासून १५-२० हजार रुपयांपर्यंत असू शकते. थोडक्यात कोणताही ट्रेड मार्क नोंदणीसाठी किमान १५-१६ हजार खर्च हा येतंच असतो. शक्यतो अधिकृत ट्रेड मार्क ची कामे करणारे आणि पूर्ण फी ची माहिती आधीच सांगणारे ट्रेडमार्क कन्सल्टन्ट शोधावेत.

५. हे अतिरिक्त १०-१५ हजार रुपये शुल्क ट्रेड मार्क अप्लिकेशन फाईलींग नंतर कराव्या लागणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेसाठी असते. फक्त अर्ज केला म्हणजे तुमचा ट्रेड मार्क नोंदवला जात नाही. या अर्जानंतर तुमच्या ट्रेड मार्क वर काही आक्षेप येतात, तसेच ट्रेड मार्क अथॉरिटी कडून काही शंका उपस्थित केल्या जातात. यासाठी एका प्रतिनिधीला ट्रेड मार्क कार्यालयात तुमच्या वतीने हजार राहणे आवश्यक असते. हि हजेरी किमान २-३ वेळा आवश्यक असते. जर असा कुणी प्रतिनिधी किंवा तुम्ही कार्यालयात आपले म्हणणे सादर केले नाही तर अर्ज नामंजूर केला जातो. हि कायदेशीर प्रक्रिया तुम्हाला करणे शक्य नसते, यासाठी तुम्हाला अधिकृत IPR कन्सल्टन्ट कडेच जावे लागते, आणि ते या प्रोसेस साठी त्यांचे शुल्क घेत असतात. थोडक्यात कुणी कितीही ५-६ हजारात ट्रेड मार्क नोंदवून देतो म्हणाला तरी त्यावर विश्वास ठेऊ नका, उलट तो तुमचा फक्त अर्ज करेल, पण त्यांनंतरची काहीही कार्यवाही करणार नाही, आणि याचा फटका तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला बसेल. ट्रेड मार्क नोंदणीच्या पूर्ण प्रक्रियेसाठी किमान १५-१६ हजार खर्च येतो हे लक्षात ठेऊन चला. पण याचबरोबर हा खर्च केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नसते. कारण तोपर्यंत तुमचा ब्रँड धोक्यात असतो.
कमी शुल्काच्या नादाला लावून सध्या बऱ्याच व्यवसायिकांची फसवणूक करण्याचे काम चालू आहे म्हणून या विषयावर थोडे जास्त लिहिलेले आहे.

६. ट्रेड मार्क साठी अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या लोगो सोबत TM असे लिहू शकता व ट्रेड मार्क मंजूर झाल्यानंतर R लिहिता येतो. कोणतेही अप्रूव्हल नसताना लोगोसोबत TM अथवा R लिहिलेले असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे असे धाडस करू नका.

हि आहे ब्रँड नेम, लोगो आणि ट्रेड मार्क ची थोडक्यात माहिती.

या तीनही कन्सेप्ट बद्दल बऱ्याच जणांना शंका असतात, त्या दूर झाल्या असतील अशी अपेक्षा करतो. या तीनही गोष्टी तुमच्या व्यवसायासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. यासाठी खर्च येतो हे जरी मान्य केले तरी त्यामुळे मिळणारे फायदे कितीतरी पटींनी मोठे असतात हेही सत्य आहे. व्यवसाय साक्षरतेच्या या मोहिमेत मी स्वतः या तीनही बाबींवर जातीने लक्ष ठेवतो. माझ्या सर्व क्लायंट्स ला, मित्रांना या तीनही बाबींची योग्य पूर्तता करण्यासाठी नेहमीच प्रवृत्त करतो. पण याचे खरे कारण काय आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 8688 - Today Page Visits: 2

One thought on “ब्रँड नेम, लोगो आणि ट्रेड मार्क चे महत्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!