उद्योजकांचा आदर करा…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मागील काही वर्षात देशात उद्योजकांविरोधी एक लाट आलेली आहे. उद्योजकांना सर्रास दरोडेखोर चोर संबोधण्याची स्पर्धाच सुरु असलेली दिसत आहे. यात काही ठराविक वर्ग सक्रिय झालेला दिसतो. पण यामुळे देशात (मुख्यत्वे महाराष्ट्रसाराख्या नोकरीलाच सर्वोच्च मानणाऱ्या प्रांतात) तयार होऊ पाहत असलेली उद्योजकीय मानसिकता किती दूषित होत आहे याचा या टीकाकारांना अंदाज नाहीये.

व्यवसाय करायचा म्हणजे काहीतरी उरफाटेच धंदे करावे लागतात असा नवउद्योजकांचा समज व्हायला लागला आहे. माझ्याकडे येणारे बरेचशे क्लायंट सुद्धा याच मानसिकतेमध्ये असतात. यात जास्त करून २२-२८ वयातले जास्त आहेत. यांना व्यवसाय सुरु करण्यासंबंधी कोणतीही माहिती नको असते, फक्त कर्ज काढायचे आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट वाढवून दाखवायचा आहे आणि मिळालेल्या कर्जातून किमान २०-३०% पैसा वेगळे काढायचे आहेत अशीच मानसिकता असते. यांना सरळ मार्गी व्यवसाय करता येतो यावर विश्वासच बसत नाही. फक्त कुठूनतरी फेरफार करून पैसे कमवायचे एवढंच डोक्यात असतं. अशांना मी आल्या पावलीच परत पाठवून देतो. पण यातून आपल्याला देशात व्यवसायाविषयी किती चुकीचा दृष्टिकोन पसरत आहे याचा अंदाज येतो.

पैसा कमावण्यासाठी दोन नंबरचाच धंदा करावा लागतो अशीच मानसिकता होऊ पाहते आहे. एखादा उद्योजक मोठा झाला म्हणजे त्याने काहीतरी बेकायदेशीर कामच केलेले असणार, त्याचे नक्कीच काहीतरी काळे धंदे मार्केटमध्ये चालू असणार, त्याने नक्कीच कुणाचेतरी कर्ज बुडवले असणार अशीच प्रत्येकाची धारणा दिसून येते. देशातील प्रत्येक मोठ्या उद्योजकाला चोर म्हणून संबोधण्याची वृत्ती बळावते आहे. आपल्यापेक्षा श्रीमंत हा बेईमानच असतो असली मानसिकता आपल्याकडे घराघरात आढळते त्याचाच हा परिपाक.

तरी बरं, आपल्याकडे बिल गेट्स, झुकेरबर्ग, बफे, बेझोस यासारखे जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक नाहीत नाहीतर आपण यांच्या नावाने दररोज शिमगा केला असता. असल्या टीकांनी या उद्योजकांना काहीही फरक पडत नाही, पण याचा परिणाम नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असलेल्या नवउद्योजकांवर होत आहे याचा कुणी गांभीर्याने विचार करायला तयार नाही. अंबानीला सर्रास चोर म्हणताना रिलायन्स ग्रुप ने मागच्या एक वर्षात रु. ७०,००० कोटी पेक्षा जास्त कर भरलेला आहे याचे आपल्याला भानही नसते. याच अंबानींची रिलायन्स कंपनी देशाच्या एकूण खाजगी निर्यातीपैकी ७% पेक्षा जास्त निर्यात करते याचीही माहिती नसते.

असो… यावर स्वतंत्र ओळी लिहिता येतील पण स्पष्टच बोलायचं म्हटलं तर सध्या देशांतर्गत उद्योजकांविषयी तिरस्कार निर्माण करण्याची पद्धत हि चीन च्या सांस्कृतिक क्रांतीची आठवण करून देते. या क्रांतीमध्ये देशातील सर्व उद्योजक सरसकट चोर ठरवून मारले गेले होते किंवा त्यांच्या संपत्ती जप्त केल्या गेल्या होत्या. पण काही काळातच याचे दुष्परिणाम दिसायला लागले आणि चीन ची अधोगतीची सुरु झाली. बरेच वर्ष आर्थिक अरिष्ट भोगल्यावर चीन ने पुन्हा उद्योजकांना योग्य तो सन्मान देऊन देशात उद्योजकांसाठी चांगले वातावरण निर्माण केले. याचा परिणाम आज चीन जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आणि जवळजवळ सर्व जगभरात निर्यातीमध्ये आपले वर्चस्व राखून आहे. हीच निर्यात या देशाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करत आहे.

जेवढे जास्त उद्योग वाढतील तेवढे रोजगार तयार होतील हेसुद्धा आपण विसरत चाललो आहोत. नोकऱ्या हव्या असतील तर आधी व्यवसाय निर्माण करावे लागतील. आणि व्यवसाय उभे राहण्यासाठी आधी व्यवसायिकांना योग्य तो सन्मान द्यावा लागेल. उद्योजक किती श्रीमंत होतात हे पाहण्यापेक्षा आणि त्याचा तिरस्कार करण्यापेक्षा आपला त्यामुळे काय फायदा होतोय हे पाहणे महत्वाचे आहे.

उद्योजकांविषयी असलेला तिरस्कार नवीन उद्योजक तयार करण्यात अडथळा आणत आहे. आणि जे कुणी व्यवसायात येऊ इच्छित आहेत त्यांची मानसिकता पूर्वग्रह दूषित बनत चाललेली आहे. तरुणांमधे व्यवसायाची मानसिकता तयार होण्याऐवजी व्यवसायाविषयी नकारात्मक दृष्टिकोन तयार होत आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम नवीन उद्योग उभे राहण्यावर होणार आहे आणि अप्रत्यक्ष परिणाम रोजगार निर्मितीवर आणि अर्थव्यवस्थेवर होणार आहे. उद्योजकीय अनास्थेमुळे आपले परकीय कंपन्यांवरील अवलंबित्व वाढत चालले आहे. लहान लहान (लघुद्योग) व्यवसाय निर्मिती कमी होण्याची शक्यता वाढू लागली आहे. मोठ्या प्रोजेक्टसाठी स्थानिक कंपन्यांपेक्षा परकीय कंपन्याच सक्षमपणे पूढे येत आहेत. यातून तात्पुरती अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली तरी दूरच विचार करता हे देशासाठी घातकच आहे.

उद्योजकांचा योग्य आदर केला तरच या देशात उद्योजकीय संस्कृती वाढणार आहे, आणि उद्योजकीय संस्कृती वाढली तर देशाची आर्थिक प्रगती होणार आहे. काही जण टीका करतच राहणार आहेत, ज्यांना उद्योजकांचा राग येतो त्यांना सुद्धा विरोध नाही, पण सार्वजनिक व्यासपीठावर उद्योजकांविषयी बोलताना आपण नकळतपणे देशाच्या भवितव्याशी खेळात आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

निरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे लोक देशातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करत नाही. टाटा, आंबानी, बिर्ला, मित्तल, गायकवाड, अझीझ प्रेमजी, महिंद्रा, नारायणमूर्ती हे देशातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करतात हे लक्षात घ्यावे. दोन चार चुकीच्या लोकांमुळे या क्षेत्राला बदनाम करण्याचा अधिकार कुणालाही नाही.

_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!