मागील काही महिन्यांपासून सुरु असलेली इराणच्या चलनाची, रियाल ची, घसरगुंडी सुरूच असून ते आता एका डॉलरला १,१२,००० पर्यंत घसरले आहे. अमेरिकेने नव्याने जाहीर केलेले आर्थिक निर्बंध आणि आर्थिक संकटामुळे या चलनाचे दर दिवसेंदिवस घसरतच चालले आहेत.चालू वर्षाच्या सुरुवातीला हा दर ३५,१८६ होता.
रियालची मार्चमध्ये प्रथम मोठी घसरण झाली. त्यावेळी रियालने डॉलरमागे ५० हजारांचा नीचांक गाठला. एप्रिलमध्ये इराण सरकारने ४२ हजारांवर हा दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला तसेच, काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतु हा व्यापार सुरू राहिला असून दीर्घकालीन आर्थिक समस्येने इराण अधिकच त्रस्त होत आहे. बँकांनीदेखील कृत्रिमरीत्या कमी केलेल्या दराने डॉलरची विक्री करण्यास नकार दिला आहे. अमेरिका अणुकरारातून बाहेर पडल्याने इराणचे चलन मोठ्या प्रमाणावर कोसळले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीत झालेल्या करारामुळे इराणवरील निर्बंध थोड्या प्रमाणात शिथिल झाले होते. मात्र ट्रम्प यांनी इरांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. लवकरच अमेरिका पुन्हा दोन टप्प्यांत इराणवर पूर्ण निर्बंध लादणार आहे, याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.