मागील काही महिन्यांपासून ट्रम्प यांनी चीनविरोधात पुकारलेल्या व्यापार युद्धाचे परिणाम दिसायला लागले आहेत असे आता म्हणता येईल. अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त २५% इम्पोर्ट ड्युटी, अतिरिक्त ३४ अब्ज डॉलर्स चा कर, मुळे आधीच अब्जावधींची अमेरिकी कामे चिनी कंपन्यांच्या हातून गेली आहेत, यातच आता अमेरिकेने हा वाढीव कर आणखी १०% नि वाढवण्याचे संकेत दिले आहेत. हे व्यापार युद्ध किती दूरपर्यंत जाईल आत्ताच सांगता येणार नाही पण, अमेरिकी प्रशासन या करात अशीच वाढ करत राहिले तर येत्या काळात हा वाढीव कर ६० अब्ज, २०० अब्ज, ५०० अब्ज डॉलर्स पर्यंत जाऊ शकतो; आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास चीनमधील कित्येक मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघू शकतात असे चीन प्रशासनामधील उच्च अधिकारी ड्यू वन्हूआ (Du Wanhua, deputy director of an advisory committee to the Supreme People’s court) यांनी मत व्यक्त केले आहे.
चीन प्रशासन या व्यापारी युद्धाला सामोरे जाण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे, परंतु तरीही कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसत आहे. वाढीव करामुळे अब्जावधींचे अमेरिकी कॉन्ट्रॅक्ट चिनी कंपन्यांच्या हातून गेले आहेत. सध्यातरी कंपन्या हे व्यापार युद्ध तात्पुरते असेल अशी अशा बाळगून आहेत. पण असे न झाल्यास या कंपन्या पूर्णपणे दिवाळखोरीत निघण्याची दाट शक्यता आहे. तसेच या व्यापार युद्धाचा याचा थेट परिणाम चीन च्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होण्याची शक्यता आहे.