कृषी निर्यातदार व्हा…


कृषी उत्पादने निर्यात करण्यासंबंधी थोडक्यात माहिती

फर्म / संस्थेची स्थापना :-
कृषिमालाची निर्यात करण्यासाठी आयात-निर्यात परवाना अत्यावश्यक आहे. सदरचा आयात-निर्यात परवाना काढण्यासाठी सर्वप्रथम एखाद्या प्रोप्रायटरी / भागीदारी /प्राईव्हेट लिमिटेड / पब्लिक लिमिटेड / सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी अथवा ट्रस्ट इ. प्रकारच्या संस्थेची संबंधित विभागांकडे नोदणी करावी. राष्ट्रीयकृत / अंकित सहकारी किंवा बहुराष्ट्रीय बँकेमधे संस्थेच्या नावाचे चालू स्वरूपाचे खाते उघडावे लागते. हा परवाना वैयक्तिक नावावरही प्राप्त होऊ शकतो.

आयात – निर्यात परवाना (IEC) :-
आयात-निर्यात परवाना मिळण्यासाठी प्रपत्र ANF2A (Click here to download ANF2A) चे भाग-ए, भाग-डी चे प्रपत्र संपूर्णपणे भरून अर्जदाराच्या स्वाक्षरीने सहसंचालक विदेश व्यापार यांचे पुणे, मुंबई अथवा नागपूर कार्यालयात हस्ते किंवा पोस्टाद्वारे जमा करावे लागते.

आयात निर्यात परवाना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ मार्गदर्शन करते. आयात निर्यात परवान्यासाठी पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांसाठी रू. 573/-, संस्थांसाठी रू.1,145/- व खाजगी व्यापाऱ्यांसाठी रू.2,290/- एवढी सल्ला फी (सेवाकरासह) आकारण्यात येते. त्यासाठी पणन मंडळाच्या [email protected] या आय.डी. वर ई-मेल केल्यास आवश्यक ती सर्व माहिती ई-मेलद्वारे प्राप्त होऊ शकेल..

निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी (RCMC) :-
आयात निर्यात परवाना प्राप्त झाल्यावर निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी तथा सहभागी प्रमाणपत्र आवश्यक असते. कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा, नवी दिल्ली यांचे विभागीय कार्यालय अथवा वेबसाईटच्या द्वारे नोंदणी करता येते. तथापि अर्ज व आवश्यक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपेडा यांच्या विभागीय कार्यालयाकडे पाठवाव्या लागतात.

नोंदणीसाठी अपेडा रू. 5,725/- एवढी फी (सेवाकरासह) आकारते व नोंदणी मार्गदर्शनासाठी पणन मंडळ रू. 573/- (सेवाकरासह) एवढी फी आकारते.

आयातदार कसा शोधावा :-
विविध माध्यमातून आयातदार शोधता येतो. त्यासाठी पुढीलप्रमाणे काही मार्ग उपलब्ध आहेत.

अपेडाचे ट्रेड लिड्स
इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चर
आंतरराष्ट्रीय प्रदर्शने
यासोबतच कित्येक खाजगी वेबसाईट आहेत ज्यावर आयातदारांची माहिती मिळू शकते.
संबंधित देशांतील भारतीय परराष्ट्रखात्याकडून सुद्धा त्या त्या देशातील आयातदारांची माहिती मिळविता येऊ शकते
ज्या देशातील आयातदार शोधायचे आहेत त्या देशातील स्थानिक व्यावसायिक (B2B) वेबसाईट वरूनही माहिती मिळविता येते

आयातदारांची यादी प्राप्त झाल्यावर आयातदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्या आयातदाराला आपल्याकडे निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या कृषिमालाची, प्रमाणाची, हंगामाची इत्यादी सर्व माहिती ई-मेल अथवा फॅक्सद्वारे पाठवावी. त्याचा प्रतिसाद प्राप्त झाल्यावर इच्छुक आयातदारांसोबत पत्रव्यवहार व दूरध्वनीद्वारे पुढील चर्चा करणे, त्याला आवश्यक असलेल्या मालाचे नमूने पाठविणे इत्यादीबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

बहुतांशी कृषिमालाच्या निर्यातीमध्ये आयातदाराकडून कोणत्याही प्रकारची एल.सी. (लेटर ऑफ क्रेडीट) प्राप्त होत नाही. सदरच्या मालाची आयात ही निश्चित दराने अथवा कन्साईनमेंट (विक्री होईल त्या दराने व्यवहार या तत्वावर) बेसिसवर केली जाते व मालाची विक्री केल्यानंतर कमिशन आणि इतर अनुषंगिक खर्चाची वजावट करून उर्वरित रक्कम आयातदाराकडून निर्यातदारास पाठविली जाते.त्यामुळे कोणत्याही प्रकारची लहान /मोठी निर्यात करण्यापुर्वी आयातदाराची बाजारातील पत तपासणे आवश्यक असते. जेणेकरून आयातदाराकडून फसवणूकीचे अथवा लुबाडणूकीचे प्रकार होणार नाहीत. आयातदारांची पत तपासण्याचे काम डन अँड ब्रॅडस्ट्रीट यासारख्या खाजगी व एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.यासारख्या शासकीय संस्थांकडून करण्यात येते. संपर्कासाठी वेबसाईट www.ecgc.in तसेच एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. यांचेकडे आपण निर्यात मालाचा विमा उतरू शकतो. काही कारणांमुळे आयातदाराकडून रक्कम प्राप्त न झाल्यास ई.सी.जी.सी. मार्फत दावा दाखल करू शकतो. वैयक्तिक स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोर्टकचेऱ्या करणे अवघड जाते.

कृषिमालाच्या निर्यातीपूर्वी ज्या आयातदाराला व ज्या देशात कृषिमालाची निर्यात करावयाची आहे त्या देशामध्ये आवश्यक असलेली गुणवत्ता, पॅकींग, दर इत्यादीबाबतची माहिती आयातदाराकडून प्राप्त करून घ्यावी व त्या गुणवत्तेच्याच मालाची निर्यात करण्यात यावी.निर्यातीपूर्वी मालाच्या विक्री दरांबाबतची माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.जेणेकरून निर्यात करण्यात येणाऱ्या मालाच्या विक्री रक्कमेमधून निर्यातीच्या खर्चाच्या रक्कमेची वजावट केल्यास व्यवहारामध्ये होणाऱ्या संभाव्य फायदा /तोट्याची माहिती मिळू शकेल.त्याचबरोबर निर्यातीबाबतची सर्व कागदपत्रे तयार करणे, विमानामध्ये जागा आरक्षित करणे, कस्टम क्लिअरन्स करणे यासाठी क्लिअरींग अँड फॉरवर्डींग एजन्टची (सी.एच.ए.) आवश्यकता असते. अशा प्रकारचे एजन्ट्स मुंबई /पुण्यामधे उपलब्ध असतात. सदरच्या कामासाठी चांगल्या सी.एच.ए. ची नियुक्ती करणे आवश्यक असते. वेगवेगळ्या सी.एच.ए.चे पत्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून उपलब्ध होऊ शकतात.

विमानमार्गे निर्यातीबरोबरच कृषिमालाची समुद्रमार्गेसुद्धा निर्यात केली जाते.उत्पादनांची जवळच्या देशांमध्ये निर्यात करावयाची असल्यास ४० फूटी अथवा २० फूटी कंटेनरचा वापर करण्यात येतो. लांबच्या देशांमधे डाळिंब, आंबा, द्राक्षे, यासारख्या नाशवंत कृषिमालाची निर्यात करावयाची झाल्यास वाहतुकीचा कालावधी जास्त असल्याने त्यासाठी रिफर / सी. ए. / एम.ए. (कंट्रोल्ड / मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर) कंटेनरचा वापर करण्यात येतो. तांदूळ, इंजिनिअरींग उत्पादने अशा प्रकारच्या अनाशवंत मालाची निर्यात ड्राय कंटेनरद्वारे करण्यात येते. त्याचबरोबर विविध उत्पादनांसाठी आवश्यकतेनुसार कंटेनर उपलब्ध होऊ शकतात.

आयातदाराकडून मालाची विक्री रक्कम परकीय चलनामधे आपल्या बँकेमधे जमा करण्यात येते.सदर परकीय चलनाचे रूपयामधे रूपांतर होऊन त्यानंतर सदरची रक्कम निर्यातदाराच्या खात्यामधे जमा करण्यात येते.विक्रीची रक्कम लवकरात लवकर प्राप्त होण्याच्या दृष्टीने बँकेच्या ज्या शाखेमधे परकीय चलन विनिमयाचे व्यवहार केले जातात अशा बँकेतच खाते उघडणे आवश्यक व सोईस्कर असते.आयातदाराकडून काही कारणांमुळे रक्कम प्राप्त होण्यात अडचणी येत असल्यास ई.सी.जी.सी. अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एजन्सीची मदत घेता येते.

समारोप
सुरुवातीला खूप मोठ्या व्यवहारात पडू नये. सुरुवातीला लहान प्रमाणावर व्यवहार करून सर्व माहिती प्रत्यक्ष अनुभवावी. यांनतर हळूहळू व्यवहार वाढवत न्यावेत. या व्यवसायात पेमेंट संदर्भात समस्या उद्भवत असतात, त्यामुळे चांगला अनुभव आल्यानंतरच मोठ्या व्यवहारांचा विचार करावा. सुरुवातीचे किमान १-२ वर्षे जास्त काही अपेक्षा न करता निर्यातीसंबंधी सर्व ज्ञान मिळेल यासाठी प्रयत्न करत रहा. त्यांनतर तुम्हाला कसलीही अडचण जाणवणार नाही.

धन्यवाद
स्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

संकलन व अतिरिक्त माहिती
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “कृषी निर्यातदार व्हा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!