सकाळच्या ठळक व्यवसाय बातम्या (१ ऑगस्ट)


सर्वाधिक भांडवलात रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल
शेअर बाजारात सर्वाधिक भांडवली हिस्सा बाळगणाऱ्या कंपन्यांच्या सूचीत रिलायन्स इंडस्ट्रीने अव्वल स्थान पटकावले आहे. मंगळवारच्या सत्रात टाटा समूहाला मागे टाकत रिलायन्सने ही कामगिरी नोंदविली. रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग २.३२ टक्क्यांनी वाढल्याने या कंपनीचा एकूण भांडवली हिस्सा मंगळवारी ७.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. टाटा समूहाचा भांडवली हिस्सा ७.३९ लाख कोटी रुपये आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांच्या दार युद्धावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न
ई-कॉमर्स वेबसाइट्सवर मिळणारे बंपर डिस्काउंट्स आता लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन व्यापार आणि डिस्काउंट्स नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नवीन धोरण तयार करत असून त्याच्या मसुद्यावर लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. नवीन ई-कॉमर्स धोरणाचा मसुदा सरकारने सोमवारी सार्वजनिक केला. या मसुद्यानुसार ई-कॉमर्सवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात पावलं उचलणार असल्याची चिन्हं आहेत. लोकांकडून सूचना आल्यानंतर या मसुद्यात बदल करून नवीन धोरणाचे विधेयक संसदेत संमत होईल.
अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या बड्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या भरमसाट सवलतींचा फटका देशांतर्गत किरकोळ व्यावसायिकांना बसत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. तसेच, या बड्या कंपन्यांकडून परदेशी थेट गुंतवणुकीसंबंधी असलेल्या कायद्याचेही उल्लंघन केले जात असल्याचा आरोपही करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरण आखले जात आहे. ऑनलाइन व्यापार करणारी कोणतीही कंपनी अथवा कंपन्यांचा समूह आपल्या माध्यमातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे वस्तूंच्या किंमतींवर प्रभाव टाकून (सवलत मूल्य) त्यांची विक्री करू शकणार नाही, असे या मसुद्यामध्ये म्हटले आहे.

One+ मोबाईल विक्रीत अव्वल
भारतातील स्मार्टफोन बाजारामधील अव्वल क्रमांकावर असणाऱ्या सॅमसंग तसेच अॅपल कंपन्यांना वन प्लसने जोरदार धोबीपछाड दिला आहे. ३० हजारहून अधिक रुपये किंमतीच्या प्रिमियम स्मार्टफोन सेक्शनमध्ये वन प्लसने सॅमसंगला मागे टाकले आहे. हॉगकाँगमधील काऊंटरपॉइण्ट रिचर्स या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार एप्रिल-जून या तिमाहीमधील वन प्लसचा भारतामधील खप हा मागील वर्षाच्या ९ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे.

RBI च्या पतधोरण समितीची बैठक सुरु.
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरवात झाली असून, चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी द्विमाही बैठक आहे. पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचलेली महागाई तसेच, तीन वर्षांच्या उच्चांकावर असलेले इंधनाचे दर पाहता या बैठकीत व्याजदर जैसे थे राहतील, असे विविध तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर आगामी काळात महागाईची जोखीम कमी असल्याने व्याजदरात कोणतिही वाढ केली जाणार नाही, असा अंदाज ‘एसबीआय’ने वर्तविला आहे. तिथेच ‘आरबीआय’कडून व्याजदरात वाढ केली जाईल, असे ‘डीबीएस’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सेन्सेक्स निफ्टीची घोडदौड सुरूच
गेल्या आठवड्यातील पाच सत्रांत सुरू असलेली घोडदौड कायम राखत काळ मंगळवारी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांनी नवा उच्चांक प्रस्थापित केला. सेन्सेक्‍स १५७.५५ अंशांच्या वाढीसह ३७,४९४.४० अंशांवर बंद झाला. तर, निफ्टी ४१.२० अंशांच्या वाढीसह ११,३१९.५५ अंशांवर स्थिरावला. परकीय निधीचा निरंतर सुरू असणारा भांडवलाचा ओघ, गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी दोन्ही निर्देशांकांना आज पुन्हा नव्या शिखरावर घेऊन गेली. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, तेल आणि वायू, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत तेजी दिसून आली.

 

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!