अ‍ॅपल :: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून १००० अब्ज (१ ट्रिलियन) डॉलर्स चा स्वप्नवत प्रवास


अ‍ॅपल… एके काळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणारी हि कंपनी आज बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली… काल कंपनीने तब्बल १००० अब्ज म्हणजेच १ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपिटल चा टप्पा पार केला. कंपनीच्या शेअर्स ने काल ५.८९ डॉलर्स ची वाढ नोंदवली आणि हि कंपनी जगातील एकमात्र ट्रिलियन डॉलर्स कंपनी बनली. कंपनीचा हा प्रवास तास स्वप्नवतच म्हणावा लागेल. १९९७ साली फक्त २ बिलियन मार्केट कॅप असणारी हि कंपनी आज जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. याच सर्व श्रेय जातं दिवंगत स्टीव्ह जॉब्ज यांना.

स्टीव्ह जॉब्ज यांनी आपल्या दोन मित्रांच्या साथीने १९७६ साली अ‍ॅपल ची सुरुवात केली होती. कंपनीची सुरुवात कॉम्प्युटर च्या विक्री पासून झाली होती. कंपनीचा मार्केटमधे हळूहळू जम बसू लागला होता. कंपनीने विविध प्रकारची उत्पादने बाजारात लॉन्च केली. पण कंपनीच्या अंतर्गत राजकारणाचा फटका स्टीव्ह यांना बसला. ज्यांच्या सोबतीने त्यांनी कंपनी सुरु केली होती, ज्यांना कंपनीत आणले होते त्यांनीच स्टीव्ह यांना कंपनीतून बाहेर काढले. १९८५ मध्ये स्टीव्ह यांनी कंपनीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. यांनतर स्टीव्ह यांनी NeXT Computer नावाने स्वतंत्र कंपनी सुरु केली. हा नवीन प्रोजेक्टही भरपूर यशस्वी ठरला.

इकडे मात्र अ‍ॅपल ला सगळीकडून अपयश यायला सुरुवात झाली होती. मार्केटमध्ये अ‍ॅपल ची उत्पादने अपेक्षेप्रमाणे विकली जात नव्हती. कंपनी पूर्णपणे डबघाईला आली होती. १९९७ पर्यंत कंपनीची अवस्था दिवाळखोरीत असल्यासारखी झाली. आणि लवकरच अ‍ॅपल बंद होईल अशी चिन्हे दिसू लागली. कंपनीला आपली चूक उमगली आणि त्यांनी स्टीव्ह जॉब्ज यांना पुन्हा कंपनीत येण्याची विनंती केली. स्टीव्ह यांनीही कोणताही राग मनात न धरता कंपनीची सूत्रे हाती घेतली. अ‍ॅपल ने स्टीव्ह यांची NeXT Computer विकत घेतली, आणि सुरु झाला कंपनीचा स्वप्नवत प्रवास.

१९९६ साली कंपनीचे बाजार भांडवल २ बिलियन डॉलर्स होते. (२०० कोटी डॉलर्स किंवा २ अब्ज डॉलर्स). आकडा मोठा वाटत असला तरी प्रत्यक्षात तसे काही नव्हते. कंपनीची उतरती कळा सुरु झाली होती. स्टीव्ह यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली आणि आपल्या उत्पादनांमधे मोठ्या प्रमाणावर बदल करायला सुरुवात केली. नवीन पिढीला काय हवं आहे याचा अभ्यास करायला सुरुवात केली. iPad, iPhone सारखी उत्पादने बाजारात उतरविली. हि उत्पादने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात घर करून बसली. अ‍ॅपल ला पुन्हा सुगीचे दिवस आले. पण इतकेच पुरेसे नव्हते. Apple ब्रँड चे वेगळ्या प्रकारे आकर्षण निर्माण करणे आवश्यक होते. यासाठी कंपनीने आपली ब्रॅण्डिंग, मार्केटिंग अतिशय विचारपूर्वक केली. हळूहळू जगभरात अ‍ॅपल ब्रँड लोकप्रिय झाला. ग्राहक नवीन iPhone बाजारात येण्याची आतुरतेने वाट पाहू लागले. तो घेण्यासाठी दिवस-दिवस रांगा लावू लागले. जगभरात iPhone आणि इतर अ‍ॅपल उत्पादनांची क्रेज वाढायला लागली. अ‍ॅपल ची उत्पादने वापरणे हा एक स्टेटस सिम्बॉल झाला. कुणी कल्पनाही केली नसेल इतका Apple ब्रँड लोकप्रिय झाला. कहर म्हणजे iPhone घेण्यासाठी कित्येकांनी आपल्या किडन्या सुद्धा विकलेल्या आहेत, तर कुणी स्वतःलाच विकलेलं आहे, यावरून अ‍ॅपल च्या लोकप्रियतेची कल्पना करावी… जगभरातील तरुणाई मधे स्टीव्ह जॉब्स एखाद्या फिल्म, स्पोर्ट सेलिब्रिटीपेक्षाहि जास्त लोकप्रिय झाले.

अ‍ॅपल ला अपेक्षित उंची गाठून दिल्यांनतर स्टीव्ह जॉब्ज आपल्या कामावरून निवृत्त झाले. २४ फेब्रुवारी १९५५ साली जन्मलेल्या स्टीव्ह यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी, ५ ऑक्टोबर २०११ या दिवशी जगाचा निरोप घेतला…. चांगली माणसं लवकर जातात, असंच काहीसं झालं.

१९९७ साली अ‍ॅपल चे बाजारमूल्य २ बिलियन (२ अब्ज डॉलर्स) डॉलर्स होते. स्टीव्ह गेले त्यावेळी कंपनीचे बाजारमूल्य ३५० बिलियन (३५० अब्ज डॉलर्स) डॉलर्सवर होते. स्टीव्ह यांच्या निधनानंतरही कंपनीने स्टीव्ह यांचीच विचारसरणीच कायम ठेवली. नावीन्य, आकर्षक, साधेपणा याचे मिश्रण म्हणजे अ‍ॅपल हि ओळख कंपनीने तशीच पुढे नेली. या कंपनीने दोन दिवसांपूर्वी बाजार भांडवलात १ ट्रिलियन डॉलर्स चा, म्हणजेच १००० अब्ज डॉलर्स चा टप्पा ओलांडला आणि जगभरात याची चर्चा सुरु झाली. भारतीय रुपयात हे मूल्य होते ६७ लाख कोटी रुपये. याआधीही एका कंपनीने १ ट्रिलियन डॉलर्स चा टप्पा ओलांडला होता पण लगेच त्यात घसरण झाली होती. १९९७ साली २ अब्ज डॉलर्स भांडवली मूल्य असणाऱ्या कंपनीने फक्त २१ वर्षात ५०० पटींनी वाढ नोंदवून १००० अब्ज डॉलर्स चा टप्पा पार केला. हा प्रवास स्वप्नवत म्हणावा असाच आहे. कंपनीच्या शेअर्सनेही १९९७ सालच्या १ डॉलर्स मूल्यावरून २०० पटींनी वाढत २०५ डॉलर्स वर झेप घेतली आहे. कंपनी स्वतः समृद्ध झालीच पण तिने आपल्या गुंतवणूकदारांनाही निराश केले नाही.

आज अ‍ॅपल हि कंपनी जगातील कितीतरी देशांपेक्षा जास्त श्रीमंत आहे. म्हणजे ती एक देश असती तर जगातील टॉप १० देशांमधे असती. कंपनीचे एकूण बाजारमूल्य आपल्या देशातील टॉप २५ कंपन्यांपेक्षाही जास्त आहे. रिलायन्स, TCS या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे बाजारभांडवल १०० अब्ज डॉलर्स च्या आसपास आहे, यावरून अ‍ॅपल चा पसारा ध्यानात यावा.

अ‍ॅपल सारख्या कंपन्या आपल्याकडे का तयार होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. एखादी कंपनी मोठी व्हायला लागली, एखादा उद्योजक मोठा व्हायला लागला कि तो आपल्या डोळ्यात खुपतो. एखादे मोठे उद्योगविश्व एकट्याने कधीही वाटचाल करत नसते, ते आपल्यासोबत लाखो लोकांना घेऊन चालत असते हे आपण विसरतो, हे आपल्याकडे उद्योजकीय मानसिकता तयार न होण्यामागे एक मुख्य अकारण आहे. यासोबत इतरांची कॉपी करण्यात समाधान मानणाऱ्या आपल्या मानसिकतेमधून भव्य काही निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. थोडासा त्रास सोसून नाविन्याचा शोध घेण्याऐवजी आपण सुरक्षिततेच्या शोधात असतो. व्यवसाय सुरु करण्यापूर्वीच आपण त्याच्या यशाची खात्री विचारतो. महिना किती उत्पन्न मिळेल हा प्रश्न व्यवसाय सुरु होण्यापूर्वीच आपल्या डोक्यात थैमान घालत असतो. अशा मानसिकतेमध्ये अ‍ॅपल सारख्या कंपन्या उभ्या राहू शकत नाही हे आपण ध्यानात घ्यायला हवे.

असो… अ‍ॅपल ने काल १ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपिटल चा टप्पा पार केला. या कंपनीचा आपल्या देशाशी फक्त व्यापारी दृष्टीने संबंध असला तरी एक उद्योजक वर्ग म्हणून आपणा सर्वांसाठी हि घटना नुसत्या व्यापारापेक्षाही खूप मोठी आहे.

२१ वर्षांची कंपनीची अगदी शून्यापासून सुरु झालेली वाटचाल पाहता हा प्रवास स्वप्नवत म्हणावा असाच आहे. अ‍ॅपल ला मनापासून शुभेच्छा आणि आपल्या देशातही असे उद्योगविश्व निर्माण व्हावेत हि अपेक्षा…

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!