३२८ वस्तूंवर वाढीव आयात कर
देशातील सुस्तावलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या क्षेत्रातील ३२८ वस्तूंवर केंद्र सरकारने वाढीव आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. सध्या १० टक्के असणारे हे शुल्क आता २० टक्क्यांवर पोहोचले आहे. देशी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सरकारने सांगितले.
सरकारतर्फे लोकसभेत मंगळवारी या संबंधी एक अधिसूचना मांडण्यात आली. सीमाशुल्क कायदा, १९६२च्या १५९व्या कलमानुसार हे शुल्क वाढविण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. आयातशुल्कातील या वाढीमुळे देशी वस्त्रोद्योगांना बळ मिळणार असून त्यांची मागणीही वाढणार आहे. सद्यस्थितीत या उद्योगात साडेदहा कोटी रोजगार उपलब्ध असून या निर्णयामुळे त्यात भर पडेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
सरकारने गेल्या महिन्यातही याच प्रकारचा निर्णय घेऊन वस्त्रोद्योगातील ५० वस्तूंवरील आयातशुल्क वाढवले होते. यामध्ये जॅकेट, सूट, कारपेट आदींचा समावेश होता.