जिद्दीला सलाम :: भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनविणारा नायक – डॉ. वर्गीस कुरियन


भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता.

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून शिक्षण घेऊन भारतात परतल्यावर कुरियन यांची नेमणूक सरकारी डेअरी मध्ये आणंद, गुजरात येथे झाली. त्या सुमारासच “खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड” ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोलसन कंपनी विरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होती. त्यावेळी पोलसनने स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे, मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे, जमा केलेले दूध मुंबई सारख्या दूरच्या ठिकाणी विकणे, स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करीत होती. बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उमटविल्याने स्थानिकांची नाराजी व रोष पोलसनला जड जात होता. या कंपनी विरुद्ध चांगले काम करणे, स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या, योग्य भाव आणि बाजारपेठ अशा समस्या घेऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल. ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती. के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे तेव्हाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल, वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई होते. त्यांनी नव्या जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले.

वर्गीज कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल.मध्ये काम करण्याचे ठरविले. “गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड” या पालक संस्थेने १४ डिसेंबर १९४६ रोजी के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे नाव बदलून “आणंद मिल्क युनियन लिमिटेड” असे नाव ठेवले. नव्या जोषात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य विशेषतः महिला वर्ग ’आपली डेअरी’ म्हणून अमूलकडे पाहू लागले. संस्थेचे लोकसहभागातून व्यवस्थापन ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती. वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.

तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले. ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू (कन्डेन्स्ड मिल्क, दूध पावडर) विकत असे. भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधाच्या वस्तू तयार करणे जास्त योग्य होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते. पण कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यात अमूलला यश आले. दूध अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी कुरियन यांनी ११ महिन्यांच्या मेहनतीनंतर जो दूध प्रक्रिया प्रकल्प तयार केला तो त्यावेळी देशातील सर्वात आधुनिक प्रकल्प होता. त्यांनी ऑपरेशन फ्लड मोहं सुरु केली. ७२ हजार शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यास सुरुवात केली.

१९६० च्या दशकात जिथे देशाचे दुधाचे उत्पादन २ कोटी टन होते, ते २०११ पर्यंत १२.२ कोटी टनांपर्यंत पोहोचले. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनला ११ हजार गवे आणि २० लाखांपेक्षा अधिक शेतकरी जोडले गेले.

अमूलने हळूहळू बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. येथील लोकांच्या आवडी निवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. आज घडीला अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बांगलादेश, मॉरिशस, आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये पोहोचले आहे. जगातील ५० पेक्षा जास्त देशात अमूल ब्रँड पोचला आहे. या यशाचे श्रेय वर्गीज कुरियन यांना जाते.

जन्म – २६ नोव्हेंबर १९२१
निधन ९ सप्टेंबर २०१२

१९६५ मधे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष
१९८६ मधे कृषिरत्न पुरस्कार
१९९९ मधे पदमभूषण पुरस्काराने सन्मानित
_

उयोजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *