यशस्वी व्हायचं असेल तर तणावावर नियंत्रण मिळवायला शिका.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

तणावावर नियंत्रण मिळविण्यात सक्षम नसणे हे अपयशाचे एक मुख्य कारण आहे. आपल्यातील कित्येकांना तणाव सहन करणे जमत नाही. तणाव कोणताही असू शकतो. कामाचा ताण, व्यवसायाचा ताण, कौटुंबिक तणाव… कोणताही. त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. तणाव हि मानसिक प्रक्रिया आहे, त्यावर मनाच्या निग्रहानेच विजय मिळविता येतो.
मानसिक तणावामुळे अपयशाचे प्रमाण वाढत असते. यात गुरफटल्यामुळे आपले कामाकडे लक्ष लागत नाही. आणि याची परिणीती आपल्याच अपयशात होत असते.

बरेच जण आपल्या अकार्यक्षमतेला आपल्या तणावामागे लपवण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्या अकार्यक्षमेतेचे कारणंच तो तणाव आहे हे विसरतात. एखादा व्यावसायिक विक्री मनाप्रमाणे होत नाही म्हणून आपल्याच व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो, सतत चिडचिड करतो, कर्मचाऱ्यांवर डाफरतो तर कुणी आर्थिक अरिष्टामध्ये अडकल्यामुळे सगळं काही बंद करून घरात बसून राहतो, एखादा व्यक्ती मनाप्रमाणे काम होत नाही म्हणून आपल्याच कौटुंबिक सदस्यांवर चिडचिड करतो, एखादा कामावर बॉस चा त्रास म्हणून सतत कामाबद्दल नकारात्मक विचार करतो, कामावरून घरी गेल्यावरही तेच विचार डोक्यात राहतात, चोवीस तास हा ताण आपला पिच्छा सोडत नाही.

पण हा ताण आपला पिच्छा सोडत का नाही ? कारण आपण त्याला सोडायला तयार नसतो. जसं एखादी जखम झाल्यावर आपण त्यावरची खपली काहीही कारण नसताना खरवडून काढतो आणि पुन्हा त्या जखमेतून रक्त वाहायला लागते, अगदी तसेच आपण या तणावासोबत वागत असतो. जखमेकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात लक्ष घातले तर जखम कधी बरी होते कळतही नाही याच प्रकारे तणावाकडे दुर्लक्ष करून कामात लक्ष घातले तर हा तणाव कधी आपल्याला सोडून पळ काढतो लक्षातही येत नाही.

आपल्यापैकी बहुतेकांना हा ताण वेताळासारखा आपल्या मानगुटीवर घेण्याची सवय लागलेली असते. पण याचा परिणाम आपल्याच आयुष्यावर होतो हे यांच्या गावीही नसते. मागील काही वर्षात मानसोपचार तज्ज्ञांचे वाढत चाललेले काम आपल्यावर तणाव किती वरचढ होतोय हेच दर्शवत आहे.

ज्यावेळी नकारात्मक विचार, सकारात्मक विचारांवर वरचढ होऊन आपल्या डोक्यात घोळत राहतात त्यावेळी आपण तणावात आहोत हे समजून घ्यावे.

या तणावामुळे आपले कामात लक्ष लागत नाही, निर्णयप्रक्रियेवर परिणाम होतो, नकारात्मकता वाढीस लागते, कोणत्याही बाबतीत चुकीचा विचार करण्याची मानसिकता तयार होते, कौटुंबिक संबंध बिघडतात, मित्र परिवाराशी संबंध बिघडतात, सततच्या चिडचिड करण्यामुळे कुटुंबाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळणे बंद होते, व्यवसाय असेल तर त्यावर लक्ष कमी होते, नोकरी असेल तर त्याकडे दुर्लक्ष होते, याचा एकत्रित परिणाम म्हणून हळूहळू आपली कार्यक्षमता कमी होत जाते आणि अंतिमतः आपलेच नुकसान होते. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आसपास सापडतील, आसपास कशाला आपल्यातीलही कितीतरी आपल्या तणावाला कवटाळून बसलेले दिसतील.

हा तणाव दूर करणे आवश्यक आहे. काम कुणालाही सुटत नाही, अडचणी कुणालाही सोडत नाहीत, संकटे सर्वांना आहेत, कामाचा ताण सर्वांवर आहे, पण यातूनही तेच पुढे जातात जे या तणावावर नियंत्रण मिळवतात.

तणावावर विजय मिळवणे म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. फक्त ज्या गोष्टी त्रास देतात त्याकडे दुर्लक्ष करणे. आपल्या कामात लक्ष घालणे, छंद जोपासणे, ज्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते ते काम करणे, आनंदी राहणे, कधीही नकारात्मक विचार न करणे, कोणत्याही विचारला (मुख्यत्वे नकारात्मक विचारला) वरचढ होऊ न देणे, चांगल्या गोष्टी पाहणे, चुकीच्या गोष्टी दूर सारणे, मित्र परिवार कुटुंबासमोर नकारात्मक न बोलता सकारात्मक आनंदी मानसिकता ठेवणे, ध्यानधारणा करणे, योगासने, प्राणायम … अशा विविध मार्गांनी आपण तणावावर नियंत्रण मिळवू शकतो.

याहीपेक्षा एका वाक्यात सांगायचे म्हटले तर जेवढे संयमी व्हाल तेवढे तणावापासून दूर जाल

व्यावसायिक आयुष्यात तर या तणावावर नियंत्रण मिळविणे खूप आवश्यक आहे. तणावावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले तर संपूर्ण व्यावसायिक आयुष्यच धोक्यात येऊ शकते. म्हणून खास करून व्यावसायिकांनी, उद्योजकांनी आपल्या तणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहायला हवे. ज्यावेळी सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांनी डोके भरून गेल्यासारखे वाटेल तेव्हा आपण मोठ्या आजाराकडे (आणि विनाशाकडेही) वाटचाल करत आहोत हे लक्षात घेऊन त्यावर तात्काळ उपाय करायला हवेत.

तणाव आणि यश यांचे प्रमाण व्यस्त आहे. तणावावर नियंत्रण मिळावा. तुम्ही तणावावर किती नियंत्रण मिळविता यावर तुमच्या यशाचे प्रमाण ठरते.

तणावमुक्त व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


2 thoughts on “यशस्वी व्हायचं असेल तर तणावावर नियंत्रण मिळवायला शिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!