आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीच्या आणखी वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ७१ रुपयांच्या नीचांकी स्तरावर आला. रुपयाने इतिहासात प्रथमच ७१ चा नीचांकी स्तर गाठला आहे. सकाळच्या घसरणीनंतर काही वेळानंतर रुपयामध्ये सुधारणा झाली. मात्र गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी रुपया १३ पैशांनी घसरला. गुरूवारी एका डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत ७०.७४ होती. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यानंतर रूपयाची किंमत ७०.९६ वर पोहचली. काही वेळानंतर घसरण थांबली तरीही नीचांकी स्तर कायम आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.८७ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
महिनाअखेर बाजारात डॉलरची वाढती मागणी आणि कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून पैसे काढण्यास सुरूवात केल्याचा फटका रूपयाला बसला आहे.