गोष्ट छोटी… साखरेएवढी


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

हो… साखरेएवढीच छोटी गोष्ट… एका साखरेच्या डिस्ट्रिब्युटरची.

दोन तीन वर्षांपूर्वी एका कामानिमित्त (महाराष्ट्रातीलच) एका ठिकाणी गेलो होतो. बिझनेस कन्सल्टिंग क्षेत्रात असल्यामुळे आपसूकच व्यवसायाविषयी चर्चांना सुरुवात झाली. आणि त्या संबंधित जिल्ह्यातील एका साखरेच्या डिस्ट्रिब्युटरची रंजक कहाणी ऐकायला मिळाली. तीच तुम्हाला सांगत आहे.

इथे त्या डिस्ट्रिब्युटरचे नाव आणि जिल्हा सांगता येणार नाही कारण संबंधित व्यक्तीची परवानगी घेण्यात आलेली नाही. पण त्याने काहीच फरक पडत नाही. अगदी या कहाणीला काल्पनिक म्हटलं तरी चालेल. (थोडा माझ्या लिखाणाचा तडका आहे इतकंच, पण कहाणी म्हटलं कि एवढी सूट मिळतेच) पण हि एका मोठ्या व्यापाऱ्याची लहानशी व्यावसायिक कहाणी ऐकण्यासारखी, वाचण्यासारखी, अनुभवण्यासारखी आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी…. तो अगदी पंधरा सोळा वर्षाचा असताना गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी काम शोधायला आला. काहीतरी काम करायचं एवढाच उद्देश. एका साखरेच्या व्यापाऱ्याकडे कामाला लागला. लहान मोठी कामे करणे, साखरेचे पोते उचलणे असली कामे करत असे. काही काळाने स्थिरावल्यावर त्याने आपल्या मालकाला “मला व्यवसाय करायचाय, तुम्हीच मार्गदर्शन करा” असे सांगितले. मालकाने हसण्यावारी नेले. पण तो मुलगा काही हट्ट सोडायला तयार नव्हता. मला व्यवसाय करायचाय… हीच रट लावून बसला. शेवटी मालकाने त्याच्याकडे एक साखरेचे भरलेले पोते दिले. आणि सांगितलं, कि हे पोते विकून ये, मग बघू पुढे काय करायचे ते.

त्याने ते पोते सायकल वर टाकले आणि गावभर फिरायला लागला. तो प्रत्येक हॉटेलमधे, किराणा शॉप मधे, चहाच्या टपरीवर जाऊन साखर पाहिजे का विचारत, आणि सगळे त्याला नकार देत, कारण प्रत्येकाचा साखरेचा सप्लायर आधीपासून होताच. आणि व्यापारी नसल्यामुळे याच्या साखरेचा दर सुद्धा जास्त होता. काही दिवस साखरेचा एक दाणासुद्धा विकला गेला नाही. पण तो आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. दररोज त्याच त्याच अपेक्षित ग्राहकांकडे चक्कर मारायचा. आणि नकार मिळायचा.

साहेब घ्या कि थोडी साखर…
अरे बाळा, नको म्हटलं ना. आमच्याकडे आधीच सप्लायर आहेत. आणि तुझी साखर महा आहे. नाही परवडणार.
साहेब सगळी नका घेऊ. थोडी घ्या. एक दोन किलोने काय फरक पडणार आहे ?

जवळजवळ सर्वच ठिकाणी अशीच चर्चा चालायची. शेवटी एका हॉटेल चालकाला त्याची दया आली. दयाच म्हणावी लागेल, कारण अठरा वीस वर्षाचा मुलगा दररोज तुमच्याकडे येतो आणि साखर घ्या म्हणतोय, आणि तुम्ही सतत नकार देताय… दया येणारच. त्या हॉटेल चालकाने त्या मुलाचे समाधान म्हणून एक किलो साखर घेतली. आणि त्या मुलाच्याच रेट मधे. बार्गेनिंग सुद्धा केली नाही. त्या हॉटेल चालकाला काही फरक पडत नव्हता. दिवसाच्या शंभर किलो साखरेमधे एक किलो साखर दोन रुपये जास्त देऊन घेतल्याने त्याच्या उत्पन्नावर परिणाम होणार नव्हता. पण याचा परिणाम त्या मुलावर मात्र झाला. तो प्रत्येक हॉटेल दुकानदार यांच्याकडे जाऊन फक्त एक किलो साखर घ्या. जास्त नका घेऊ, मी आग्रहही करणार नाही, असं म्हणायचा. आणि त्याची एवढ्या लहान वयात काम करण्याची ती उर्मी पाहून बऱ्याच जणांचा नकार होकारात बदलायला लागला.

त्या मुलाचा व्यवसाय सुरु झाला. तो दररोज सायकलवर साखरेचे पोते टाकायचा, आणि गावभर उन्हा-तान्हात भटकायचा. प्रत्येक ग्राहकाकडे फक्त अर्धा-एक किलो साखर द्यायचा. ग्राहकांनाही ते सवयीचं झालं.

महिने सारले… व्यवसाय वाढायला लागला. हळूहळू ते ग्राहक एक किलो ऐवजी दीड-दोन किलो साखर घ्यायला लागले. आणि त्याला दिवसाला एक पोत्याऐवजी दोन पोते साखर लागायला लागली. साखरेचा खप वाढल्यामुळे त्यालाही स्वस्तात साखर मिळू लागली. आणि ग्राहकांनीही त्याच्यावर दया म्हणून साखर घेणे बंद करून त्याची साखर चांगली आहे आणि चांगल्या रेट मध्ये मिळत आहे म्हणून घ्यायला सुरुवात केली.

त्याच्या व्यापारी मालकाने सुद्धा त्याला भरपूर सहकार्य केलं. हळहळू व्यवसाय वाढू लागला. ग्राहक वाढू लागले. आता सायकल अपुरी पडायला लागली. गाडीवर माल डिलिव्हरी सुरु झाली. दिवसाच्या दोन पोत्यामध्ये वाढ व्हायला लागली. ती तीन, चार, दहा, पन्नास वर कधी पोचली कुणालाही कळले नाही.

तो मुलगा आता वयाने भरपूर मोठा झालाय… आणि आज त्या जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित, साखरेचा आणि इतर FMCG प्रोडक्ट चा, व्यापारी आहे, डिस्ट्रिब्युटर आहे.

तुम्हाला यातून काही लक्षात आलं कि नाही माहित नाही. पण मी मात्र खूप काही शिकलो.

त्या मुलाच्या या यशाचं गमक कशात आहे ?

साखर विकण्यात ? व्यापारी मालक मिळण्यात ? ग्राहकांना त्याची दया येण्यात?… बिलकुल नाही

व्यवसाय सुरु करताना त्याने, व्यवसाय नाही चालला तर काय? ग्राहक कोण देणार? पैसा कुठून आणू? नफा किती असेल? महिन्याला किती उत्पन्न मिळेल? व्यवसायाची गॅरंटी काय? यातला कोणताही प्रश्न विचारला नाही. मला व्यवसाय करायचाय एवढं एकंच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्याने वाटचाल सुरु केली. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला आपोआपच मिळत गेली…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

3 thoughts on “गोष्ट छोटी… साखरेएवढी

  1. sir e commerce seller sambandhit kahi mahito dya na
    amazon flipkart sarkhya e commerce company madhe seller mhanun join hone changale aahe ka as kahi mahiti piravli tar help hoil sir
    baki tumchya sarvach post motivational aani kahitari navin shikvanrya ch asatat

    thanks sir

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!