लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसाय करायचाय पण घरचे ऐकत नाहीत…. नोकरीच कर म्हणतात…
हि जवळजवळ सर्व मध्यमवर्गीय मराठी घरातील तरुण तरुणींची व्यथा आहे. आपली मराठी मानसिकता पाहता पालकांची अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. त्यामुळे पालकांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला व्यवसाय करायचाय आणि त्यांना तुम्ही नोकरी करावी अशी अपेक्षा आहे. काय कराल अशावेळेस ?
तुम्हाला तुमच्या वयाच्या पंचविशीतच तुमच्या आयुष्याविषयी ठोस निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे जे काही कराल ते शांतपणे, नियोजनबद्धरितीने, निश्चयाने, न डगमगता करा.
पालकांशी शांतपणे बोला. तुमचे व्यवसायाविषयीचे उद्दिष्ट समजून सांगा. नोकरीपेक्षा व्यवसायाचे फायदे काय आहेत हे समजून सांगा.
पालकांना सांगा… बळजबरी केलेले काम काही काळ टिकेल नंतर पुन्हा मनासारखे काम करण्याच्या मागे लागणार, म्हणजे उलट वयाच्या स्थिरस्थावर होण्याच्या टप्प्यात नोकरीला कंटाळून व्यवसायाच्या मागे लागणार. आणि अशावेळी आत्तापेक्षा जास्त त्रास होईल. उलट आत्ताच सुरुवात केली तर पुढचे चार पाच वर्षे कशी निघून जातील कळणार सुद्धा नाही. आणि तिशीच्या टप्यावर असताना मी एक चांगला/चांगली उद्योजक म्हणून स्थिरस्थावर झालेलो/झालेली असेल.
नोकरीच्या मागे लागलेल्या पालकांना समाजावून सांगणे सोपे काम नाही. पण सतत त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंबाची साथ आवश्यक असतेच. ती साथ नसेल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळायला किमान दुप्पट वेळ लागतो. कुटुंबाची साथ असेल तर तुम्ही पूर्णपणे आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकता. इतर मानसिक दबाव नसतात. तुम्हाला आपले धेय्य गाठण्यासाठी हि साथ महत्वाची आहे. पालकांना तुमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या विरोधात जाऊन काही करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना सोबत घेऊन प्रगती करा. तुम्ही हट्ट धरताय म्हणून नाही तर मनाने पालक तुमच्यासोबत असायला हवेत. सोपं नाही… पण अशक्यही नाही.
तुम्ही अखंड प्रयत्न करूनही पालन ऐकत नसतील तर त्यांच्याकडे तुमच्या आयुष्यातली तीन वर्षे मागा. हा तुमच्याकडे शेवटचा पर्याय असेल. किमान तीन वर्षे मला माझे नशीब अजमावून द्या असे सांगा. या तीन वर्षात तुम्ही किती कमावताय हे त्यांनी विचारायचे नाही. फक्त व्यवसायाची प्रगती तपासू शकतील. कोणताही व्यवसाय स्थिरस्थावर होण्यासाठी तीन वर्षे लागतात. पहिली दोन वर्षे तुमची प्रगती कधीच दिसत नसते. ती तिसऱ्या वर्षी दिसायला लागते. म्हणून तीन वर्षे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहेत.
या तीन वर्षात स्वतःसाठी एक रुपयाही खर्च करायचा नाही हे ठरवून घ्या. इतर नोकरदार मित्रांच्या प्रगतीकडे डोळेझाक करा. नोकरदार लोकांकडे पैसा लगेच दिसायला लागतो. पगार असल्यामुळे गाडी घर यासाठी कर्ज मिळते. आपल्याला अशी सोय नसते. पण म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजण्याची गरज नाही. नोकरीची सुरुवात वेगाने होते आणि पुढचा प्रवास कंटाळवाणा असतो . व्यवसायाची सुरुवात खूप धीम्या गतीने असते पण एकदा सुरुवात झाली कि पुढचा प्रवास नोकरदारांना कैक पटींनी मागे टाकतो. त्यामुळे फक्त तुम्हाला मिळालेल्या वेळेवर लक्ष केंद्रित करा.
या तीन वर्षाचा आणखी एका प्रकारे उपयोग करू शकता. पालकांना विचारा पुढच्या तीन वर्षात मी किती पगार कमवत असेल असा तुमचा अंदाज आहे?
ते जो आकडा सांगतील त्यांना तेवढाच पैसा व्यवसायातून दिला तर काय हरकत आहे हे विचारा… साहजिकच ते तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. त्यांना तुमच्या नोकरीतून किती पगार अपेक्षित आहे ते विचारा आणि तुम्ही तेच उत्पन्न किंबहुना त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकता हे लक्षात आणून द्या. सोबत व्यवसायात सेटल झाल्यानंतर तुम्ही काही प्रॉपर्टी विकत घेऊच शकता. एखादा फ्लॅट, दुकान ई. ते भाडेतत्वावर दिले कि जो पगार अपेक्षित आहे तेवढेच कायमस्वरूपी अपेक्षित उत्पन्न त्यातून पगारासारखेच मिळेल हेही लक्षात आणून द्या. या मुद्द्यावर पालक प्रतिवाद करू शकत नाही. आणि तुम्ही कोणताही वाद न घालता त्यांना तुमच्या बाजूने वळवू शकता.
तर… तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पहिली तीन वर्षे तुमच्या स्वप्नांसाठी खर्ची घालायची आहेत. आणि साहजिकच हा खर्च खूप विचारपूर्वक करायचा आहे. नोकरीच्या मागे लागलेल्या पालकाकांकडून खूप कष्टाने तुम्ही हि तीन वर्षे मिळविलेली असतील. तिचे योग्य नियोजन करून व्यवसायाची सुरुवात करा. पण कोणत्याही परिस्थितीत कुटुंबाला सोबत घेऊनच व्यवसायाची सुरुवात करा. कुटुंब सोबत नसेल तरी व्यवसाय यशस्वी होईल पण होणाऱ्या मानसिक त्रासाला सांभाळून घेण्याची मानसिक ताकद प्रत्येकाकडे असेलच असे नाही.
तीन वर्षे.. तुमच्यासाठी. तुमच्या कुटुंबाच्या मतपरिवर्तनासाठी…
यात एक लक्षात घ्या. व्यवसाय सुरु केल्यानंतर लगेच त्याचे सर्व व्यवहार करंट अकाउंट मधून करा. अकाउंट मध्ये भरपूर उलाढाल करा. IT रिटर्न लगेच भरायला सुरुवात करा. थोडाफार टॅक्स भरा. टॅक्स चुकविण्यासाठी उत्पन्न कमी दाखवू नका. चांगला रिटर्न तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देतो. आणि आत्ता जे प्रॉपर्टी घेण्याबद्दल सांगितलंय त्यासाठी किंवा व्यवस्या वाढीसाठी कर्ज लगेच उपलब्ध होऊ शकते. याचा फायदा तुम्ही तुमच्या पालकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी होईल.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Thanks Sir!
Sir thanks