अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी फर्म असलेल्या सायफर ट्रेसने दिलेल्या माहितीनुसार बिटकॉइन च्या व्यवहारात तब्बल १८ हजार कोटी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचा अंदाज आहे. या फर्म ने केलेल्या दाव्यानुसार क्रिप्टोकरंसी एक्सेंजरांनी २००९ पासून सुमारे १८ हजार कोटी रुपये मूल्याच्या बिटकॉइनचे लाँड्रिंग केले आहे. हे क्रिप्टो करंजी एक्सचेंजर्स भारताबाहेर असून, जे भारतातून मनी लाँड्रिंग करत आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवणारा कुठलाही मनी लाँड्रिंग कायदा अस्तित्वात नाही.
या १८ हजार कोटींच्या व्यवहारांमध्ये सायफर ट्रेसने नजर ठेवलेल्या आपराधिक आणि अतिशय संशयास्पद व्यवहारांचाच समावेश आहे. सायफर ट्रेसने आघाडीच्या २० क्रिप्टोकरंसी एक्सचेंजच्या माध्यमातून झालेल्या तब्बल ३५ कोटी व्यवहारांची पडताळणी केली. तसेच त्यापैकी दहा कोटी व्यवहारांची दुसऱ्या पक्षांशी जुळवणूक करून पाहिली. या एक्सचेंजचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी करण्यात आलेल्या २,३६,९७९ बिटकॉइन्सच्या वापरासाठी झाला होता. सायफर ट्रेसने मनी लाँड्रिंगशिवाय हॅकिंग आणि क्रिप्टोकरंसीच्या चोरीचाही छडा लावला आहे.
२०१८ च्या सुरुवातीच्या ९ महिन्यांमध्ये हॅकिंग एक्सचेंजच्या माध्यमातून ९२ कोटी ७० लाख डॉलर (सुमारे ६७ अब्ज रुपये) मूल्याच्या व्हर्चुअल करंसीची चोरी झाली होती. ही चोरी गेल्या वर्षीच्या तुलनेत २५० टक्क्यांनी अधिक होती.