वजिराशिवाय सुद्धा जिंकता येतं… फक्त, प्याद्यांचा योग्य वापर करण्याचं कौशल्य हवं…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

जिंकण्यासाठी प्रत्येकवेळी वजिराचीच गरज असते असं काही नाही.
एकटा प्यादा सुद्धा बुद्धिबळाचा सामना जिंकवून देऊ शकतो.
फक्त त्याचा योग्य वापर करण्याचे कौशल्य तुमच्याकडे असायला हवे.

बुद्धिबळ खेळताना वजीर मारला गेल्यावर डाव सोडणारे मी कित्येकजण पाहिलेत. त्यांच्या दृष्टीने वजीर असेल तरंच जिंकण्याची शाश्वती असते. वजीर गेल्यावर बाकीचे सैन्य बिनकामाचे असते. असे लोक फक्त दिखाव्यासाठी खेळतात, जिंकण्यासाठी नाही, कारण यांना आपल्याकडे असलेल्या सैन्याचे महत्व कधी कळलेच नसते, किंवा यांनी ते जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केलेलाच नसतो. अशांच्या दृष्टीने बुद्धिबळ म्हणजे फक्त राजा आणि वजिराचा खेळ, बाकीचे फक्त सपोर्टींग कलाकार. मग ते बुद्धिबळ खेळताना फक्त वाजीरावरच लक्ष केंद्रीत करतात आणि हमखास डाव हरतात. कारण बुद्धिबळ खेळणे म्हणजे पटावरील प्रत्येक सैन्याचा योग्य आणि हुशारीने वापर करणे, ज्याची अशा लोकांकडे वानवा असते. हुशार बुद्धिबळपटू बुद्धिबळ खेळताना समोरचा अशा मानसिकतेचा आहे हे लक्षात आलं की सर्वात आधी त्याचा वजीर घेण्याचा प्रयत्न करतो, भले त्यासाठी स्वतःचा वजीर देण्याची वेळ आली तरी त्याला ते मान्य असते. कारण प्रतिस्पर्ध्याच्या वजीर गेला कि तो डाव सोडून देणार हे त्या चाणाक्ष बुद्धिबळपटूला माहित असते, आणि आपल्याकडचा वजीर मेला तरी उरलेल्या सैन्याचा वापर करून डाव कसा जिंकायचा याचे कौशल्य त्याला अवगत असते.

व्यवसायात सुद्धा अशी मानसिकता जागोजागी दिसून येते. एखादा महत्वाचा स्रोत उपलब्ध नाही म्हणून किंवा एखादा महत्वाचा स्रोत अचानक बंद झाला म्हणून व्यवसाय सोडून देणारे कित्येक जण या मार्केटमधे सापडतील. अचानक एखादा ग्राहक कमी झाला, किंवा अचानक मार्केटमधे मंदी आली, किंवा काही कारणाने आर्थिक अरिष्ट कोसळले, किंवा अगदी कर्मचारी काम सोडून गेले कि हे लोक लगेच हाय खातात आणि आपला व्यवसाय अर्ध्यावर सोडून देतात, किंवा आपला व्यवसाय कधी बंद पडतोय याची वाट पाहत फक्त फॉर्मॅलिटी म्हणून व्यवसाय चालवतात.

अशा वेळी यांचा प्रतिस्पर्धी कुणी व्यक्ती नसतो तर काळ असतो. हा काळ यांची परीक्षा पाहत असतो आणि यांनी परीक्षा सुरु होण्याआधीच आपण नापास होणार हे गृहीत धरलेले असते. कारण अशा व्यावसायिकांच्या दृष्टीने व्यवसाय म्हणजे भरमसाठ पैसा ओतणे आणि कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर कुणातरी खात्रीशीर ग्राहकाला माल विकणे. नवीन व्यवसाय सुरु केल्यानंतर काही काळ यांचे सर्व काही सुरळीत चालू असते. पण नव्याची नवलाई संपत आली, पैसा कमी होत चालला, विक्री मंदावली कि मग यांच्यासमोर खरी परिस्थिती उघड होते. अशावेळी एखादा स्रोत कमी झाला किंवा ठप्प झाला कि उरलेल्या संसाधनांचा, स्रोतांचा वापर करून व्यवसाय कसा सावरायचा आणि पुढे कसा न्यायचा याचे ज्ञान या लोकांना बिलकुल नसते. मग हे गडबडतात, परिस्थितीचे खापर फोडण्यासाठी कुणाचेतरी डोके शोधण्याचा प्रयत्न करतात, कुणालातरी जबादार धरतात, पण आत्मपरीक्षण कधीही करत नाहीत… आणि हळूहळू व्यवसाय ठप्प होत जातो.

एखादा स्रोत बंद झाला म्हणून कुणी व्यवसाय सोडून देत नसतं… आपल्याकडे असलेल्या एक न् एक, अगदी लहानातील लहान, स्रोतांचा पुरेपूर आणि कौशल्यपूर्वक वापर करून आपल्याला समस्येवर मात करावी लागते आणि व्यवसाय पुढे न्यावा लागतो. हा डाव बुद्धिबळापेक्षा वेगळा नाही. कदाचित वजीर पहिल्या दहा चालीमध्येच मारला जाईल पण त्यामुळे डाव अर्ध्यावर सडण्याची गरज नाही… हा डाव एका वजीरावाचून थांबत नाही…. आणि सर्व सैन्याचा कौशल्यपूर्वक वापर केला तर तुमचा पराजय कधीच होऊ शकत नाही.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!