लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
लहानपणीची हत्तीची कथा सगळ्यांनाच आठवत असेल.
हत्ती… साध्या साखळीने बांधून ठेवलेला… ती साखळी तोडण्याची क्षमता त्यात आहे, पण तरीही तो ती साखळी तोडण्याचा प्रयत्न करत नाही… का? कारण तो त्या साखळीला लहानपणापासून बांधला जात आहे. लहानपणी प्रयत्न करूनही त्याला ती साखळी तोडणे शक्य नसायचे. हळूहळू तो हत्ती मोठा झाला, पण ती साखळी तोडणे आपल्या आवाक्याबाहेर आहे हे त्याच्या डोक्यात लहानपणीच घट्ट बसले होते. म्हणून आता कितीतरी ताकदवान होऊनही तो स्वतःला त्या लहानश्या साखळीसमोर कमजोर समजतो… आणि तिला तोडायचा विचारही त्याच्या डोक्यात येत नाही. प्रचंड ताकद असूनही हत्ती त्या इवल्याश्या साखळीसमोर स्वतःला कमी समजतो.
आपली अवस्था साखळदंडाने बांधलेल्या हत्तीसारखीच झाली आहे. स्वतःला कमी समजण्याची मानसिकता या साखळदंडापेक्षा वेगळी नाही. नोकरीच्या सुरक्षित घरात राहणाऱ्या आपल्या व्यवस्थेमधे स्वतःला व्यवसायाच्या दृष्टीने अयोग्य समजणे आपल्या डोक्यात लहानपणीच घट्ट बसलेले असते. लहानपणी आपल्याला व्यवसाय नोकरी यातला फरक कळत नसतो. पण लहानपणापासूनच चांगला शिकला तर चांगली नोकरी मिळेल, मग निवांत होशील, घर गाडी घेशील, मजा करशील असली वाक्ये दररोज कानी पडलेली असतात. त्यात व्यवसायाच्या फोबियामुळे घरात कुणीही व्यवसायाबद्दल चांगलं बोलत नाही. व्यवसाय किती घातक आहे, यात लोकं कसे डुबतात हेच नेहमी ऐकायला येत असतं. जे मोठे उद्योजक आहेत त्यांच्याबाबतीत बोलताना ते आपलं काम नाही, तेवढी आपली क्षमता नाही असली नकारात्मक वाक्ये कानी पडलेली असतात. याचा परिणाम म्हणजे लहानपणीच आपल्या डोक्यात व्यवसायाविषयी फोबिया तयार होतो.
हाच फोबिया आपली पाठ मोठ्यापणीही सोडत नाहीये. आपली क्षमता आपल्यालाच ओळखू देत नाहीये. व्यवसाय काय रॉकेट सायन्स नाही, पण आपण त्याला आपल्या आवाक्याबाहेरचं तत्वज्ञान समजून बसलोय. व्यवसाय सोपा नाही हे सत्य असले तरी आपल्यासाठी अशक्यही नाही हेही सत्य आहे.
ज्याप्रकारे तुम्ही इतरांसाठी आठ तासाची नोकरी करण्याचा विचार करता, त्याच प्रकारे स्वतःसाठी २४ तास नोकरी करणे म्हणजे व्यवसाय. स्वतःसाठी वाहून घेणं म्हणजे व्यवसाय. लोकांना जे हवंय ते देणं म्हणजे व्यवसाय. इतरांसाठी काम न करता स्वतःसाठी काम करणे म्हणजे व्यवसाय. साधी सोपी संकल्पना… पण हा नकारात्मक मानसिकतेचा साखळदंड आपल्याला जखडून ठेवतोय. आपल्याला आपलीच क्षमता ओळखण्यापासून परावृत्त करतोय.
हा साखळदंड जोपर्यंत आपण तोडत नाही तोपर्यंत आपण व्यवसाय करू शकत नाही. हा साखळदंड तोडून टाका, आपली क्षमता ओळखा… हत्ती चे बळ असूनही जर शेळी प्रमाणेच आपण वागत असू तर आपल्याला मिळणारी ट्रीटमेंट सुद्धा शेळीसारखीच असेल हत्तीसारखी नाही हे लक्षात घ्या.
साखळदंड तोडा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील