सातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.


प्रणव, पुणे स्थित प्रोफेशनल फोटोग्राफर व लाईफ कोच निलेश व कृपाली गावडे यांचा मुलगा. लहानपणापासूनच दोघांनीही प्रणवला अर्थसाक्षरतेचे धडे द्यायला सुरुवात केली होती. पैशाचे मूल्य कळायला लागल्यावर त्याला तो कमावण्याची सुद्धा सवय लावली. आणि आता त्याला उद्योजकतेचे धडे द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. प्रणवने स्वतःचा परफ्युम चा व्यवसाय सुरु केला आहे. प्रणव स्वतः परफ्युम बनवतो आणि स्वतः मार्केटमध्ये विकतोय. पालकांचा या विक्रीत कुठेही सहभाग नसतो. कसा आहे प्रणवच्या उद्योजकतेचा प्रवास जाणून घ्या त्याचे वडील निलेश गावडे यांच्याच शब्दातून…

प्रणव 7 वी मध्ये शिकतो. आपण घरात मुलांशी पैसे या विषयी चर्चा करत नाही, फक्त त्यांची गरज पुरवतो आणि कधी तरी अचानक “पैसे झाडाला लागत नाहीत” अशी वाक्य फेकतो. तर पैसा येतो कुठून, कसा येतो, त्याच काय करायचं, पैसा वाढतो कसा या विषयी मुलांमध्ये समज निर्माण व्हावी व यातून अर्ली आंत्रप्रेनरशीप वाढीस लागावी या उद्धिष्ट समोर ठेवून आम्ही हा प्रयोग प्रणव सोबत केला. आपण जगातल्या तरुण उद्योजकांबद्दल वाचून त्यांचं कौतुक करतो, पण आपल्या घरातील मुलं उद्योजक होऊ शकतो या विषयी विचार देखील करत नाही, स्पोर्टिव्ह वातावरण तयार करणे लांबच राहिले. आम्ही हा प्रयोग घरी करण्याचे ठरविले.

सुरवातीला प्रणव सोबत पैसे कसे येतात, त्याचे मूल्य काय आणि कोण ठरवते, महागाई म्हणजे काय, चांगला व वाईट पैसा म्हणजे काय, पैसे कमावण्यासाठी आई बाबांना काय करावे लागते, घरातले पैश्याचे नियोजन कसे होते, महिन्याचा शेवटच्या तारखेला जर अचानक काही खर्च आला तर नियोजन कसे बिघडू शकते, पैसे कुठे ठेवतो, बँकेत का ठेवायचे, घरात का नाही (पैसा कसा वाढतो) अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करणे तसेच प्रॅक्टिकली ज्ञान देणे या विषयावर आम्ही काम केले

इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? मध्यमं कोणती, कोणते चांगले कोणते वाईट, व्याज काय असते, बँक आपल्याला व्याज कस देत इ चर्चा सुरू केली.
मग मोठे उद्योगपती या विषयी माहिती गोळा करून त्याविषयी चर्चा करत हळू हळू तरुण, अनुभवी व यशस्वी उद्योजक यांचा विषयी माहिती घेतली. यातून त्याला आता तू पण अस काही करू शकतो या वर त्याला प्रोत्साहित केले. मग उद्योग कसा उभा रहातो या विषयी चर्चा करताना भांडवल हा विषय चर्चिला. मग भांडवल कसे उभे राहिल, तर त्याला २ पर्याय दिले, एक आमच्या कढून कर्ज अथवा महिनाभर काही काम करून भांडवल उभारणी. त्याने दुसरा पर्याय निवडला. महिना भर घरी काम केले जसे फारशी पुसणे, केर काढणे, भांडी घासणे, विकेंडला 2चाकी गाडी पुसणे. यातून आम्ही त्याच्या कामाची गुणवत्ता तपासून त्या प्रमाणे बाहेर कामवाली ला जितके पैसे देऊन त्या प्रमाणातच त्याला पैसे दिले. याचा एक चार्ट आम्ही केला, रोजचे हजेरी व कामाचे पुस्तक.

महिनाभर काम करून साधारण 500रु त्याने कमावले. आता यातून उद्योग करायचे ठरले. कोणता उद्योग करावा या विषयी रीतसर चर्चा झाली, तो करू शकतो आशा काही उद्योगांविषयी. यात जाणीवपूर्वक उत्पादन करून विकणे या स्वरूपाचा उद्योग निवडले (कच्चा माल, उत्पादन कोस्ट, इन्व्हेंटरी इ संकल्पना कळाव्यात म्हणून)

उत्पादन काय करायचे हे निवडताना, ते का करायचे ठरविले, करायला आवडेल का? कोण विकत घेईल, का विकत घेईल, किती किंमत लोक देतील आणि का, आपल्या उत्पादनाचं वेगळ पण काय असेल, 500रु होईल का? किती कोस्ट पडेल, नफा किती कमवायचा, दिवाळी सारखे सिझन चा उपयोग होईल का, कुठे आणि कशी विक्री करता येईल इ प्रश्नावर चर्चा करून त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट त्याला तयार करायला लावले (आम्ही एक टेम्प्लेट दिली) त्या प्रेझेंटेशन वर चर्चा झाली. व्यवसाय निवडताना कच्चा माल जिथे मिळतो त्या दुकानात जाऊन त्याला स्वतः त्या विषयी चौकशी करायला लावली तसेच विकत घेऊ शकतील आशा लोकांशी सुद्धा बोलायला लावले.

यातून परफ्युम बनवण्याचा उद्योग निवडला.
सर्वात आधी व्यवसाय सुरु करण्यासाठी किती खर्च येईल याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. त्यानुसार त्यावर काम सुरु केले. प्राणवकडे त्यानेच कमावलेले पैसे होतेच. त्यातूनच मग कच्चा माल विकत आणून (दुकानात विचारले कोणतं जास्त खपत) परफ्युम बनवले आणि विक्री सुरू केली.
माल विकताना काही जणांनी साबण पण आहे का विचारले. मग त्यावर घरी चर्चा झाली आणि परफ्युम व साबण अस खास दिवाळी साठी करू शकतो असे सुचले, त्याचा कच्चा माल लगेच उपलब्ध होऊ शकतो व प्रोसेस सोप्पी आहे हे लक्षात आल्यावर ते पण प्रॉडक्ट्स ऍड केले.

कच्चा माल किती कसा वापरतो त्या वरून किंमत कशी ठरवायची ते समजले, आमच्या ओळखीच्या लोकांना खास आम्ही सूचना दिल्या आमचा मुलगा आहे म्हणून लगेच विकत घेऊ नका तर त्याचा सोबत घासाघीस करा, गुणवत्तेविषयी विषयी प्रश्न विचारा, डिस्काउंटमागा आणि मग घ्या.

व्यवसाय सुरू केल्या पासून 2 दिवसात त्याने स्वतः आजू बाजूच्या सोसायटी मधून फिरून तीन दिवसात ३० पेक्षा जास्त ग्राहक मिळविले आहेत. यात रु. १,०००/- चा माल विकून साधारण रु. २,४००/- उत्पन्न आले आहे व आणखी ऑर्डर घेऊन आलाय. यात कुठेही आमच्या ओळखीत तो गेलला नाही. प्रणव हळूहळू शिकतोय. आम्ही त्याच्या सोबत सावलीसारखेच आहोत पण कुठेही त्याला मदत करत नाही.

आपल्या मुलांना कसं घडवावं याच गावडे कुटुंब हे उत्तम उदाहरण आहे. पण यासोबतच प्राणवाच्याही कौशल्याचे आणि समजूतदारपणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. इतक्या लहान वयात पैशाची जाण निर्माण होणे, व्यवसायाची उर्मी निर्माण होते हे कौतुकास्पदच आहे. प्राणवाकडे पाहून वयाच्या १२ व्य वर्षी स्टॉक मार्केटमधे पहिले पाऊल ठेवणारे वॉरेन बफे आठवतात. प्रणवचा उद्योजकीय प्रवास असाच चालू रहो आणि त्याला या प्रवासात नेत्रदीपक यश मिळो यासाठी उद्योजक मित्र परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा

तुम्हीही प्रणवकडून परफ्युम तसेच सुगंधी साबण घेऊ इच्छित असाल किंवा आपल्या मुलांनाही उद्योजकतेचे धडे देऊ इच्छित असाल तर प्रणव च्या वडिलांना, श्री. निलेश गावडे, यांना 9673994983 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
____

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!