‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
शेअरबाजाराविषयी अनेक आक्षेप आणि गैरसमज आहेत. त्यातील महत्वाचे आक्षेप, गैरसमज व त्यांचे निराकरण इथे थोडक्यात पाहू.
१.शेअर बाजार हा जुगार आहे :
अनेक लोकांचा शेअर बाजार हा जुगार आहे असा समज आहे. हे लोक जेथे आपली बचत आणि गुंतवणूक करतात त्या संस्था मोठया प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करीत असतात. शेअरबाजारात तुम्ही कोणत्या शेअरची खरेदी/विक्री कधी आणि कोणत्या भावाने करता यावर तुम्हाला होणारा फायदा / तोटा अवलंबून असतो. अनेक लोक आजही ज्या पद्धतीने अभ्यास न करता गुंतवणूक करतात त्यामुळे या गैरसमजाला पुष्टी मिळते. यांमधील अल्प अथवा दीर्घकालीन गुंतवणूक ही लाभ मिळवावा या आणि याच हेतूने केली जावी. यातील लाभाचे लोभात रूपांतर झाले की व्यक्ती सारासार विचार गमावून बसते. लाभ आणि लोभ यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे. यात होणाऱ्या फायद्यामुळे अधिकाधिक फायदा मिळवावा असा मोह होवू शकतो. मात्र, केवळ आंधळेपणाने गुंतवणूक करुन क्वचित फायदा होत असेल, परंतू कायम फायदा होवू शकत नाही . अशा व्यक्तींना एक जोरदार फटका बसला की त्या बाजारपासून दूर होतात आणि भरकटल्यासारखी बाजाराबद्दल काही ठाम विधाने करत असतात . येथे अभ्यास करण्याची तयारी आणि थांबण्याची चिकाटी असेल तर निश्चित फायदाच होतो . तेव्हां गुंतवणूक करण्यासाठी पैसे आणि मनोबल असेल तर आकर्षक परतावा मिळू शकतो .
२.भांडवलदार आणि असामाजिक घटकांना यामुळे प्रोत्साहन मिळते :
कोणतीही व्यवस्था असेल तर तिचा गैरफायदा घेणारे असतातच म्हणून व्यवस्थाच मोडीत काढायची नसते . आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि त्यात भांडवलनिर्मिती करण्याची परवानगी आहे . बाजारातील कोणाताही घटक बाजाराला सातत्याने एक दिशा दाखवू शकत नाही . आर्थिक क्षेत्र आता बऱ्यापैकी नियमित झाल्यामुळे त्यावर बाजार नियंत्रकांचे (market regulator) नियंत्रण असते . त्यामुळे सर्व व्यवहारात पुरेशी पारदर्शकता आली आहे . एकाद्या शेअरचे गुणात्मक आणि संस्थात्मक मूल्य शोधून योग्य किमतीस गुंतवणूक करू शकतो आणि फायदा मिळवू शकतो .
३.शेअरच्या वाढलेल्या भावाचा कंपनीस काही फायदा नसतो :
हा आक्षेप अर्धसत्य आहे . यातून सटोडीयांचा फायदा होत असला तरी शेअरचे भाव वाढले असतील तर कंपनीस अधिमूल्याने भांडवल किंवा कमी व्याजदराने कर्ज उभे करता येवू शकते . गुंतवणूकदारांना विक्री करुन किंवा नवी खरेदी /विक्री करुन गुंतवणूक काढून घेण्याचा लाभ मिळवण्याचा पर्याय मिळतो . सरकारला कर मिळतो यात कोणतेही लपवाछपवीचे व्यवहार होत नसल्याने काळया पैशांची निर्मिती होत नाही .
४. या व्यवहारात एकाचा फायदा हा दुसऱ्याचा तोटा असतो त्यामुळे त्याचा तळतळाट लागतो :
शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो . प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार करून तो करावा लागतो . यामधे जोखीम आहेच आणि जोपर्यंत विशिष्ट किंमतीत असा कोणताही व्यवहार करण्याची सक्ती होत नाही तोपर्यत ते आपल्या मर्जीने झाले आहेत आणि करणाऱ्याने ते जाणीवपूर्वक केले आहेत असे समजावे लागेल .
५. हे श्रीमंतांचे काम आहे आपले काम नाही :
खरं तर महागाईवर मात करणारा परतावा (return) मिळण्यासाठी प्रत्येकाने बाजारांत गुंतवणूक करायला हवी . गुंतवणूकदाराची गरज भागवणारे , जास्त उतारा देणारे त्याचप्रमाणे तरलता (liquidity) असलेले हे साधन आहे . ते जोखमीसह स्वीकारावे लागते . भविष्यातील वाढत्या गरजा कदाचीत ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते भागवू शकतील परंतू ज्याची खरीखुरी गरज आहे अशा व्यक्ती यापासुन वंचित राहतील . मुळात येथे गुंतवणुकीची सुरुवात ही अत्यल्प पैशाने करता येते . थेंबे थेंबे तळे साचे या प्रमाणे गुंतवणूक करुन त्यात वाढ करता येवू शकते .
६. या नादाला लागून कर्ज झाले ,घरदार विकावे लागले :
गुंतवणूकदारांचे पाय खेचणारा हा एक फिल्मी विचार आहे . स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचे नाही . आपली जोखीम घेण्याची कुवत आणि उपलब्ध पैसे याचा योग्य वापर करुन यातून संपत्ती निर्माण करता येते .
७. ही हरामाची कमाई आहे :
हा एक अनेकांचा आवडता भडक आक्षेप आहे . यात कष्ट करावे लागत नाहीत घाम गाळावा लागत नाही . असे असेल तर सर्व बौद्धिक कामे करुन मिळवलेली कमाई ही हरामाची समजावी लागेल . बँकेत पैसे ठेवून व्याज मिळवणे, कमिशन घेवून विक्री व्यवहार करणे, अल्प भावात फ्लॅट घेवून तो भाड्याने देणे कालांतराने जास्त किंमतीस विकणे ही जर हरामाची कमाई नसेल तर पुढे भाव वाढतील या हेतूने घेतलेले शेअर हरामाचे कसे?
तेव्हां आपण आपल्या आणि इतरांच्या गुंतवणूकीकडे नैतिक अनैतिकतेच्या कालबाह्य कल्पना झुगारून निर्मळतेने पाहू शकू तोच खरा सुदिन !
उदय पिंगळे
8390944222
लेखक गुंतवणूक अभ्यासक व मार्गदर्शक आहेत.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील