‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात ‘ शेखचेल्ली ‘ चा धडा होता . तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता . पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही . तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत .
आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो .
१. बचत आणि गुंतवणूक :
अनेकजण या दोन्हीची गल्लत करून आपण केलेल्या बचतीलाच गुंतवणुक असे समजतात . या दोन्हीही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असून गुंतवणुकीत जाणीवपूर्वक धोका (Calculated Risk) स्वीकारावा लागतो . याच लेखात दिलेल्या पेज /ब्लॉग चे लिंकवर जावून मी पोस्ट केलेला ‘ बचत आणि गुंतवणूक’ यावरील लेख वाचावा .
२. इन्शुरेन्स ही गुंतवणूक नाही :
इन्शुरेन्स आणि गुंतवणूक ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत . इन्शुरेन्स मधून कठीण प्रसंगी सुरक्षिततेची तरतूद पर्याय म्हणून पैशांच्या स्वरूपात करायची असते तर गुंतवणुकीतून महागाईवर मात करणारा आकर्षक परतावा मिळवायचा असतो . या दोन्हीही गोष्टी एकदम पूर्ण होवू शकत नाहीत .तेव्हा वेगळे असे सुरक्षा कवच घेवून अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा . दोन्हीही गोष्टी एकत्रित असणाऱ्या योजनातून आपली पूर्ण गरज भागू शकत नसल्याने अशा योजना घेवू नयेत .
३. बचत आणि गुंतवणूक करण्यात उशीर करणे :
अनेकजण खर्च करायला एका पायावर तयार असतात मांत्र गुंतवणूक करण्यासाठी ते टाळाटाळ करतात .गुंतवणूकीची सुरूवात लवकरात लवकर करणे केव्हाही चांगलेच . त्यामुळे आपली गुंतवणूक चक्राकारगतीने वाढते . गुंतवणूकीचे विविध पर्याय आजमावून घेता येतात .उशीरा सुरूवात केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करायला लागल्याने फारसे पर्याय आजमावता येत नाहीत .
४. कर्ज घेवून चैन करणे :
सहज उपलब्ध होणारे व्यक्तिगत कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांमुळे अनावश्यक गोष्टी या आपल्या गरजा कधी बनतात ते समजत नाही . इतर कोणत्याही मार्गाने उपलब्ध असलेल्या कर्जापेक्षा यावरील व्याजदर सर्वाधिक असतो त्यामुळे आपण कर्जाच्या सापळ्यात कधी अडकतो ते समजत नाही .
५. कर्ज फेडण्याऐवजी गुंतवणूक करणे :
एकाचवेळी कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे ही मोठीच तारेवरची कसरत आहे . आपल्याकडे अतिरिक्त रक्कम आली तर कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे यातील पर्यायांचा बारकाईने विचार करावा लागतो . दीर्घ मुदतीच्या कर्जाची अंशतः परतफेड करणे भवितव्याच्या दृष्टीने अनेकदा खूप फायद्याचे ठरते .
६. महत्वपूर्ण माहितीकडे कानाडोळा करणे :
अनेकदा गुंतवणूक करताना आणि कर्ज घेतांना एक करार केला जातो . यात सर्व अटी आणि जोखिम याची माहिती असते . या अटी काय आहेत आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होवू शकतो याची जाणीव आपल्याला असणे जरूरी आहे . यामुळे स्वतंत्र निर्णय घेता येणे सोपे जाते . केवळ एजंट सांगतो त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये .
७. गुंतवणूक व कर्ज यांचे कागदपत्र नीट न पहाणे आणि ठेवणे :
आपण केलेली गुंतवणूक आणि घेतलेली कर्ज या संबंधी सर्व कागदपत्र तपासून घेणे महत्वाचे आहे . आपण मान्य केलेल्या अटीप्रमाणे ते आहे की नाही हे पहावे आणि त्याप्रमाणे नसल्यास लगेच निदर्शनास आणून द्यावे . ही सर्व कागदपत्र व्यवस्थित नोंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत . गुंतवणूकीवरील वारसनोंदी बरोबर आहेत का हे कटाक्षाने पहावे .
८. अंदाजपत्र बिघडणे :
आपल्या कुवतीपेक्षा खर्च जास्त होवू नये याची काळजी घ्यावी . ‘अंथरुण पाहून पाय पसरावे ‘ असे म्हटले जाते अगदी तसेच नाही तरी अंथरुण पुरत नसेल तर ते मोठे कसे करता येईल त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे . ज्यायोगे आपल्या अल्प आणि दीर्घकालीन गरजांची पूर्तता आपल्या उत्पन्नातून करता येणे गरजेचे आहे .
या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नाहीत असे नाही तरीही आपले पाऊल डगमगू शकते म्हणून परत एकदा ही उजळणी .
___
उदय पिंगळे
8390944222
लेखक गुंतवणूक अभ्यासक व मार्गदर्शक आहेत.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील