तब्बल ४५,००० कोटी रुपयांचा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एस्सार स्टीलवर अखेर लंडनच्या अर्सेलरमित्तलने ताबा मिळविला आहे. अनिवासी भारतीय लक्ष्मी मित्तल यांच्या जगातील अव्वल कंपनीने ५०,००० कोटी रुपयांहून देऊन एस्सार स्टील वर ताबा मिळविला आहे.
४५,००० कोटी रुपये कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या तसेच नादारी व दिवाळखोरी संहितेंर्गत कारवाई करावयाच्या रिझव्र्ह बँकेच्या पहिल्या १२ कंपन्यांमध्ये एस्सार स्टीलचा समावेश होता. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादामार्फत पार पडलेल्या निविदा प्रक्रिये दरम्यान सर्वोच्च बोली लावलेल्या अर्सेलरमित्तलकडे अखेर एस्सार स्टीलचा ताबा देण्याचा निर्णय कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने बहुमताने घेतला.
अर्सेलरमित्तलची वार्षिक स्टील उत्पादनक्षमता ९७ दशलक्ष टन आहे. एस्सार स्टीलकरिता तिची न्युमेटल मॉरिशसबरोबरही स्पर्धा होती. एस्सार खरेदीकरिता अन्य दोन कंपन्यांची ७,५०० कोटी रुपयांची देणी पूर्ण करण्याची लवादाची अट अर्सेलरमित्तलने पूर्ण केली होती. एस्सार स्टीलच्या खरेदीनंतर स्टील उत्पादन वाढविण्यासह तिला नफ्यात आणण्याचा दावा अर्सेलरमित्तलने केला आहे. एस्सार स्टीलकरिता अर्सेलरमित्तल अतिरिक्त २,००० ते २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.