लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
चिनी कंपन्या माल एवढा स्वस्त कसा विकू शकतात ? या प्रश्नाचे एकमात्र उत्तर आहे ते म्हणजे कॉस्ट कटिंग. चिनी कंपन्यांची फक्त प्रोडक्शन क्षमताच मोठी आहे असे नाही तर त्यांची कॉस्ट कटिंग करण्याची सवय सुद्धा प्रचंड आहे. प्रोडक्ट कमी किमतीत विकण्यासाठी फक्त मास प्रोडक्शन घेऊन जमत नाही तर त्याचा उत्पादन खर्च सुद्धा तेवढाच कमी असणे आवश्यक असते. हा उत्पादन खर्च कसा कमी करायचा याचे पुरेपूर ज्ञान चिनी कंपन्यांना आले आहे. हि कॉस्ट कटिंग एवढी टोकाची असते कि ते अगदी अर्धा, पाव टक्क्याचा सुद्धा हिशोब करतात. व्यवसायात ग्राहक मिळविणे आणि वाढवणे जेवढे आवश्यक असते तेवढेच कॉस्ट कटिंग करणे सुद्धा आवश्यक असते.
कॉस्ट कटिंग हि संकल्पना आपल्याकडे मुरलेले उद्योजक / व्यावसायिक वगळता इतर कुणी कधीच गांभीर्याने घेताना दिसत नाही. मुळात उत्पादन खर्च कसा काढायचा याचंच पुरेसा ज्ञान आपल्याकडे कित्येकांना नसल्यामुळे, उत्पादन खर्च कसा कमी करायचा याच ज्ञान असायची शक्यताच नाही. आणि त्याला आपण कधी गांभीर्याने घेताही नाही.
आपल्यापैकी किती जण आपल्या घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्याचा खर्च आपल्या उत्पादन खर्चात पकडतात ? किती जण आपले बूट, चप्पल यांचा कामाच्या ठिकाणी होणारा घसारा उत्पादन खर्चात पकडतात ? आपली गाडी घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत जात असेल आणि तिथेही गाडीचा वापर होत असेल तर त्या गाडीची मेंटेनन्स कॉस्ट किती जण आपल्या उत्पादन खर्च पकडतात ? हे प्रश्न सुरुवातीला ऐकताना हास्यास्पद वाटतील पण हा खर्च आणि यसारखाच इतरही लहान लहान खर्च सुद्धा तुमच्या प्रोडक्शन कॉस्ट समाविष्ट करायचा असतो हे लक्षात घ्यायलाच हवे.
हा खर्च पकडणे सोडून द्या, असा काही खर्च उत्पादन खर्चात पकडायचा असतो हेच किती जणांना माहिती आहे ? प्रोडक्शन कॉस्ट, सर्व्हिस कॉस्ट कशी काढायची असते याचा तरी किती किती जणांनी शास्रशुद्धपणे अभ्यास केलेला असतो? किती (नवीन) उद्योजक – व्यावसायिक, रुपयात हिशोब न करता टक्क्यांत हिशोब करतात ? आपण खरंच योग्य पद्धतीने आपली प्रोडक्शन-सर्व्हिस कॉस्ट काढतोय का आणि ती कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय का ?
स्वतःचीच समीक्षा करायला सुरुवात करा…
काही वर्षांपूर्वी माझी एक कंपनी होती. एका बॅटरी कंपनीला दीड रुपयांना प्लास्टिक ट्यूब विकायचो आम्ही. त्यासाठी प्लास्टिक पाऊच लागत असत. त्या पाऊच ची किंमत ठरवताना आम्ही पाव टक्का खर्च वाचत असेल तरी समाधानी असायचो. कारण चार प्रकारच्या रॉ-मटेरियल मध्ये पाव पाव टक्के वाचले तरी मोठी बचत होत असे. हे पाव पाव टक्के वाचवून आमची कंपनी महिन्याला लाखभर नफा कमवत होती. त्या कंपनीने मला हिशोब कसा करायचा हे शिकवले होते. ट्यूब घेताना आम्ही अर्धा-अर्धा पैसा डिस्काउंट मिळवायचा प्रयत्न करायचो. कारण अर्धा पैसा बचत म्हणजे पाव टक्का बचत असायची. अर्धा पैसा खूप लहान वाटतो पण त्याचा टक्क्यात हिशोब केला तर तोच आकडा खूप मोठा होतो. हिच कॉस्ट कटिंग आम्हाला मंदीतही भरपूर ऑर्डर्स आणि पर्यायाने नफाही मिळवून देत होती. या कॉस्ट कटिंग मुळे आम्ही अव्वल दर्जाचे प्रोडक्ट आमच्या स्पर्धक कंपन्यांपेक्षा खूप कमी किमतीत विकू शकत होतो.
कामगारांमुळे होणारा अतिरिक्त खर्च हि आपल्या व्यवसायांची मोठी डोकेदुखी आहे. आपल्याकडे कामगार क्षेत्रात कॉस्ट कटिंग करणे म्हणजे डोक्याला शीण करून घेण्यासारखे आहे. कामगारांची अडीचच्या जेवणाची सुट्टी असेल तर ते दोन वाजल्यापासूनच टंगळमंगळ करायला लागतात. दोन वाजता पाणी प्यायला उठायचं, दहा मिनिटे त्यात खर्च करायचे, सव्वा दोन ला जागेवर येऊन बसायचं. काम सुरु करायला पाच मिनिट खर्च करायचे, आणि अडीचला पाच मिनिट कमी असले कि जेवणाचा डबा घ्यायला पाळायचं, हि पद्धत आजही ८०% कंपन्यात कामगार नित्यनेमाने पाळतात.
एका कामगाराने आठ तासापैकी पंधरा मिनिट टाईमपास करणे म्हणजे तब्बल ३% वेळ वाया गेलेला असतो, असा कधी आपण हिशोब केलाय का? ३% वेळ म्हणजे त्या कामगाराला जर ३०० रुपये रोज असेल तर त्यातले ९ रुपये तुमचे वाया गेलेले असतात. आता जर असे फक्त २० जरी कामगार असतील तर तुमचे किती पैसे वाया जातात ? दिवसाला १८० रुपये, महिन्याच्या २६ दिवसात हे नुकसान असतंय ४६८० रुपये आणि वर्षाला हे नुकसान होतं ५६१६० रुपये…. कामगारांनी एक मिनिट सुद्धा वाया घालवणे कंपनीला किती महागात पडते हे कामगाराच्या कधी लक्षात येणार नाही पण उद्योजकाला हे माहीतच असायला हवे.
चिनी कंपन्या इथे आपल्यापेक्षा भारी ठरतात.
कामगारांना आपल्यापेक्षा जास्त पगार देऊनही चिनी कंपन्या आपल्यापेक्षा स्वस्तात माल कसा बनवतात, याच उत्तर तुम्हाला इथे सापडेल. या कंपन्या प्रचंड कॉस्ट कटिंग करतात. अगदी चहाची दहा मिनिटाची सुट्टी असेल तर कंपनीतील सगळे दिवे दहा मिनिटासाठी बंद केले जातात. अगदी अर्धा-पाव टक्का किंवा त्यापेक्षा जास्त बचत होत असेल तर तीही करण्यासाठी त्या जंग जंग पछाडतात. टोकाची बार्गेनिंग, कामगारांकडून १००% क्षमतेने काम करून घेणे, जमेल तिथे खर्च कमी करणे, हि या कंपन्यांची खासियत आहे.
जस जपान गुणवत्तेत जगात अव्वल आहे तसंच चीन कॉस्ट कटिंगमधे जगातील उद्योगविश्वात बादशहा आहे. या कंपन्यांकडे कॉस्ट कटिंग साठी सुद्धा स्वतंत्र टीम असते, जी सतत कुठे खर्च कमी करता येईल यावर अभ्यास करत असते. अशा टीम आपल्याकडेही कित्येक कंपन्यांत आहेत. आम्ही ज्या कंपनीला ट्यूब सप्लाय करायचो, त्या कंपनीच्या असिस्टंट पर्चेस मॅनेजर ने त्याच्या अखत्यारीत येत असलेल्या प्रोडक्ट मध्ये सप्लायरशी बार्गेनिंग करून करून प्रत्येक प्रोडक्ट मागे दोन-पाच पैसे वाचवून कंपनीची वर्षाकाठी चार लाख रुपयांची बचत केली होती. यासाठी कंपनीने त्याला पगारवाढ आणि बोनस असे बक्षीसही दिले होते.
कॉस्ट कटिंग आवश्यक आहे. व्यवसायात कॉस्ट कटिंग ला खूप महत्व आहे. तुम्हाला व्यवसायात यशस्वी करण्यात या कॉस्ट कटिंग चा सिंहाचा वाटा असतो. एक एक पैसा, नुसता एकच नाही तर अर्धा, पाव पैसा सुद्धा वाचवणे आवश्यक असते. टक्क्यात हिशोब करायचा असतो. फक्त एक-अर्धा नाही तर छटाक टक्का जरी वाचत असेल तरी तो वाचायलाच हवा. कुठे कुठे पैसा वाचवू शकतो याचा तुम्ही सतत हिशोब करत राहणे आवश्यक असते. जिथे जिथे शक्य असेल तिथे तुमचा पैसा वाचायलाच हवा. एक एक पैसा वाचवून लाख – करोड कधी वाचतात हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. व्यवसायात होणारी बचत हा निव्वळ नफाच असतो. हीच बचत तुमच्या उत्पादनाची किंमत कमी करायला मदत करत असते, यामुळे तुमचेच ग्राहक वाढण्यात मदत होत असते आणि अर्थातच तुम्हाला व्यावसायिक स्पर्धेत पुढे जायला सहाय्य्यभुत ठरत असते.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Thanks supplying great information regarding business
Awesome information sir.