लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
अचानक एखादा व्यवसाय प्रकाशात येतो, सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु होते, तो व्यवसाय कसा फायद्याचा आहे, त्यात कसे हजारो लोक करोडपती झालेत याच्या बातम्या रंगवुन सांगीतल्या जातात. वेगवेगळ्या मार्गांनी या बातम्या दररोज तुमच्या कानांवर लाटांप्रमाने आदळत असतात. लगेच त्याचे मार्गदर्शन करणारे जागोजागी तयार होतात. आणि तुम्हीही नकळत त्याकडे आकर्षीत होतात. कोणताही सारासार विचार न करता पैसे गुंतवता आणि अडकता… या लाटा तुम्हाला आपल्याकडे ओढल्यानंतर पुन्हा किनाऱ्यावर येउ देत नाही. आणि अथक प्रयत्नांती तुम्ही किनारा गाठला तरी उभे राहण्याची तुमची ताकद संपलेली असते…
लाट… व्यवसायाची लाट. तुम्हाला गिळंकृत करणारी.
ईमु पालन
ससे पालन
महागुनी वृक्ष
कोरफड लागवड
ऑस्ट्रेलियन साग
ही काही लाटेची ऊदाहरणे….
आणखीही आहेत, पण ही ऊदाहरणे प्रत्येकाच्या लक्षात राहणारी आहेत
या व्यवसायांची एके काळी लाट आली होती. दररोज कोणत्यातरी पेपरात बातमी, प्रशिक्षण केंद्रांचा सुळसुळाट, दर दोन चार दिवसांनी या व्यवसायांमुळे करोडपती झालेल्या एखाद्या ऊद्योजकाची माहीती….त्यावेळी सोशल मिडीया प्रभावी नव्हतं म्हणुन गावागावात पत्रके वाटली जात, कार्यशाळा आयोजीत केल्या जात….. अक्षरशः तरुणांना, नवऊद्योजकांना झपाटलं होतं या लाटांनी. ज्याला कुणाला व्यवसाय करायचा असेल तो आधी याच व्यवसायांच्या मागे लागत असे, जणु काय जगात या व्यवसायाव्यतिरीक्त व्यवसायंच नाही.
आज यांची काय परिस्थिती आहे? या लाटांमधे वहावत जाऊन ज्यांनी व्यवसाय सुरु केले त्यांची काय अवस्था आहे हे पाहिलंय का? या लाटांवर भरवसा ठेऊन पैसे गुंतवलेले ९९.९९% नवऊद्योजक तोट्यात गेलेत…. यांचे व्यवसाय ठप्प झालेत… ज्यांनी आयुष्यभराची कमाई यात लावली ते आता कुठेतरी नोकरी करत आहेत….
प्रशिक्षण संस्थावाले, ईमु, ससे विकणारे, कोरफडीचं, महागुनीचं रोपटं, बी विकणारे लखपति करोडपति झाले आणि यांना पाळणारे, शेतीमधे लाखो गुंतवणारे भिकेला लागले…. कारण या लोकांनी नवउद्योजकांना विक्रीचं कोणतंही मार्गदर्शन केलंच नव्हतं… या लोकांच टार्गेट फक्त स्वतःचा माल विकणे एवढच होतं. सुरुवातीचे काही दिवस या लाटावर हिंदोळे घेत नवऊद्योजक पैशाच्या राशीत खेळत होते, पण हळुहळु एकेकाचा प्रकल्प बंद पडत गेला आणि शेवटी सर्वच संपलं….
अशा लाटा आजही येत आहेत, यात बरेच जण अडकलेत, डुबलेत, पस्तावलेत, पण आपण सारासार विचार करायला तयार नाही… ऐकीव माहितीवर विश्वास ठेऊन कमी कष्टात अति ऊत्पन्नाच्या हव्यासापाई पैसे गुंतवुन या जाळ्यात स्वतःहुन अडकत आहोत….
आता आजच्या लाटा कोणत्या हे थोडा विचार केला तर तुम्हाला ऊत्तर सापडणे अवघड नाही, कारण या लोकांची मार्केटींग स्ट्रॅटेजी तीच आहे…थोडं स्ट्रक्चर बदललं आहे फक्त. दिवसाला एक टक्का परतावा, शंभर मेंबर केले की करोडपती, दोन वर्षात अब्जाधीश, शेळ्या विकुन वर्षाला एक करोड कमावले, आॅस्ट्रेलीयन सागाची झाडे लावुन सहा वर्षात एकरी एक कोटी उत्पन्न, कुठलेतरी औषधी रोपटे, काॅईन विकले की महीन्याला लाख रुपये घरपोच… कितीतरी फसव्या जाहीराती दररोज चालु आहेत.
जाहीराती पहील्यापेक्षा बदलल्या असल्या तरी स्ट्रॅटेजी मधे काडीचाही बदल झालेला नाही…. कारण कमी कष्टात पैसे कमावण्याचा हव्यास असणारे तेव्हाही होते आणि आत्ताही आहेत…. स्वतःला फसवुन घेण्यासाठी एका पायावर उभे असणारे जागोजागी सापडतात…. अडकतात… संपतात…
लाटांमधे अडकु नका, सारासार विचार करा, तुमच्यासाठी काय योग्य आहे याचा शोध घ्या आणि मगंच व्यवसाय निवडा.
लाटांवर स्वर होणारे सुद्धा कधी खवळलेल्या समुद्रात उडी घेत नसतात. या जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या लाटा तर त्सुनामीसारख्या आहेत, तुम्हाला कुठे गडप करतील कळणारही नाही.
लाटा दिसायला चांगल्या असल्या, त्यांचा आवाज आकर्षक वाटला तरी त्यात पोहत नसतात. पोहण्यासाठी शांत समुद्र आवश्यक असतो.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील