किराणा माल घरपोच विक्री करणाऱ्या बऱ्याच कंपन्या सुरु झालेल्या आहे. पण या जास्त करून मोठ्या शहरातच आहे. या कंपन्यांची या व्यवसायात गुंतवणूकही खूप मोठी आहे. जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जातात.
पण तुम्ही या व्यवसायाला छोट्या स्तरावर, कमी गुंतवणुकीत सुद्धा सुरु करू शकता. किराणा शॉप सुरु करण्यासाठी गुंतवणूक मोठी लागते. आजच्या स्पर्धेच्या जमान्यात शॉप चांगले डिझाईन सुद्धा करावे लागते. यासाठी मोठा खर्च करावा लागतो. पण तुम्ही या सर्व गोष्टींना फाटा देऊन कमी गुंतवणुकीत किराणा व्यवसाय करू शकता.
सुरुवातीला किराणा माल स्वतः खरेदी करण्याच्या भानगडीत पडू नका. स्थानिक स्तरावरील एखाद्या किराणा व्होलसेलर सोबत टाय-अप करू शकता व येणाऱ्या सर्व ऑर्डर्स त्या व्होलसेलर कडून माल घेऊन डिलिव्हरी करू शकता. सुरुवातीचा खर्च ब्रॅंडिंग व जाहिरातीवर करा. व्यवसायाला एक चांगले नाव देऊन त्याचा चांगला ब्रँड तयार करा. तुमच्या गुंतवणूक क्षमतेनुसार स्थानिक परिसरात वर्तमानपत्रांमधून पत्रके वाटणे, चांगल्या लोकेशन ला बॅनर्स लावणे, रेडिओ मध्ये जाहिरात देणे, जाहिरातीची पॅम्प्लेट घराघरात वाटणाऱ्या मुलांकडून पत्रके वाटप करून घेणे अशा विविध मार्गांनी जाहिरात करू शकता. तुमच्या गुंतवणूक क्षमतेचा अंदाज घेऊन जाहिरातीचे बजेट निश्चित करा. आणि सुरुवातीलाच शहराच्या खूप मोठ्या भागावर काम न करता छोट्या पण प्रभावी भागावर लक्ष केंद्रित करा. असा विभाग निवडा जिथली खर्च करण्याची क्षमता चांगली आहे, जिथला वर्ग घरपोच ऑर्डर्स देण्याला जास्त प्राधान्य देतो.
टाय-अप केलेल्या व्होलसेलर कडून सगळ्या मालाचे रेट घ्या. दररोज दर बदलणाऱ्या मालाचे दररोज दर माहित करून घेत जा. त्याची एक PDF तयार करा. ग्राहकाला जेव्हा गरज असेल तेव्हा ती पाठवू शकता. तसेच ग्राहकाने ऑर्डर देतानाच त्यांना अंदाजे बिल किती होईल याचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न करा.
जाहिरात सुरु केल्यानंतर सुरुवातील प्रतिसाद मिळण्याची शक्यता असणारच नाही. पण सतत जाहिराती दिसायला लागल्यावर ग्राहक संपर्क करेलच. अशावेळी त्यांची ऑर्डर भलेही कमी रकमेची असो, ती पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. कोणत्याही ऑर्डर ला नाही म्हणू नका. किमान खरेदीचे लिमिट १००-२०० रुपयांपेक्षा जास्त ठेऊ नका. ज्या ऑर्डर्स मिळतील, तो माल टाय-अप केलेल्या किराणा व्होलसेलर कडून विकत घेऊन डिलिव्हरी करा. चांगल्या एरियातून येणाऱ्या ऑर्डर्स रद्द होण्याचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे शंभरात एखादी ऑर्डर अचानक रद्द होऊ शकते. त्यामुळे आधी पेमेंट घेण्याची सुरुवातीच्या काळात गरज नाही.
FMCG मध्ये नफ्याचे प्रमाण कमी असते. यात व्होलसेलर कडून घेताना तुम्हाला आणखी कमी मार्जिन शिल्लक राहील पण. त्याने फरक पडत नाही. तुमचा व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीत सुरु होतो. महत्वाचे म्हणजे तुमचा एक ग्राहकवर्ग तयार होतो. वर्षभरानंतर व्यवसाय वाढत गेल्यावर मग तुम्ही स्वतःचे गोडाऊन उभारून मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी माल खरेदी करू शकता. अशावेळी तुमच्याकडे ग्राहक वर्ग तयार असल्यामुळे गुंतवणूक करतानाचा तुमचा रिस्क रेशो खूप कमी होईल.
सध्या फक्त मोठमोठ्या मेट्रो शहरात घरपोच किराण्याची सेवा मिळत आहे, पण अशा शहरात कितीही कंपन्या आल्या तरी संधी असतेच, लवकरच काही इतर महत्वाच्या शहारत सेवा सुरु होतील, पण यासोबतच लहान लहान शहरात या व्यवसायाला मोठी संधी आहे, कारण इथे अजून कोणत्याही मोठया ब्रँड ने सुरुवात केलेली नाही.
विचार करा.. . सुरुवात करा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
उद्योजक मित्र
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
खूप छान माहिती दिली सर