सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा वस्तू आणि सेवाकरातून १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर संकलन झाले आहे.
केंद्र सरकारने करचोरांवर ठेवलेला अंकुश आणि सणासुदीत बाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवाकरातून (जीएसटी) मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे. एप्रिल २०१८ मध्ये तुलनेत अधिक, १,०३,४५८ कोटी रुपये कर संकलन झाले होते. त्यानंतर ते एक लाख कोटी रुपयांच्या आत मात्र ९० हजार रुपयांच्या वरच राहिले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये ६७.४५ लाख व्यावसायिकांनी जीएसटी विवरणपत्रे दाखल केली. या महिन्यातील जीएसटीद्वारे मिळालेले एकूण उत्पन्न १लाख ७१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून ९४,४४२ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. ‘ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. करांचे दर कमी करून, करचोरी करणाऱ्यांना रोखून आणि कर अधिकाऱ्यांचा कमीत कमी हस्तक्षेप असूनही मोठ्या प्रमाणावर जीएसटी वसूल झाला आहे,’ अशा आशयाचे ट्विट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण जीएसटी उत्पन्नात काही राज्यांची कामगिरी अतिशय चांगली झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये जीएसटी उत्पन्नात केरळने सर्वात जास्त ४४ टक्क्यांचे योगदान दिले आहे. त्यापाठोपाठ झारखंड (२० टक्के), राजस्थान (१४ टक्के), उत्तराखंड (१३ टक्के) आणि महाराष्ट्र (११ टक्के) यांचा क्रमांक लागतो. यंदा एप्रिलमध्ये प्रथमच जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करून १,०३,४५८ कोटी रुपयांवर गेले होते. त्यानंतर सातत्याने मासिक जीएसटीचे उत्पन्न ९० हजार कोटी रुपयांहून अधिक नोंदवले गेले आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात दरमहा एक लाख कोटी रुपयांच्या जीएसटी उत्पन्नाचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
करांचे दर कमी झाल्याने आणि करांची रचना अतिशय सुलभ झाल्याने मासिक उत्पन्नवाढीची क्रांती झाली आहे. करचोरी करणाऱ्यांना रोखल्याने, कर अधिकाऱ्यांचा अनावश्यक हस्तक्षेप कमी केल्याने जीएसटीतून मिळणारे उत्पन्न वाढले आहे.
अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री