स्वच्छतेचं महत्व सांगणारे लक्ष्मीपूजन


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

लक्ष्मीपूजन हा दिवाळीतला सर्वात महत्वाचा दिवस समजला जातो. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. पण इथे लक्ष्मी म्हणजे पैसा, संपत्ती नसते तर झाडणी किंवा केरसुणी असते. याला आपल्याकडे सामान्य भाषेत झाडणी असेच म्हटले जाते. यादिवशी या केरसुणीची पूजा केली जाते. केरसुणीला या दिवशी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं.

थोडक्यात लक्ष्मीपूजन हे आपल्याला स्वच्छतेचं महत्व सांगणारा दिवस आहे. केरसुणी हि घर, परिसर स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. लांब झाडू आत्ता आत्ता आले आहेत, पूर्वीपासून आपण हि केरसुणीच वापरत आलो आहोत. या दिवसाचा संदेश खूप स्पष्ट आहे. स्वच्छता ठेवा. तुमचे घर, तुमचा परिसर हा नेहमीच स्वच्छ राहील याची काळजी घ्या. पैशाची पूजा करण्याच्या नादात आपण स्वच्छतेचं महत्व सांगणाऱ्या केरसुणीला नजरअंदाज करायला लागलो आहोत, पण पैसा, समृद्धी हि याच केरसुणीची देण आहे हे आपण विसरत चाललो आहोत.

समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही. समृद्धीमध्ये पैशासोबतच, हसतं खेळतं कुटुंब, मानसिक शांती, प्रसन्न वातावरण या गोष्टी सुद्धा येतात. घर परिसर स्वच्छ असेल तर अशा ठिकाणी नेहमीच प्रसन्न वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा असते… आणि अशा प्रसन्न आणि सकारात्मक वातावरणात आपली कार्यक्षमता नेहमीच वाढती असते. आणि जिथे कार्यक्षमता उत्तम असते, वातावरण प्रसन्न असते तिथे समृद्धी नांदत असते.

साधं उदाहरण घ्या. तुमचा एखाद शॉप असेल. पण त्याच्या आसपास प्रचंड कचरा साठलेला असेल, किंवा ते शॉपही स्वच्छ नसेल, तिथे कधीही गेलं तर कंटाळवाणं वातावरण असेल तर अशा ठिकाणी ग्राहक खूप अर्जंट काही गरज असेल तरच खरेदीला येईल. इतर वेळेस तो तुमच्या शॉप जवळ भटकणार सुद्धा नाही. पण जर तुमचा परिसर, तुमचे शॉप स्वच्छ असेल तर ग्राहक सहज भटकायला, फिरायला म्हणूनही तुमच्या दुकानाच्या आवारात येईल. थोडक्यात सहज आलेला ग्राहकही तुमच्या दुकानात खरेदी करेल. मोठमोठे शॉप हे पैसा खूप असतो म्हणून स्वच्छ नसतात, तर ते स्वच्छ असतात म्हणून त्यांच्याकडे ग्राहक भरपूर असतात, म्हणजेच त्यांची श्रीमंती जास्त असते. अगदी जगातील सर्व प्रगत, समृद्ध, श्रीमंत देश हे श्रीमंत आहेत म्हणून स्वच्छ आहेत, असे नसून ते स्वच्छ आहेत म्हणून समृद्ध आहेत हेच सत्य आहे… मार्केट स्वच्छ असेल तर तिथली उलाढालही जास्त असते. तिथे येणारा ग्राहक हा प्रसन्न मानसिकतेने खरेदी करतो, अशा मानसिकतेमध्ये त्याच्याकडून खरेदीही चांगली होत असते. ऑफिस स्वच्छ असेल तर कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढते, याचा फायदा तुम्हालाच होणार असतो… थोडक्यात स्वच्छता हे समृद्धीचे मूळ आहे. स्वच्छतेने वातावरण प्रसन्न राहते, सकारात्मक ऊर्जा वाढते, कार्यक्षमता वाढती राहते, अर्थातच समृद्धी येते…

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने माझ्या उद्योजक मित्रांसाठी हाच शुभेच्छा संदेश असेल… स्वच्छता ठेवा. तुमचे घर, व्यवसायाचे ठिकाण आणि परिसरही नेहमीच स्वच्छ राहील याची काळजी घ्या…

समृद्ध भारत पाहायचा असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला प्रगत समृद्ध भारत द्यायचा असेल तर स्वच्छतेचे शिवधनुष्य आपल्यालाच पेलावे लागणार आहे… 
स्वच्छ भारत, समृद्ध भारत… 

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!