व्यवसायातील घोडचूका (भाग २)… एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खोदणे…


एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खोदणे…

बऱ्याचदा असं होतं कि तुम्ही एखाद्या व्यवसायात पैसे गुंतवता, किंवा व्यवसायात एखाद्या मार्केटमध्ये, एखाद्या संशोधनामध्ये, नवीन प्रयोगामध्ये पैसे गुंतवता… पण त्यात अपयश येतं. कितीही प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळत नाही. व्यवसायात प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही. अपयश हाही व्यवसायाचा भाग आहे. एक वेळ अशी येते कि तुम्हाला आता थांबणे आवश्यक होऊन बसते. यशस्वी होण्यासाठी कुठे थांबावे हेही कळणे आवश्यक असते… पण इथे आपण कमी पडतो. तुम्ही निवडलेला मार्ग पूर्णपणे चुकलेला आहे आणि तो सोडून तुम्हाला नवीन पर्याय शोधणे आवश्यक आहे हे लक्षात येत असते पण तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या खर्चाचे हिशोब मांडत बसता. इतके गुंतवलेत, इतके खर्च केलेत मग किमान ते वसूल होईपर्यंत तरी आपण हा व्यवसाय, किंवा हा प्रयत्न सुरु ठेवलाच पाहिजे… आणि ते गुंतवलेले किंवा खर्च केलेले पैसे वसूल करण्यासाठी आपण त्या व्यवसायात / संशोधनात / नवीन प्रयत्नात आणखी पैसे ओतत राहतो.

पण हि तुमची व्यवसायातली एक मोठी घोडचूक असते. एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खोदणे. हि घोडचूक तुम्हाला व्यवसाय क्षेत्रातूनच बाहेर फेकू शकते इतकी मोठी असते. गुंतवलेले पैसे वसूल करण्यासाठी तुम्ही आणखी पैसे गुंतवता, खर्च करता. पण तुम्ही जिथे पैसे खर्च करत आहात त्याची तुम्हाला परतावा देण्याची क्षमता संपली आहे आणि आता त्यापासून दूर जाण्याची वेळ आलेली आहे हे तुम्ही कधीच लक्षात घेत नाही. तुम्ही खर्च करत राहता… रिझल्ट मिळत नाही… मग खर्च झालेले पैसे वसूल करण्यासाठी तुम्ही आणखी खर्च करता… असं करत करत तुम्ही तुमच्याच जाळ्यात अलगद अडकता.

माझ्याच बाबतीत घडलेली घटना सांगतो. मला व्यवसायात येऊन आठ वर्षे झालीत. व्यवसायात नवीन असताना माझ्याकडे एका टेलिकॉम कंपनीचे नगर शहरासाठीचे डिस्ट्रिब्युशन होते. (आठवण व्यवसायाची या लेखात मी MTS कंपनीची फ्रॅंचाईजी व डिस्ट्रिब्युशन याबद्दल लिहिले होते तोच व्यवसाय) व्यवसाय चांगला चालू होता. नवनवीन गोष्टी शिकत होतो. अशात मला कंपनीने शेवगाव तालुक्याचे मार्केट तयार करण्याचे काम सांगितले. शेवगाव तालुक्याचे MTS चे डिस्ट्रिब्युटर ने काम सोडल्यामुळे तिथले मार्केट जरा कमजोर झालेले होते. कंपनीने मला शेवगाव तालुक्यात सुद्धा डिस्ट्रिब्युशन करायला सांगितले. तीन महिने मी शेवगाव तालुक्यात काम केले. दोन सेल्स एक्झिक्युटिव्ह कायम या तालुक्यात सक्रिय असत. तीन महिन्यात माझा या नवीन मार्केटमध्ये तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च झाला होता. पण रिझल्ट काही मिळत नव्हता. मी स्वतः चार पाच वेळा सगळं मार्केट फिरून आलो.. बरेच प्रयत्न केले पण शेवगाव मधून म्हणावा असा रिझल्ट येत नव्हता. प्रत्येक महिन्याला किमान दहा हजाराचे नुकसान या मार्केटमुळे होत होते. हे मार्केट माझ्याच्याने शक्य नाही हे माझ्याही लक्षात यायला लागले होते. पण त्यात आत्तापर्यंत झालेला तीस चाळीस हजाराचा खर्च मला मार्केट सोडू देत नव्हता.

एक दिवस आमच्या सेल्स मॅनेजर ने मला स्पष्टपणे सांगितले कि शेवगाव मार्केट सोडा. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यातून काही मिळणार नाही. उगाच खर्च करत बसू नका. मी त्यांना उत्तर देताना माझ्या खर्चाचा विषय काढला. तीस चाळीस हजार रुपये खर्च झालेत, ते वसूल होईपर्यंत तरी मी शेवगाव मार्केट सोडू शकत नाही… एवढं म्हटल्यावर सेल्स मॅनेजर माझ्यावर चिडलेच… एखाद्या जवळच्या व्यक्तीत रागवावे अशा कडक आवाजात म्हणाले; श्रीकांत शेठ सांगतोय तेवढं ऐका आणि शेवगाव मार्केट सोडा, झालेला खर्च भरून काढण्याच्या नादात आणखी चार महिने अडकून पडाल आणि आणखी नुकसान करून घेताल. यानंतर दुसऱ्याच दिवशी शेवगाव मार्केट मधुन मी बाहेर पडलो, आणि होऊ घातलेल्या नुकसानापासून वाचलो.

साहजिकच जर ते तीस हजार वसूल करण्याच्या नादात मी आणखी काही महिने तिथे थांबलो असतो तर मला आणखी किमान चाळीस पन्नास हजाराचा खर्च नक्कीच झाला असता. आणि ते मार्केटही असे होते कि तिथे कंपनीचा जास्त सेल मिळू शकत नव्हता. म्हणजेच तीस हजार वसूल करण्याच्या नादात मी लाखभराला डुबलो असतो. व्यवसायात कधी कुठे थांबायचे हे अजून शिकण्याच्या मार्गात होतो, आणि त्या नादात पडलेला खड्डा आणखी खोदून मोठा करण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सेल्स मॅनेजर ने वेळीच थांबवले आणि होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून वाचवले.

आपल्या बाबतीत बऱ्याचदा हि चूक होते. झालेला खर्च वसूल करण्यासाठी आणखी खर्च करणे… खर्च वसूल होत नाही, आणि आपण पैसे ओतत राहतो, १० रुपये वसूल करण्यासाठी आपण २० रुपये ओततो, आणि ते ३० रुपये वसूल करण्यासाठी आणखी ४० रुपये खर्च करतो…. शेवटी सगळाच खर्च वाया जातो. कित्येक वेळा या भानगडीत इतके पैसे अडकून पडतात कि आपल्या व्यवसायातून सपशेल माघार घ्यावी लागते. सगळं कमावलेल गमावण्याची वेळ येते.

कधी आणि कुठे थांबायचे हे उद्योजकाला कळणे आवश्यक असते. एक खड्डा खोदण्यासाठी आपण दुसरा खड्डा खोदायला सुरु करतो. म्हणजे प्रत्यक्षात खड्डा तसाच राहतो फक्त पहिला खड्डा बुजावल्याचे समाधान मिळते इतकेच. उलट तो खड्डा तसाच सोडून दिला आणि आपली ऊर्जा, पैसे इतर चांगल्या कामावर खर्च केले तर त्यातून चांगला परतावा मिळेल आणि तो खड्डाही काळानुरूप आपोआपच बुजून जाईल.

इथे आणखी एक महत्वाचे सांगणे आहे कि, व्यवसायात धीर धरणे आणि कुठे थांबायचे याचा अंदाज घेणे यात सूक्ष्म फरक आहे, हा फरक सुद्धा आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. व्यवसाय हा झालेला खर्च वसूल करण्यासाठी करत नसतात. व्यवसाय त्याचे मार्केट पोटेन्शियल बघून करायचा असतो. एखादा व्यवसाय चालत नाही आणि व्यवसायात पोटेन्शियल राहिलेले नाही या दोहोत खूप फरक आहे. हा फरक ओळखता आला पाहिजे. व्यवसायात संयम आवश्यकच आहे, पण त्याचवेळी परिस्थितीचे योग्य आकलन करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते. हा फरक लक्षात आला नाही तर या ‘थांबण्याला’ आपण ‘संयम सोडणे’ सुद्धा समजू शकतो किंवा त्याला ‘माघार घेऊन पळून जाणे’ असं सुद्धा समजू शकतो. पण असे नाही, याला स्टॉप लॉस म्हणतात. म्हणजे एक अशी मर्यादा जिथून पुढे जाण्यात तुमचं फक्त नुकसानच होणार असतं. त्या मर्यादेपुढे कधीही जायचे नाही, अन्यथा नाहक नुकसान आणि मनस्ताप होऊ शकतो.

झालेला खर्च वसूल करण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी तो वसूल करण्यासाठी जेवढा खर्च अपेक्षित आहे तो इतर चांगल्या ठिकाणी गुंतवून, दुसरा एखादा व्यवसाय सुरु करून चांगला परतावा मिळवता येईल हे आपण लक्षात घेणे आवश्यक असते. ज्यावेळी लक्षात येईल कि एखाद्या मार्केटमधून, व्यवसायातून परताव्याची शक्यता नगण्य आहे त्यावेळी त्यापासून लगेच दूर व्हा. झालेल्या खर्चाचा हिशोब करण्याऐवजी होणाऱ्या खर्चाचा हिशोब करा. होणारा खर्च वाचवून तो दुसऱ्या चांगल्या ठिकाणी गुंतवा, दुसरा एखादा व्यवसाय सुरु करा. त्या ठिकाणी तुम्हाला मिळणारा परतावा झालेले नुकसान आपोआपच भरून काढेल. आणि तुमचाही वेळ पैसा वाचवेल.

आपण व्यवसाय करत असताना, अनुभवाचा अभाव म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे, अशा काही चुका करतो कि त्यामुळे आपला वेळ पैसे वाया जातोच पण आपण काही वर्षे मागे जातो… व्यवसायातील घोडचूका या लेखमालिकेमुळे व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही बऱ्याच चुका टाळण्याचा प्रयत्न कराल आणि जास्तीत जास्त योग्य पद्धतीने व्यवसाय कराल हि अपेक्षा आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!