व्यवसायाचे व स्वतःचे कोणतेही आर्थिक रेकॉर्ड नसणे
बऱ्याच जणांचा एखादा घरगुती व्यवसाय असतो. काहींचा वर्षानुवर्षांपासून व्यवसाय चालू असतो. कुणी दुकान चालवत असतं तर कुणी एखादा लघुद्योग करत असतं, कुणी स्वयंरोजगाराच्या कामात असतो तर काहींचे भविष्यात व्यवसाय सुरु करण्याचे नियोजन असते. पण हे सर्वजण एका गोष्टीत सपशेल अपयशी असतात… आर्थिक रेकॉर्ड….
स्वतःचे आणि व्यवसायाचे आर्थिक व इतर रेकॉर्ड तयार करण्याच्या कामात हे लोक पूर्णपणे ढिम्म असतात. वर्षानुवर्षे व्यवसाय असूनही कुणाच्या व्यवसायाची नोंदणी नसते. कित्येकांनी तर आपले IT Return भरलेले नसतात. कित्येकांच्या व्यवसायाचे बँकेत चालू खाते नसते. इतकी मोठी चूक केल्यावर त्याचे फळ सुद्धा तसेच मिळते. अशांची प्रगतीच्या नावाने बोंब असते. व्यवसाय चालू आहे म्हणून चालू आहे त्यात कुठलीही प्रगती होत नाही कि त्यात काही नावीन्य येत नाही. व्यवसाय वृद्धीसाठी लागणारे अर्थसहायय यांना कुठूनही उपलब्ध होत नाही, कारण यांनी आपले आणि आपल्या व्यवसायाचे कोणतेही आर्थिक व इतर रेकॉर्ड कधी तयार केलेलेच नसते.
कित्येकांना वर्षानुवर्षांचा व्यवसाय असूनही फक्त व्यवसायाचे बँक अकाउंट नाही आणि ITR भरलेला नाही म्हणून व्यवसाय वाढीसाठी पाच पन्नास हजाराचे कर्ज सुद्धा मिळत नाही. बँक अशांना दारात सुद्धा उभे करत नाही. चालू असलेल्या व्यवसायांनाही मुद्रा कर्ज न मिळण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. काहींनी तर व्यवसायाची नोंदणी सुद्धा केलेली नसते. अशांना कायद्याच्या नजरेत बेरोजगार म्हणूनच ओळखले जाते. कुणाला भविष्यात व्यवसाय करायचे असतो तर आत्तापासूनच त्याची तयारी करावी याचेही भान नसते. किमान आपले आर्थिक रेकॉर्ड चांगले ठेवण्यासाठी तरी आपला IT Return दार वर्षी भरावा असाही कुणी विचार करत नाही.
बँकेत करंट अकाउंट उघडण्यात काय प्रॉब्लेम आहे हे अजूनही मला कळलेले नाही. ITR भरण्याचा एवढा तिटकारा का आहे हे कळत नाही. कित्येकांनी तर आपला PAN सुद्धा काढलेला नसतो. अशावेळी व्यवसायासाठी बँक कर्ज देत नाही यात बँकेची काय चूक? बँक काय सोशल वर्क करणारी संस्था नाही. त्यांच्यासमोर जेव्हा तुम्ही नवीन व्यवसायासाठी, चालू असलेल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी कर्ज मागायला जाता त्यावेळी ते आधी तुम्ही आर्थिक दृष्ट्या किती साक्षर आहात हेच पाहतात. तुमचा एखादा व्यवसाय चालू असेल तर त्यामध्ये तुम्ही किती नियोजनबद्धरितीने काम करता हे पाहतात. वाढत्या NPA मुळे आता बँक कर्ज मिळविणे सोपे काम राहिलेले नाही. कर्ज वसूल न झाल्यास बँक मॅनेजर वर कारवाईची टांगती तलवार असते त्यामुळे जोपर्यंत तुमच्याविषयी पूर्ण खात्री पटत नाही तोपर्यंत बँक तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. तीन चार वर्ष चाललेल्या व्यवसायासाठी बँक रेकॉर्ड आणि वैयक्तिक आर्थिक रेकॉर्ड उत्तम असेल तर कोणतीही बँक डोळे झाकून कर्ज देते. पण आपण आपले रेकॉर्ड इतके खराब केलेले असते कि बँक काय कुणीही आपल्याला पाच रुपयाची सुद्धा मदत करणार नाही. तुम्हाला हवे असलेले कर्ज खुजे वाटावे इतका तुमचा आर्थिक डोलारा मोठा दिसला पाहिजे.
व्यवसायात आर्थिक तसेच इतरही रेकॉर्ड तयार न करण्याची घोडचूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. असल्या चुका करू नका. या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा…
१. तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्याची नोंदणी करून घ्या. आवश्यक त्या सर्व कागदांची पूर्तता करून घ्या
२. PAN काढलेला नसेल तर लगेच काढून घ्या.
३. व्यवसायाचे, बँकेत करंट अकाउंट उघडा. त्यातूनच सगळे व्यवहार करा. जास्तीत जास्त डिपॉजिट होतील याची काळजी घ्या. प्रत्यक्ष व्यवहार कसाही असो, बँक ट्रान्झॅक्शन मधे भरपूर उलाढाल दिसली पाहिजे. स्वतःच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये सुद्धा चांगली उलाढाल करत राहा.
४. तुमचा IT Return दार वर्षी फाईल करा. ITR साठी तुमचा एखादा व्यवसायच असला पाहिजे असा काही नियम नाही. ITR कुणीही भरू शकतं. तो फक्त तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा खर्च आर्थिक ताळेबंद असतो. पण त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे याची माहिती समोरच्याला मिळत असते.
५. शक्य झाल्यास दरवर्षी एक दोन हजार रुपये कर भरा. दरवर्षी NIL रिटर्न भारत असाल तर बँक तुम्हाला आर्थिक दृष्ट्या कमजोर समजू शकते.
६. शेती असेल तर शेतीचे उत्पन्न जेवढे जास्त दाखवता येईल तेवढे जास्त दाखवा, पण सोबतच तुमच्या व्यवसायातूनही चांगले उत्पन्न दाखवा. काही वेळेस उत्पन्न कमी असले तरी प्रत्यक्षात ITR भरताना त्यापेक्षा जास्त दाखवा. तुमचा व्यवसाय आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या एकदम भक्कम आहात हेच तुमच्या ITR मधून दिसले पाहिजे.
७. पैशाचा ओघ चांगला असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत राहा.
८. वयाच्या १६-१७ वर्षांपासून ITR भरला तरी हरकत नाही. तुमची लहान मुले असतील तर त्यांचा वयाच्या १५-१६ वर्षापासूनच ITR भरायला सुरु करा.
९. कोणत्याही परिस्थितीत CA कडूनच रिटर्न फाईल करून घेत जा. CA कडून वेळोवेळी सल्ला घेत राहा. भविष्यातील प्लॅन वर सतत चर्चा करत राहा. यामुळे CA ला तुम्हाला कशा प्रकारे आर्थिक सक्षम करायचे आहे किंवा दाखवायचे आहे याचा अंदाज येत राहतो, आणि त्यानुसार ते तुम्हाला आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन करतात.
१०. बँकेचे कोणतेही चेक बाउंस होऊ देऊ नका. कोणत्याही कर्जाचे हफ्ते थकवू नका. एखादे कर्ज थकलेले असेल तर त्यातून लवकरात लवकर मुक्त व्हा. यामुळे CIBIL खराब होते आणि CIBIL खराब असेल तर कोणतेही कर्ज मिळत नाही. जिथे जिथे तुमचा PAN नोंदवलेला आहे तिथे तिथे आर्थिक बाबतीत कुठलीही चूक करू नका.
११. आजपर्यंत कोणतेही कर्ज घेतलेले नसेल तर CIBIL शून्य वा मायनस असते. चांगल्या आर्थिक रेकॉर्ड साठी CIBIL स्कोर किमान ८५० असणे आवश्यक असते. यासाठी एखादे १०-१२ हजाराचे सोने तारण कर्ज घ्या. एक वर्ष नियमित हफ्ते फेडा. हे हफ्ते चेक नेच भरले पाहिजेत. म्हणून जी बँक व फायनान्स कंपनी चेक ने हफ्ते घेते तिचेच गोल्ड लोन घ्या. एक वर्ष नियमित हफ्ते फेडा, तुमचे CIBIL एकदम चांगले झालेले असेल.
व्यवसाय करत असताना तुमचे आर्थिक समृद्धी चे रेकॉर्ड उत्तम असणे आवश्यक असते. यात होणारी लहानातील लहान चूक सुद्धा तुमच्या व्यवसायाला काही वर्षासाठी महागात पडू शकते. या चुकीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरायला सुद्धा किमान एक वर्ष जाते. आर्थिक रेकॉर्ड सारखी बाब लहान वाटत असेल पण प्रत्यक्षात खूप मोठी आहे, म्हणून यात होणारी चूक हि घोडचूक आहे.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील