लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
तुमचा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हा व्यवसायाचा नाही तुमचा दोष असतो.
तुमच्याच परिसरात तोच व्यवसाय दुसरा कुणीतरी यशस्वीपणे चालवतोय आणि तुम्ही अपयशी ठरताय यातच सर्व काही आलं. प्रत्येक व्यवसायात लाखो करोडो कमावणारे उद्योजक आहेत. मग तुम्हीच का अपयशी ठरत आहात ?
आपण एखाद्या व्यवसायात लाखो रुपये गुंतवतो पण त्यातून अपेक्षेप्रमाणे परतावा मिळत नाही याचे कारण चुकीच्या नियोजनामधे मध्ये दडलेले असते. आपण तेच तेच सरधोपट मार्ग वापरून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो, पण जो मार्ग अपयशी ठरतोय तो बदलण्याचे आपण धैर्य दाखवत नाही. अशावेळेस स्वतःचे मूल्यमापन न करता ‘नाचत येईना अंगण वाकडे’ या उक्तीप्रमाणे व्यवसायाची निवड चुकली असे बिनधास्त बोलून मोकळे होतो. पण यामुळे एक प्रकारे आपण चुका सुधारण्याची सुवर्णसंधी वाया घालवत असतो. तुमचा ब्रँड योग्य प्रकारे लोकांपर्यंत नेला तर कोणताच व्यवसाय अपयशी होऊ शकत नाही.
माझ्या पाहण्यात बरेच जण आहेत ज्यांनी एखादा व्यवसाय चालत नाही म्हणून दुसरा सुरु केला, तो चालत नाही म्हणून तिसरा व्यवसाय सुरु केला, पण परिणाम शून्य, तरीही त्यांनी स्वतःचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला नाही, कि नक्की काय चुकतंय हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही. उलट निराश होऊन नशिबाला दोष देऊन पुन्हा अपयशाच्या गर्तेत गेले.
मित्रांनो व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही म्हणून निराश होऊ नका. खालील उपाय अमलात आणा, लवकरच चांगला परिणाम दिसेल.
१. ग्राहक आपल्याकडे आकर्षित का होत नाहीये याचा विचार करा. तुम्ही चुकीच्या ग्राहकांकडे जात आहात कि ग्राहकांना हवी असलेली वस्तू / सेवा देण्यात कमी पडत आहात याचा अभ्यास करा.
२. आपण कुठे चुकतोय हे शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय पटतंय यापेक्षा लोकांना काय महत्वाचं वाटतंय हे शोधा. स्वतःला ग्राहकाच्या ठिकाणी उभे करून आपल्या व्यवसायाचे मूल्यमापन करा.
३. इतर यशस्वी उद्योजकांच्या, व्यवसायिकांच्या स्ट्रॅटेजींचा अभ्यास करा. कित्येक उद्योजकांनी अनंत अडचणींतून मार्ग काढून आपले व्यवसाय विश्व उभे केलेले असते. अशा उद्योजकांचा अभ्यास करा. सगळ्यांच्या समस्या जवळजवळ सारख्याच असतात, पण प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे त्यावर उपाय केलेले असतात. या सर्वांच्या व्यावसायिक आयुष्याचा अभ्यास करा. शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घ्या.
४. नवनवीन कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करा. उद्योजकाने नेहमी नवनवीन कल्पना राबवणे आवश्यक असते. प्रयोगशील व्यक्तिमत्वच स्पर्धेत टिकत असते. ग्राहक सतत नावीन्याच्या शोधात असतो, त्याचा शोध पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
५. पारंपारिक जाहिरातींच्या माध्यमांसोबतच नवीन माध्यमांचा वापर करा. डिजिटल, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा. सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात प्रभावी माध्यम आहे. पण जर तुमचा व्यवसाय फक्त स्थानिक परिसरापुरता मर्यादित असेल तर मात्र ग्राउंड लेव्हल मार्केटिंग सारख्या पारंपरिक मार्गांचाच जास्त वापर करणे योग्य.
६. फक्त स्वतःशीच चर्चा करू नका, जास्तीत जास्त लोकांशी चर्चा करा. तटस्थ मत व्यक्त करणाऱ्या मित्रांच्या नेहमी संपर्कात राहा. यांची मते कडवट असतील पण तुमच्या भल्यासाठी असतील. गोडबोल्यांकडून सल्ला कधीही घेऊन नका, ते फक्त तुम्हाला वाईट वाटायला नको म्हणून तुमच्या हो त हो मिसळायचे काम करतात. स्पष्टवक्त्यांशी चर्चा करा.
७. योग्य ग्राहकांपर्यंत न पोहोचणे हे व्यवसायातील अपयशाचे एक मुख्य कारण असते. तुमचा मार्केटिंग प्लॅन पूर्णपणे नव्याने तयार करा. तुमचा अपेक्षित ग्राहक कोण असेल याचा अभ्यास करा, या अपेक्षित ग्राहकांची जास्तीत जास्त यादी बनवा. प्रत्येकापर्यंत नव्याने पोहोचायला सुरुवात करा. एखादा व्यवसाय नव्याने सुरु झाल्यावर जशी सुरुवात असेल त्याच प्रकारे पुन्हा सुरुवात करा.
८. प्रोडक्ट कितीही चांगले असले तरी प्रेझेन्टेशनला महत्व असते, त्यामुळे तुमचे प्रेझेन्टेशन आकर्षक राहील याची काळजी घ्या.
९. मार्केटिंग व जाहिरातींवर खर्च करताना कचरू नका. जाहिरात केली नाही तर ग्राहकांना तुमचे उत्पादन दिसणारच नाही. योग्य तिथे जाहिरातीसाठी खर्च करताना हात आखडता घेऊ नका. परंतु उगाच कुठेही खर्च करू नका. जाहिरातीचा योग्य परतावा मिळेल अशाच ठिकाणी खर्च करा.
१०. याच व्यवसायात दुसरा यशस्वी होवू शकतो तर मी का नाही हे स्वतःलाच विचारा, विचारात सकारात्मक ऊर्जा तेवती ठेवण्याचा नेमही प्रयत्न करा.
११. तुमची देहबोली हि पराभूत मानसिकता दाखवणारी ठेऊ नका, यशस्वी व्यवसायिकाप्रमाणेच तुमचा व्यवहार असला पाहिजे. तुमची नकारात्मक मानसिकता तुमच्याच व्यवसायाला संपवण्याचे काम करत असते. तुमच्या नकारात्मक मानसिकतेचा परिणाम तुमच्या कर्मचाऱ्यांवर होत असतो आणि पर्यायाने ग्राहकांपर्यंत हि नकारात्मक ऊर्जा पोहोचत असते. त्यामुळे कितीही अडचणीत असलात तरी सकारात्मक ऊर्जा नेहमी तेवत ठेवा.
१२. स्वतःचा ब्रँड डेव्हलप करा, तुमच्या व्यवसायासाठी तुमची प्रतिमा सुद्धा महत्वाची असते. लोक तुमच्याकडे पाहून तुमच्या व्यवसायाची पत ठरवत असतात. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पहिले Brand Ambassador असता, त्यामुळे स्वतःच्या ब्रॅण्डकडे सुद्धा लक्ष द्या.
१३. तुमच्या व्यवसायाचा ब्रँड, लोगो रिफ्रेश करा, किंवा आवश्यकता असेल तर बदलूनच टाका. चांगल्या डिझायनर ची मदत घ्या.
१४. नव्याने सुरुवात केल्यासारखी जाहिरातबाजी करा. याचा मानसिक परिणाम तुम्ही आणि तुमचे ग्राहक दोघांवरही होत असतो. बराच काळ एकाच पठडीतल्या व्यवसायात अडकून पडल्यामुळे तुम्हाला मरगळ आलेली असते, आणि ग्राहकालाही. नव्याने सुरुवात हि तुम्हाला पुन्हा नवीन ऊर्जा प्रदान करते, आणि ग्राहकालाही तुमच्या ब्रँड कडे आकर्षित करते. ग्राहकाला सदैव काहीतरी नवीन हवे असते. हे नावीन्य त्यांना तुमच्याकडे आकृष्ट करते.
१५. लोकांसमोर तुमच्या व्यवसायाचे आधुनिक स्वरूप प्रकट करा. जुनाट संकल्पना,पद्धती सोडून द्या.
१६. प्रोडक्ट ची किंमत कमी केल्याने विक्री वाढत नसते, किंमत कमी करून तुमच्या ब्रँड ची पातळी खाली आणू नका. प्रोडक्ट रेट ची मार्केटमधील स्टॅंडर्ड प्रॅक्टिस काय आहे हे जाणून घ्या, त्यानुसारच त्यामध्ये बदल आवश्यक आहेत कि नाही याचा निर्णय घ्या. पण रेट कमी केल्याने ग्राहक वाढतो हा भ्रम आहे. लॉन्ग टर्म व्यवसायासाठी हा पर्याय काम करत नसतो.
१७. तुमचे विक्री प्रतिनिधी चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करा. विक्री प्रतिनिधींचे कौशल्य, अनुभव, देहबोली तुमच्या व्यवसायाला समृद्ध करत असते.
१८. सध्याच्या व्यवसायात आणखी काही प्रोडक्ट वाढवता येतील का पाहावे, ते व्यवसायाला सोडून नसावे पण सामान्य नसावे. किमान एखादे प्रोडक्ट स्पेशल म्हणून मिरवता येईल यासाठी प्रयत्न करा. उदा. तुमचे एखादे ज्वेलरी शॉप आले तर दोन चार प्रसिद्ध महाराणींच्या हारांच्या प्रतिकृती असलेले हार प्रदर्शनासाठी किंवा लिमिटेड स्टॉक म्हणून मिरवा, किंवा एखादे वेगळे नाव देऊन लिमिटेड डिझाईन असलेले दागिने मार्केटमधे उतरावा, जे इतरांकडे नसतील.
१९. दुसऱ्याची कॉपी करू नका, स्वतःचा ब्रँड डेव्हलप करा, स्वतःची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरा. कॉपी करणारे नेहमीच दुय्यम दर्जाचे समजले जातात.
२०. मोठमोठ्या उद्योजकांच्या, व्यवसायिकांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न करा, या लोकांचा १५ मिनिटे जरी वेळ भेटला तरी काहीतरी चांगले ज्ञान मिळते, जे तुम्हाला व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकते.
हे काही उपाय आहेत जे तुम्हाला व्यवसायात आमूलाग्र बदल करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. यामुळे १००% यश येईलच असे नाही, पण हे मार्ग तुमच्या व्यवसायाच्या खालावत चाललेल्या प्रकृतीला पुन्हा नवी ऊर्जा देऊ शकतील. एक एक मार्ग हळू हळू अमलात आणायला सुरुवात करा, लवकरच तुम्हाला तुमच्या व्यवसायात वाढ झाल्याचे दिसून येईल. फक्त थोडा संयम ठेवा, तात्काळ बदलाची अपेक्षा करू नका. व्यवसायात नवीन असाल तर सुरुवातीच्या काळात आर्थिक स्तरावर नफ्या तोट्याचे गणित मांडू नका. ग्राहक संख्या, मासिक उलाढाल यावर आपल्या व्यवसायाचे मूल्यमापन करा. तुम्हाला नक्कीच व्यवसायात मोठा बदल झाल्याचे लक्षात येईल. संयम बाळगा, निराश होऊ नका, सकारात्मक रहा.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
सर,
प्रथमतः आपले मनःपूर्वक आभार
मी खुप दिवसापासून आपले लेख वाचतोय आपण जे व्यावसायाबद्दल मार्गदर्शन करता खरचं खुप अनमोल आहे हे.
खुप खुप धन्यवाद
Nice
Very very thans for positive mind
Very nice can u guide me I want to start new business
आव्हाड साहेब आपले सर्वच लेख खुपच उपयुक्त व सुंदर असतात ज्याचा आम्हाला व्यवसायात खुपच उपयोग होतोय.आपली मनापासुन कृतज्ञता व आपणास खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद
श्रीकांत साहेब तुमचे प्रत्येक लेख अनमोल आहेत. तुम्हाला प्रतिसाद मिळो अथवा न मिळो माञ मार्गदर्शन कायम चालू ठेवावेत जरी पुढे चालून तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी पण ही विनम्र विनंती…धन्यवाद 🙏😊👍👍
खरंच आहे, अनमोल मार्गदर्शन. या अशा विचारांना नेटवर म्हणावा तितका रिस्पॉन्स भेटत नाही, हे बघून दुःख वाटत. पण वैक्तिक आयुष्यात मला खूप मदत झाली आहे.
Dear sir your all lessons and posts are very nice and informative keep it up.
तुमचे लेख मार्गदर्शक आहेत, यामुळे व्यवसायांत बदल करता येतो, व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने बघून ती कसा वाढवावा याचे मार्गदर्शन मिळते.. Thanku
Very Nice… article
छान माहिती दिलीत सर…. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
सर्वांना समजेल अशा सध्या पद्धतीने खूप उपयुक्त माहिती दिली आहे…
धन्यवाद !
make money from the Meesho
तुम्ही नेहमी उद्योजक साठी मेसेजेस करता तसेच एखादा मेसेज डॉक्टर या व्यवसाय साठी सुद्या काही उपाय सुचवा