‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
काही महिन्यांपूर्वी बालाजीला (गावाचे नाव तिरुमला आहे) गेलो होतो. मार्केटमध्ये फिरताना एक दुकानांची रांग बघायला मिळाली. या पोस्ट सोबत इमेजमधे दिसत आहे तीच रांग. किमान २५०-३०० दुकाने असतील. (तिरुमला मधील सर्व दुकाने हि शासकीय मालकीची आहेत.) प्रत्येक दुकान चार फूट रुंद आणि आठ फूट लांब असेल. म्हणजे फक्त ३०-३५ चौ.फु. दुकाने होती सगळी. कोणत्याही दुकानात पंधरा वीस हजारपेक्षा जास्त रकमेचा माल नसेल. सगळ्या दुकानांचे निरीक्षण केल्यावर लक्षात आले कि सगळी दुकाने जवळजवळ सारखीच आहेत. जास्तीत जास्त १०-१२ प्रकारची दुकाने होती. दोन तीन दुकाने सोडून पुन्हा त्याच प्रकारचे दुकान दिसत. सगळ्या दुकानांची ठेवण सारखीच, सजावट सारखीच, आणि मार्केटिंग ची पद्धतही सारखीच होती.
४ x ८ च्या दुकानात काय धंदा होत असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, नाही ? पण हे दुकानदार दररोज प्रशासनाला रु.१०००/- भाडे देतात… हो, दिवसाला एक हजार रुपये. म्हणजे महिन्याला ३० हजार रुपये भाडं फक्त तीस चौ.फु. दुकानासाठी. तिरुमला मध्ये दिवसाला लाखभर पर्यटक येतात, त्यामुळे धंदाही तेवढा मोठा आहे. पण तरीही दिवसाला हजार रुपये भाडं हे दुकानदार देतात म्हणजे सगळं जाऊन यांना दिवसाला निव्वळ नफा किमान २००० रु तरी मिळत असेलच. दहा पंधरा हजाराच्या गुंतवणुकीतून एवढा नफा कसा मिळत असेल यांना ? एवढं ग्राहक कसं मिळत असेल ? याच कारण होत त्यांनी नियोजनपूर्वक मार्केट तयार केलं होतं.
मार्केट तयार करणे म्हणजे काय ?
मी कधीही पुस्तकी व टेक्निकल माहिती देण्याच्या फंद्यात पडत नाही. सोप्या भाषेत मार्केट तयार करणे म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू घ्यावीशी वाटेल तेव्हा लगेच ते कुठे मिळेल याची त्याच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली पाहिजे यापद्धतीने नियोजन करणे.
तिरुमालामध्ये त्या दुकानदारांनी तयार केलेलं मार्केट खूप सुंदर होते. एकदा फोटो पहा, अतिशय चमकदार आणि आकर्षक असे मार्केट तुम्हाला दिसेल. प्रत्येक दुकानाबाहेर दुकानात पांढरे आणि पिवळे ब्लब सजावटीसारखे लावलेले होते. रंगीबेरंगी कपडे, लाइटिंग च्या फोटो फ्रेम, वेगवेगळ्या डिझाईनच्या टोप्या, मुर्त्या, देवा धर्माच्या गोष्टी, इतर खरेदी अशा प्रकारे सजवली होती कि ते मार्केट लगेच नजरेत भरायचे. रस्त्याने चालताना सहज नजर गेली तरी तुमची पावले नकळत त्या मार्केट कडे वळली पाहिजेत अशा प्रकारे त्यांनी सजावट केली होती. छान लेन आहे, कामाचे काहीतरी नक्कीच मिळेल, चक्कर मारायला काय हरकत आहे असा विचार करून तुम्ही तिथे जातातच. नियोजनबद्धपणे ते मार्केट तयार केले होते. इथे खूप महत्वाचे नाही पण कामाचे काहीतरी नक्कीच भेटेल असंच तुम्हाला वाटेल असं ते मार्केट होतं. आणि गुंतवणूक किती तर १५-२० हजाराच्या पुढे नक्कीच नाही. यात एकीची ताकद सुद्धा महत्वाची आहे. सर्वांनी मिळून एकमेकांवर कुरघोडी न करता आपापले व्यवसाय सांभाळले, आणि एकमेकांना सहकार्य केलं कि असे मार्केट तयार करणे अवघड जात नाही.
अशाच प्रकारे काही मार्केट इतर ठिकाणी सुद्धा आहेत, किंवा आपल्या शहरातही तुम्हाला सापडतील. पुण्यातील तुळशी बाग हे अशा प्रकारच्या मार्केटसाठी चांगले उदाहरण आहे. किंवा पुण्यातल्या कॅम्प मधील काही ठिकाणे अशाच प्रकारच्या मार्केटसाठी ओळखले जायचे. डेक्कन ला सुद्धा सौंदर्य प्रसाधनांची, क्राफ्ट्स, गिफ्ट्स ची एक लेन आहे. आपल्या शहरात सुद्धा अशीच काही मार्केट असतात. लोखंडाशी निगडित माल घ्यायचा म्हटलं कि एखादी गल्ली आठवते, कापड बाजार असतो, सराफ लेन असते… अशी विविध मार्केट्स आपल्या गावात शहरात सापडतात.
तिरुमलातले हे मार्केट होते जनरल वस्तूंचे. पण सर्वांना एका साच्यात घेता येईल अशा प्रकारचे. किमान फिरून काहीतरी टाईमपास करता येईल अशा प्रकारचे. टाईमपास करता करता काहीतरी खरेदी होईल अशा प्रकारचे.
अगदी मॉल हेसुद्धा याच प्रकारचे मार्केट आहेत. तुम्ही फक्त खरेदीसाठी मॉल मधे जात नाही. तर फिरण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी, काहीतरी खाण्यापिण्यासाठी जाता, आणि यासोबत खरेदीसुद्धा करता.
आता काही प्रोडक्ट नुसार मार्केट चा विचार करू
याच प्रकारे इतर प्रोडक्टस कडे पाहता कपड्यांचे मार्केट एक प्रत्येक शहरात सापडते. कपडे घ्यायचे म्हटले कि तुम्हाला लगेच कापड बाजार आठवते. कारण? तिथे भरपूर दुकाने असतात. तुम्हाला चॉईस ची संधी असते. एखाद्या ठिकाणी अपेक्षित कपडे नाही भेटले तरी लगेच शेजारच्या शॉप मध्ये जायची संधी असते. या व्यापाऱ्यांनी सुद्धा नियोजनपूर्वक आपले मार्केट तयार केलेले असते. हे व्यापारी एकमेकांना स्पर्धक समाजात नाहीत, तर सहकारी समजतात. अगदी यांनी ठरवले तर सहा महिन्यात दुसऱ्या ठिकाणी असेच मार्केट तयार करू शकतात.
उदाहरण घ्या. एखादा व्यापारी एखाद्या परिसरात कपड्याचे दुकान सुरु करतो. आठवड्याभरात तो तिथे आणखी एका व्यापाऱ्याला कपड्याचे दुकान टाकायला सांगतो. महिनाभरात त्याच परिसरात आणखी ४-५ दुकाने येतील अशी व्यापस्थ केली जाते. आणि सहा महिन्यात तिथे कपड्याची इतकी दुकाने होतात कि तुमच्या डोक्यात कपड्यांचे मार्केट म्हणून त्या परिसराची प्रतिमा घट्ट बसते. हे व्यापारी एकमेकांना सहकार्य करतात. एकमेकांना काही कमी पडले तर मदत करतात. पण त्या परिसरात आलेले गिऱ्हाईक बाहेर जाणार नाही याची काळजी घेतात. त्यांनी त्यांचे मार्केट तयार केलेले असते. तुम्हाला वाटते ते नकळत बनले, पण ते नियोजनपूर्वक केलेले असते.
अशाच प्रकारे गेल्या काही वर्षात फर्निचरच्या दुकानांचे मार्केट तयार होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आधी एक दुकान सुरु होते. कालांतराने त्यात हळूहळू भर पडून तिथे एक दुकांची रांगच तयार होते. साहजिकच भरपूर ऑप्शन आहेत म्हणून तुम्ही तिथेच जातात.
सेकंड हँड गाड्यांचे मार्केट सुद्धा याच प्रकारे नियोजनपूर्वक तयार केले जाते. प्रत्येक शहरात तुम्हाला अशा प्रकारचे मार्केट सापडतील.
जिथे निवडीच्या भरपूर संधी आहेत तिथे ग्राहक जातोच. यालाच मार्केट म्हटलं जातं, आणि हे मार्केट नियोजनपूर्वक तयार केलं जातं.
तुम्ही ३०-४० जण मिळून जर काही व्यवसाय करू इच्छित असाल तर करा असा प्रयत्न. गुंतवणूक क्षमता कमी असेल तर काही सर्वसाधारणपणे चालणारे प्रोडक्ट निवड, किंवा जनरल मार्केट मधे विचार करा. एखादी चांगल्या लोकेशन ला मोकळी जागा पहा, शेड बांधा, ५०-६० लहान लहान दुकाने सुरु करा. लोकांना किमान टाईमपास म्हणून तरी चक्कर मारायला प्रवृत्त करा. लोकांना तिथे आल्यावर चांगला टाईमपास होईल याची व्यवस्था करा. विक्रीच्या दुकानांसोबतच खाद्यदुकाने सुद्धा सुरु करा. लोक टाईमपास करायला यायला लागतील, सोबतच खरेदीही करतील, कालांतराने खास खरेदीसाठी सुद्धा येतील…. तुमचं मार्केट नियोजनपूर्वक तयार झालेलं असेल. आपल्याकडे तिरुमला सारखा मोठा ग्राहक वर्ग नसला तरी यातून चांगले उत्पन्न नक्कीच मिळू शकते. कारण अशा प्रकारच्या रिटेल मार्केटमधे १० रुपयाची वस्तू ५० रुपयाला सहज विकली जाते. हे मार्केट बार्गेनिंगचे असले, तरी प्रॉफिट रेशो चांगला असतो.
किंवा मोठ्या व्यवसायाचे तुमचे लक्ष्य असेल, तर किमान १०-१२ जणांनी एकत्र नियोजन करा. एखादा एरिया निवडा, आधी एकाने व्यवसाय सुरु करा, हळूहळू वाढ करा, सहा महिन्यात तुमचा परिसर तुमच्या प्रोडक्ट साठी मार्केट तयार झालेले असेल.
मार्केट बनवणे अवघड नाही
फक्त काही प्राथमिक नियम पाळा
नियोजनपूर्वक सुरुवात करा
योग्य प्रोडक्ट ची निवड करा
एक रहा, एकीची ताकद ओळखा
इतरांना स्पर्धक नाही सहकारी समाज
इतर व्यवसायिकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करा
एकमेकांना मदत करा
परफेक्ट मार्केटिंग करा
तुमचं मार्केट तयार होईल…
यात आणखी एक महत्वाचे म्हणजे पैसा फिरत राहील याची दक्षता घ्या. जुना माल लवकरात लवकर जाऊन नवीन माल दुकानात येईल यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक असते. लहान लहान दुकानात दुकानदार बार्गेनिंग करायला नकार देत नाहीत ते यामुळेच. त्यांचं उद्दिष्ट पैसा फिरत ठेवणं असतं. म्हणजेच जुना माल जमेल तेवढं बेहरे काढून नवीन खरेदी करत राहणे. यामुळे कमी गुंतवणुकीत जास्त उलाढाल होते आणि सतत नवीन मलामुळे ग्राहकांनाही प्रसन्न वाटते, ज्याचा परिणाम चांगल्या विक्रीवर होतो.
मार्केट आपोआप बनण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. आता मार्केट नियोजनपूर्वक तयार केलं जातं. हे मार्केट तयार करण्याचं काम कुणीही करू शकत. फक्त आपण व्यावसायिकांनी एकमेकांना स्पर्धक न मानता सहकारी मानलं पाहिजे.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Group Business nice
Good thinking sir