एका वाचकाने एका हॉटेल फूड घरपोच सेवा देणाऱ्या एका कंपनीचा बिझनेस प्लॅन कसा असतो यासंबंधी विचारणा केली होती. एखाद्या कंपनीबद्दल थेट त्यांचे नाव घेऊन माहिती सांगणे योग्य होणार नाही, त्यापेक्षा हा व्यवसाय कसा चालतो यासंबंधी थोडक्यात सांगणे योग्य होईल, म्हणून फक्त त्या कंपनीचा बिझनेस प्लॅन न पाहता आपण हा व्यवसाय कसा चालतो ते पाहणे इष्ट.
हॉटेल मधील पदार्थ ग्राहकांना घरपोच पुरविणे हा मागील काही वर्षात चांगल्या प्रकारे लक्ष वेधून घेणारा व्यवसाय ठरत आहे. मोठमोठे ब्रॅण्ड्स यात उतरले आहेत. पण त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजि, जाहिरातीवर करत असलेला खर्च पाहता यांना हा व्यवसाय कसा परवडतो, आणि हा व्यवसाय कसा चालवला जातो असा प्रश्न कित्येकांना पडतो.
पण हा व्यवसाय बिलकुल अवघड नाही. हे मोठे ब्रँड्स मार्केटमधे असले तरी त्यांचे लक्ष्य फक्त मोठी शहरे आहेत. पण लहान शहरातही या व्यवसायाला संधी आहे. आणि मोठ्या शहरात ते असले म्हणून आपल्याला ग्राहक मिळणार नाही असेही नाही. कारण या व्यवसायात ब्रँड पेक्षा सर्व्हिस ला आणि गुणवत्तेला महत्व दिले जाते.
या व्यवसायाची संकल्पना अगदी साधी सोपी आहे. यामधे शहरातील काही हॉटेलांशी टाय-अप केले जाते, व यापैकी ग्राहकांना ज्या हॉटेलमधील पदार्थ हवे आहेत, त्या हॉटेलमधून ते पदार्थ घेऊन ग्राहकांना घरपोच पुरविणे असा हा व्यवसाय आहे. हॉटेलचालकांकडून बिलाच्या रकमेवर १०-३०% पर्यंत कमिशन घेतले जाते, व सोबतच ग्राहकांकडून बिल रकमेसोबतच घरपोच डिलिव्हरी साठी काही पैसे आकारले जातात. मोठ्या ऑर्डरला काहीवेळेस डिलिव्हरी मोफत सुद्धा दिली जाते. कंपनीचे, हॉटेल चालकांकडून मिळालेले कमिशन व ग्राहकांकडून मिळालेला डिलिव्हरी चार्ज हे दोन उत्पन्नाचे मुख्य स्रोत असतात.
हा या व्यवसायाचा सामान्यपणे असलेला प्लॅन. यात प्रत्येक कंपनी आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त असे बदल करत असते.
>> ज्या कंपन्यांना भरपूर ऑर्डर मिळत असतात त्या कंपन्या ग्राहकांना फूड डिलिव्हरी मोफत सुद्धा देतात.
>> काही कंपन्या त्रयस्थ व्यक्तींना डिलिव्हरी साठी जॉईन करून घेतात, एखाद्या फ्रिलान्सर प्रमाणे हे काम चालते. यामधे त्यांना त्यांच्या वेळेनुसार कंपनीसाठी डिलिव्हरीचे काम करता येते. कंपनी त्यांना, त्यांनी निवडलेल्या भागातील हॉटेलमधील ऑर्डर असेल तर त्यांना ऑर्डर पास करते, व संबंधित व्यक्ती ते पदार्थ ग्राहकाला घरपोच नेऊन देतात. यामधे त्यांना डिलिव्हरी चार्ज मिळतो सोबतच कंपनीकडून बिल रकमेवर काही कमिशनही मिळते.
>> काही कंपन्यांनी आपले स्वतःचेच किचन, पण एखाद्या हॉटेलच्या नावाने, सुरु केलेले आहेत. काही वेळेस ग्राहक हॉटेलचे नाव न सांगता जनरल ऑर्डर देतो. अशावेळी या कंपन्या आपल्याच किचनमधून ग्राहकाला पदार्थ डिलिव्हरी करतात. हि पद्धत चांगली आहे, पण काही मोठ्या ब्रँड्स नि यामधे ग्राहकांची फसवणूक केल्याचे लक्षात येत आहे. ग्राहकाने हॉटेलचे नाव सांगूनही कंपनी आपल्या किचनमधीलच पदार्थ पोहोच करत असल्याचे समोर आले आहे. हि प्रॅक्टिस जास्त नफा देणारी असली तरी तुमची विश्वासार्हता संपवणारी आहे, त्यामुळे अशा प्रलोभनांपासून दूर राहा.
>> सर्व कंपन्यांनी आपले App तयार करून घेतलेले आहे. यात टाय-अप असलेल्या सर्व हॉटेलचे मेनू कार्ड असते. ग्राहक App वर जाऊन आपली ऑर्डर देऊ शकतो, तसेच लगेच पेमेंट करू शकतो.
>> यात तुम्ही आणखी काही संकल्पना राबवू शकता, जसे कि ग्राहकाने १२ तास आधीच ऑर्डर देऊन ठेवणे, व तुम्ही त्याने दिलेल्या वेळेला बरोब्बर पदार्थ पोहोच करणे, किंवा दिवसाचे फूड पॅकेज देणे ज्यात सकाळचा नाश्ता, दुपार व संध्याकाळचे जेवण असेल ई. अशा काही संकल्पनांना तुम्ही मार्केटमधे उतरवू शकता.
या व्यवसायाला सुरु करणे अवघड नसले तरी मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी भरपूर खर्च येतो, त्रासही होतो आणि ब्रॅण्ड मार्केटमधे पसरायला बराच वेळ लागतो. याची मात्र तयारी असली पाहिजे. लोकांना तुमचा ब्रँड माहित होण्यासाठी किमान सहा महिने ते एक वर्ष लागू शकते. अशावेळी किमान एका डिलिव्हरी बॉय चा खर्च तुम्हाला अंगावर घ्यावाच लागतो. सोबतच सतत जाहिरात करावी लागते. हा खर्च कमी होऊ शकत नाही. सुरुवातीला डिलिव्हरीचे काम आपण स्वतःच केले तर मात्र महिन्याचे दहा बारा हजार सहज वाचू शकतात. तुम्ही आत्ताच व्यवसायात उतरत असाल तर स्वतः फूड डिलिव्हरी करायला तुम्हाला काहीच हरकत नसावी. जाहिरातीसाठी बऱ्याच मार्गांनी प्रयत्न करावे लागतात. रेडिओ, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, स्पॉन्सरशिप अशा विविध मार्गांनी सतत नियोजनात्मक जाहिरात करून ग्राहकांच्या डोक्यात आपला ब्रँड घट्ट बसवावा लागतो.
यात फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला चांगला ड्रेसकोड असावा. ग्राहकाला पदार्थ गरम मिळण्यासाठी डिलिव्हरी करणाऱ्याकडे हॉट-बॅग असली पाहिजे. डिलिव्हरी साठी जास्तीत जास्त तीस ते पंचेचाळीस मिनिटेच लागली पाहिजे. अशा काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
एकदा सेट झाल्यावर आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा व्यवसाय चांगला आहे. उदाहरणादाखल एका अहमदनगर सारख्या चार साडे चार लोकसंख्येच्या शहराचा जरी विचार केला, तर वर्षभरानंतर दिवसाला किमान चाळीस ऑर्डर जरी मिळाल्या तर सरासरी ४०० रुपये बिलाचा हिशोब करता दिवसाला १६००० ची उलाढाल होऊ शकते. यावर १५% कमिशन चा विचार करता दिवसाला किमान दोन अडीच हजार रुपये शिल्लक राहू शकतात. यातून जाहिरात, डिलिव्हरी बॉय व इतर यांचा खर्च किमान ५०% पकडावा. ऑर्डर देऊन नंतर रद्द करण्याचे, किंवा खोटी ऑर्डर देण्याचे प्रमाण अर्धा टक्का सुद्धा नाही, त्यामुळे याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. दिवसाला येणाऱ्या ऑर्डर दिवसेंदिवस वाढतच जाणार असतात. कारण घरपोच सेवा हि ग्राहकांना लागणारी सवय आहे. एकदा तुमच्या सेवेची ग्राहकांना सवय झाली ते कायमचे तुमचे ग्राहक बनतात. सोबतच आणखीही ग्राहक तुम्हाला जोडून देतात.
घरपोच फूड डिलिव्हरी हा सध्या मार्केटमधे चांगला जोर धरत असलेला व्यवसाय आहे. सध्याच्या कंपन्या फक्त मोठी शहरेच टार्गेट करत असली तरी लहान लहान शहरातही व्यवसायाला चांगले मार्केट आहे. या कंपन्या या लहान शहरात येईपर्यंत तुम्ही सुरुवात केली तर जास्त उत्तम, कारण मार्केटमधे पहिले येणाराच सर्वोत्तम ब्रँड म्हणून ओळख मिळवत असतो. आणि मोठ्या शहरातही या कंपन्या तुमच्या स्पर्धक होऊ शकत नाही, कारण या शहरांची लोकसंख्याच इतकी आहे कि यातला पाव टक्का जरी ग्राहक वर्ग तुम्ही जोडला तरी खूप मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. व्यवसायाच्या शोधात असाल तर हि तुमच्यासाठी चांगली संकल्पना होऊ शकते.
धन्यवाद
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
All rights ae reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील