‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
राज्यभरात मोठमोठ्या शहरांच्या परिसरात, रस्ते विकासकामांत किंवा इतर प्रकल्पात ज्यांनी ज्यांनी आपल्या जमिनी भरमसाठ पैसे घेऊन विकल्या आहेत, त्यापैकी ७० टक्के पेक्षा जास्त लोकांची आज अवस्था वाईट आहे.
महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील हि परिस्थिती सारखीच आहे. जिथे जिथे शहराजवळ विकास होत आहे, MIDC सॅंक्शन होत आहेत, रस्त्यांसाठी अधीग्रहण होत आहे, तिथे तिथे जमीन मालक काही काळासाठी प्रचंड श्रीमंत होताना दिसत आहेत, पण दहा वर्षाच्या कालावधीतच हे चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे. दहा वर्षापूर्वीचे पैशाच्या राशीत खेळणारे आता घरखर्चासाठी उधाऱ्या मागत फिरताना दिसत आहेत.
याच सर्वात मोठं कारण आहे अर्थसाक्षरतेच अभाव… आर्थिक साक्षरतेचा प्रचंड अभाव आपल्या दिवाळखोरीला कारणीभूत ठरत आहे.
जमीन विकायची नसते, राखायची असते… खरंय ना… कारण जगात काहीही वाढू शकतं, पण जमीन वाढू शकत नाही. पण काही वेळेस जमिनी विकाव्याच लागतात. अशावेळी या जमिनी विकून आलेला पैसा कसा वापरायचा, त्याचे नियोजन कसे करायचे, कुठे गुंतवायचा, किती खर्चायचा, किती वापरायचा याच कोणतंतरी नियोजन आपण केलेलं असतं का? मुळात, असं काही नियोजन असतं का, हाच आपल्याला मोठा प्रश्न पडेल…
आपण दिसणाऱ्या श्रीमंतीला महत्व देतोय, आणि असणाऱ्या श्रीमंतीला विसरतोय हि आपली सर्वात मोठी घोडचूक ठरत आहे.
जमिनी विकून हाती पैसा आला म्हणजे श्रीमंती आली असा एक मोठा भ्रम समाजमनात पसरलेला आहे. जमिनी विकून श्रीमंती येतंच नाही. फक्त आपल्या अचल संपत्तीचे रूपांतर चल संपत्तीत झालेले असते इतकाच बदल होत असतो. जमीन विकण्यापूर्वी तुम्ही जेवढे श्रीमंत असता, तेवढेच तुम्ही जमीन विकल्यानंतर असता. उलट आपल्या चुकांमुळे आपण जमीन विकल्यानंतर श्रीमंती दाखवण्याच्या मागे लागून आपली वाटचाल गरिबीकडे करत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. जमीन विकून आलेल्या पैशाचा वापर करून आणखी पैसा निर्माण केला तरच श्रीमंती येऊ शकते.
काय करावं? जमिनी तर विकाव्याच लागणार आहेत. मग आलेल्या पैशाचं नियोजन कसं करावं?
याची उत्तरं थोडक्यात पाहुयात…
- सर्वात महत्वाचे म्हणजे रोख पैसा आला म्हणजे आपण श्रीमंत झालो हा भ्रम दूर करावा. तुम्ही कालच्याएवढेच आज श्रीमंत आहात उलट आता गरीब होण्याची शक्यता जास्त आहे हे लक्षात घ्या.
- जमीन विकून आलेला पैसा लगेच कुठेतरी गुंतवून ठेवा. अगदी त्यातला रुपया सुद्धा खर्च करायचा नाही हे ठरवून घ्या. खूपच झालं तर जास्तीत जास्त ५% रक्कम काही महत्वाच्या कामांसाठी खर्च करू शकता. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला समृद्धी महामार्गाचे सहा सात कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांना स्पष्टपणे सांगून ठेवले आहे कि हा पैसा लगेच कुठेतरी गुंतवा. या पैशातून शहराजवळ शेतजमीन, शहरात फ्लॅट, शॉप, घेऊन ठेवा. अति निकड असेल तरच थोडाफार पैसा खर्च करा. पण तो आलेल्या पैशाच्या ५% पेक्षा किंवा दहा वीस लाखापेक्षा जास्त नसावा.
- जमीन विकून आलेला पैसा हा तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची सुवर्णसंधी आहे हे लक्षात घ्या. हा पैसा अशा ठिकाणी गुंतवा कि तेथून तुम्हाला कायमस्वरूपी उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. हि गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवत राहा.
- चांगल्या लोकेशनला एक दोन शॉप किंवा फ्लॅट घ्या, ते भाड्याने द्या.
- एखादा लहानसा व्यवसाय सुरु करा, सेल्स चा अनुभ नसेल तर शक्यतो रिटेल व्यवसाय सुरु करावेत, वर्षभरानंतर व्यवसायाचा चांगला अनुभव आल्यानंतर त्यात थोडी गुंतवणूक वाढवून व्यवसाय वाढावा, हा वर्ष दोन वर्षाने गुंतवायचा पैसा तोपर्यंत FD करून ठेवा.
- काही पैशाचे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवा, फक्त या शेअर्स कडे पुढचे दहा वर्षे ढुंकूनही पहायचे नाहीये हे लक्षात ठेवा, याचा डिव्हीडंड तुम्हाला दरवर्षी काही ना काही उत्पन्न देत राहते. काही पैसा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवून ठेवा.
- काही माहितीतल्या व्यवसायात गुंतवणूक करा, त्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळत राहील.
- शहराजवळ काही प्लॉट घ्या. त्यांचे भाव वाढत जातील. शक्य झाल्यास शेतजमीन घेण्याचा प्रयत्न करा. शहराजवळ किंवा बागायत असलेली शेतजमीन कधीही चांगली. अचानक गरज पडल्यास चांगला पैसा मिळतो.
- गावातल्या स्पर्धेपासून अलिप्त राहा. एकमेकांना मागे टाकण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ नका. इतर कुणी घरासाठी, गाड्यासाठी खर्च करत असतील तर त्यांना टक्कर देण्यासाठी तुम्ही खर्च करू नका. त्यांना आत्ता त्यांची श्रीमंती दाखवू द्या, तुम्ही दहा वर्षानंतर आजच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त श्रीमंत होण्याचे नियोजन करत राहा.
- राजकारणापासून दूर रहा. राजकारण करायचेच असेल तर या पैशातून करू नका. त्यासाठी आधी पैसा मिळण्याचे स्रोत उभे करा आणि त्यातून हवं तर राजकारणासाठी खर्च करा. पण जमीन विकून आलेला पैशातून रुपयाही वायफळ गोष्टींवर खर्च करायचा नाही हे लक्षात ठेवा.
- हौस मौज हि कायम मिळत राहणाऱ्या पैशातून करायची असते. जमीन विकून आलेल्या पैशातून नाही हे लक्षात ठेवा.
- इतर जण पैशाच्या राशीत खेळत असताना, तुम्ही तो पैसा कुठेतरी गुंतवण्याचा भानगडीत पडून आपली हौस करण्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही याचे वाईट वाटू शकते, पण थोडा काळ गरिबी दिसल्याने तुम्ही गरीब होत नाही, उलट तुम्ही तात्पुरत्या श्रीमंतीच्या मागे न लागत कायमस्वरूपी श्रीमंतीसाठी साखरपेरणी करत आहात हे लक्षात असू द्या.
- आणि जर यातलं काहीच शक्य नसेल तर सरळ सगळं पैसा बँकेत फिक्स डिपॉजिट करा. वर्षाला ६-७% व्याज मिळालं तरी तो खूप पैसा होतो. यातूनही तुम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत राहील, अपेक्षित असलेल्या श्रीमंतीकडे तुम्ही गेला नाही तरी यातूनही चांगलं राहणीमान तुम्ही घडवू शकता. साधं उदाहरण घ्या, एखाद् कोटी रुपये जर फिक्स डिपॉजिट केले तर ६% व्याजदराने वर्षाकाठी सहा लाख रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला ५० हजार झाले. चांगले राहणीमान जगण्यासाठी हि रक्कम सुद्धा भरपूर आहे.
- एक महत्वाचे म्हणजे, तुमच्याकडे इतका पैसा आला कि तुम्हाला तो पैसा कुठे गुंतवायचा याचे सल्ले देणारे भरपूर भेटतील. पण कुणाचेहि सल्ले न ऐकता तुम्ही स्वतःच योग्य अभ्यास करून निर्णय घ्या. कुणाच्याही सांगण्याने निर्णय घेऊ नका. नाहीतर पुन्हा मागचे मागचे पाढे पन्नास…. अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्या, पण कुणाच्याही मागे मेंढराप्रमाणे जाऊ नका.
- आलेला एक न एक रुपया कुठेतरी गुंतवायचा आहे एवढं एकंच लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार नियोजन करायचं. हि गुंतवणूक वर सांगितलेल्या मार्गांपेक्षा वेगळीही असू शकते. पण हा पैसा कुठेतरी गुंतवलाच गेला पाहिजे हे मात्र नक्की करायचं.
या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्यावर योग्य अंमलबजावणी केली तर नक्कीच आलेला पैसा संपण्याऐवजी वाढण्याची सुरुवात होऊ शकते. पण जर तो पैसा खर्च करण्याच्या मागे लागलात तर औटघटकेच्या श्रीमंतीच्या मोहापायी कायमची दिवाळखोरी नशिबी येऊ शकते.
जमिनी विकून कुणीही श्रीमंत होत नसतं. जमिनी विकून आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला, योग्य नियोजन केले तर हि आपल्यासाठी श्रीमंतीकडे वाटचाल करण्याची एक सुवर्णसंधी आहे. या संधीच सोनं करा. या दिवाळखोरीच्या पॅटर्नपासून वाचायचे असेल तर संपत्तीचे रूपांतर पुन्हा संपत्तीतच झाले पाहिजे हा नियम काटेकोरपणे आपण पाळायला हवा. अर्थसाक्षरता म्हणजे काही जगावेगळं तत्वज्ञान नसून एक सहजसोपं समजण्यासारखं ज्ञान आहे जे आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवू शकतं. संपत्ती हि खरी श्रीमंती आहे, आणि या संपत्तीतून येणारा पैसा हेच फक्त तुमचे खरे उत्पन्न आणि तेच फक्त खर्च करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, संपत्ती विकून येणारा पैसा हा खर्च करण्यासाठी नसून पुन्हा संपत्तीमध्येच रूपांतरित व्हायला हवा, एवढं जरी आपल्याला कळालं तरी आपल्या बऱ्याच आर्थिक समस्या सुटू शकतात.
धन्यवाद
अर्थसाक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp or Telegram Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
सुपर सर
Very nice and helpful. It’s 100% ✓ True.
Very impressive ,today’s need really eye opener lesson
Great sir nice
No 1 sir.
Khup ch chaan margdarshan kelat.
Aple karya asech chalu rahudya amchyasathi margdarshak tharel
Very nice guidance
Very Nice Guidance