व्यवसायातील अपयशाचा धोका कमी करायचा असेल, तर या गोष्टी लक्षात ठेवा…

व्यवसायातील अपयशाचा धोका कमी करायचा असेल, तर या गोष्टी लक्षात ठेवा…

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

तुमच्या जवळच्या व्यक्तीने एखाद्या व्यवसायात चांगले यश मिळवलेले असते म्हणून तुम्हीही त्याच प्रकारचा व्यवसाय सुरु करता. उधार, उसनवारी, व्याज, कर्ज, एखादी प्रॉपर्टी विकणे अशा विविध मार्गांनी पैसा उभा करता, पण व्यवसायाचा अनुभव नसल्यामुळे काही महिन्यातच सगळे पैसे संपतात. व्यवसाय बंद करण्याची वेळ येते.

तुम्हाला एखाद्या व्यवसायाची माहिती असते, तुम्ही त्यासंबंधातील काम काही ठिकाणी केलेले असते, पण तरीही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु झाल्यानंतर काही काळानंतर अपयश यायला लागते,

तुम्हाला व्यवसाय सुरु करायचाय पण अगदी नोंदणी कुठे आणि कशी करायची यासारख्या मुलभूत गोष्टींच्या अज्ञानामुळे तुम्ही व्यवसायाचा विचारच सोडून देता

व्यवसाय करायला पैसे असतात, पण कोणता व्यवसाय करावा, कुठे करावा यातच सगळा वेळ निघून जातो, काही काळाने इतकं कन्फ्युजन होतं कि व्यवसायाचा विचारच रहित केला जातो.

व्यवसायाची पार्श्वभूमी नसल्यामुळे तुम्हाला कित्येक बाबतीत फसवणुकीचे अनुभव येतात, खराब कच्चा माल, सेवा, माशिनारींमुळे मनस्ताप होतो,

यातूनही सर्व काही सुरळीत झाले तरी मार्केटिंग व सेल्स ची योग्य माहितीच नसल्यामुळे लाखो रुपयांचा खर्च वाया जातो …

असे विविध अनुभव आपल्यापैकी कित्येकांना आलेले आहेत. याचे कारण असते पुरेश्या अभ्यासाचा अभाव… व्यवसायाची पार्श्वभूमी नसल्यामुळे आपल्याला व्यवसायातील खाचा खोचा माहित नसतात, अभ्यास न करता, पुरेसा अनुभव न घेता आपण व्यवसायात उतरतो आणि अडकतो. नुकसान तर होतंच पण व्यवसाय ठप्प होण्याची वेळ येऊ शकते.

कोणताही व्यवसाय सुरु करताना व्यवसायासंबंधी प्राथमिक माहिती असणे आवश्यक असते. व्यवसाय सुरु करताना त्यासाठी पार्श्वभूमी तयार असेल तर त्यात अपयश येण्याचा धोका अगदी नगण्य असतो.

व्यवसायाचा अनुभव नसेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा…

१. व्यवसाय सुरु करताना कधीही घाई करू नका. विचारपूर्वक, संपूर्ण माहिती घेऊन मगच व्यवसाय सुरु करा. पाण्यात पडल्यावर पोहता येतंच असले डायलॉग व्यवसायात चालत नाही… हौदात उडी मारली तर कदाचित पोहायला शिकू शकाल, पण व्यवसाय समुद्र आहे, अनुभव नसेल तर इथे बुडण्याचीच शक्यता जास्त असते. म्हणूनच व्यवसायाचा सक्सेस रेशो ७:१ आहे. म्हणजे सात व्यवसायामागे एक व्यवसाय यशस्वी होतो. त्यामुळे घाईगडबड नाही… विचारपूर्वक, नियोजनपूर्वक व्यवसायात उतरावे

२. व्यवसाय निवड करताना विचारपूर्वक निवडा. कुणीतरी सांगतंय म्हणून, कुणालातरी एखाद्या व्यवसायात फायदा झालाय म्हणून तुम्हीही तोच व्यवसाय करावा असा काही नियम नाही. लाटेत तर बिलकुल अडकू नका. जगात हजारो व्यवसाय आहेत. त्यातून तुमच्यासाठी योग्य काय आहे याचा अभ्यास करा. तुमच्यासाठी कोणते क्षेत्र योग्य आहे, तुम्ही काय विकू शकता, मार्केट कसे आहे, मार्केटमधे कोणत्या संधी उपलब्ध आहेत, तुमची गुंतवणूक क्षमता किती आहे, असा विविधांगी अभ्यास करून मगच व्यवसाय निवडावा.

३. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात कर्जाच्या भानगडीत पडू नका. व्यवसायासाठी पैसा लागतो हा प्रचंड मोठा भ्रम आहे. सुरुवातीला हातात आहेत तेवढ्याच पैशातून व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करा. उधार उसनवऱ्या करू नका. सावकारी व्याजाने पैसे घेऊ नका. (आहे त्या पैशातून सुरुवात करणे म्हणजे काय… अशी शंका असल्यास तर मला संपर्क करा, इथे सविस्तर लिहिणे शक्य नाही.)

४. उत्पादन क्षेत्रात उतरणार असाल तर आधी सेल्स चे योग्य ज्ञान तुम्हाला असायला हवे. काही काळ एखाद्या कंपनीत, डिस्ट्रिब्युटर कडे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करा. जास्तीत जास्त मार्केटचा अभ्यास करा. सेल्स चे ज्ञान आत्मसात करा. लघुद्योगात व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही स्वतः तुमच्या व्यवसायाचे पहिले सेल्स प्रतिनिधी असता. विकता येत असेल तरच व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, म्हणून आधी विक्री कौशल्य शिकून घ्या. जो कोणता व्यवसाय सुरु करणार असाल त्याची विक्री पद्धत कशी आहे याचा अभ्यास करा. एखादे शॉप वगैरे असेल तर शक्य झाल्यास त्याच प्रकारच्या एखाद्या शॉप मध्ये काही काळ काम करा. ग्राहक हाताळणी शिकून घ्या

५. मार्केट मॅनेजमेंट, शॉप मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ग्राहक हाताळणी, कर्मचारी हाताळणी, आर्थिक मॅनेजमेंट याचा अभ्यास करा, प्रॅक्टिकल ज्ञान भेटल्यास उत्तम. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी कच्चा माल, मशिनरी खरेदी करत असाल तर योग्य शहानिशा करून मगच खरेदी करा.

६. सुरुवातीच्या काळात नफ्यावर लक्ष देऊ नका. ग्राहक संख्या वाढत राहील यासाठी प्रयत्न करत राहा. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात नुकसान झाले तरी चालू शकते, त्याला गुंतवणूक समजायची असते. हे नुकसान नसून ग्राहक जोडण्यासाठी केलेली गुंतवणूक असते. व्यवसायात पहिले वर्ष तोटाच होत असतो, यात विशेष काही नाही. तुमच्या व्यवसाय अपेक्षित ग्राहक संख्येपर्यंत पोचण्यासाठी किमान दोन वर्ष लागत असतात, त्यामुळे पहिले वर्ष तोट्याचे, दुसरे वर्ष थोड्याफार नफ्याचे आणि तिसरे वर्ष चांगल्या उलाढालीचे आणि नफ्याचे असाच सामान्य नियम असतो. व्यवसायाच्या सुरुवातीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे बरेच व्यवसाय बंद पडतात, पण हे यश पैशाच्या स्वरूपात अपेक्षिलेले असते, जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही. ग्राहक संख्या आणि उलाढालीचा हिशोब मांडल्यास तुम्ही प्रत्यक्षात योग्य मार्गानेच चाललेले आहेत हे लक्षात येते.

७. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता, सातत्य हे आपल्या व्यवसायाचे चार पाय आहेत… त्यावर कधीही आघात करू नका. ग्राहकाला त्याने मोजलेल्या पैशाचा योग्य मोबदला मिळाला आहे असे वाटले पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील रहा.

८. व्यवसायात संयम आवश्यक असतो. संयमाचा अभाव, चंचलपणा आणि रागाच्या भरात निर्णय घेणे या कारणांमुळे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.

९. व्यवसायात अपयश येऊ शकतं. अपयश हा या क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे, म्हणूनच लेखाचे शीर्षक सुद्धा “व्यवसायातील अपयशाचा धोका कमी करायचा असेल तर” असंच आहे… “अपयश टाळायचे असेल तर” असं शीर्षक वाचायला चांगलं वाटेल, पण हे फसवे शीर्षक असेल… व्यवसायात वास्तववादी राहावे, सत्य मान्य करूनच वाटचाल करावी…. व्यवसायात अपयश येऊ शकतं. पण म्हणून एखादा व्यवसाय अपयशी ठरला म्हणजे तुम्ही संपला, असे कधीच होत नाही. तुमच्याकडे व्यवसायाचे पर्याय तयार असले पाहिजे. प्रत्येक यशस्वी उद्योजकाचे कित्येक प्रयत्न सपशेल अपयशी ठरलेले असतात, आपणही त्याला अपवाद नाही. माझे सुद्धा बरेच प्रयत्न साफ अपयशी ठरलेले आहेत, यात काहीही विशेष बाब नाही. यश अपयश, नफा तोटा, चांगले वाईट दिवस, अर्थीक समृद्धी वा अडचणी… हे व्यवसायाचे भाग आहेत, परिणाम नाही.

१०. आणि सर्वात महत्वाचे, (हे थोडं प्रमोशनल आहे, पण कामाचं आहे)… उद्योजक मित्र फेसबुक पेज, वेबसाईट व इतर उद्योजक मित्र डिजिटल-सोशल माध्यमांवर दिली जाणारी माहिती दररोज वाचत रहा. इथे तुम्हाला व्यवसाय करताना उपयोगी असणारी माहिती देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. एकाच वेळी सर्व माहिती कधीच देता येऊ शकत नाही किंवा आत्मसात करता येऊ शकत नाही, परंतु दररोज मिळणारी माहिती नियमितपणे ग्रहण करत राहिल्यास सगळ्यांचा मिळून चांगला सार हाताशी राहतो.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

वेबसाईट वर पब्लिश केलेल्या जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार असतात. या जाहिरातींचा 'उद्योजक मित्र'वेबसाईट तसेच उद्योजक मित्रच्या इतर पोर्टलशी कोणताही संबंध नसतो. कोणतेही व्यवहार करताना संपूर्ण शहानिशा करूनच करा.

Related Post

9 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!